John 9 in Marathi

1 तो तिकडून पुढे जात असता एक जन्मांध मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला.

2 तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “गुरूजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? ह्याच्या की ह्याच्या आईबापांच्या?”

3 येशूने उत्तर दिले, “ह्याने किंवा ह्याच्या आईबापाने पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठायी देवाची कार्ये प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला.

4 ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे. तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही.

5 मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.”

6 असे बोलून तो जमिनीवर थुंकला व थुंकीने त्याने चिखल केला, तो चिखल त्याच्या डोळ्यांस लावला.

7 आणि त्याला म्हटले, “जा, शिलोहाच्या तळ्यात धू.” (ह्याचा अर्थ पाठवलेले) म्हणून त्याने जाऊन धुतले आणि तो पाहत आला.

8 म्हणून त्याचे शेजारी व ज्यांनी त्याला भीक मागताना पूर्वी पाहिले होते ते म्हणाले, “तो जो बसून भीक मागत असे तो हाच ना?”

9 कोणी म्हणाले, “हा तो आहे.” दुसरे म्हणाले, “नाही, हा त्याच्यासारखा आहे.” पण तो म्हणाला, “मी तोच आहे.”

10 म्हणून ते त्याला म्हणाले, “मग तुझे डोळे कसे उघडले?”

11 त्याने उत्तर दिले, “ येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यांस लावला आणि तो मला म्हणाला, ‘शिलोहवर जाऊन धू’. मी जाऊन धुतले, आणि मला दृष्टि आली.”

12 तेव्हा त्यांनी म्हटले, “तो कुठे आहे?” तो म्हणला, “मला माहीत नाही.”

13 तो जो पूर्वी अांधळा होता त्याला त्यांनी परूश्यांकडे नेले,

14 ज्यादिवशीं येशूने चिखल करून त्याचे डोळे उघडले तो दिवस शब्बाथ होता.

15 म्हणून परूश्यांनीहि त्याला पुन्हा विचारले.त्याला दृष्टी कशी आली? आणि तो त्यांना म्हणाला, “त्याने माझ्या डोळ्यांस चिखल लावला,तो मी धुऊन टाकल्यावर, मला दिसूं लागले.”

16 तेव्हा परूश्यांतील कित्येक म्हणाले, “हा मनुष्य देवापासून नाही, कारण तो शब्बाथ पाळीत नाही.” पण दुसरे म्हणाले, “जो मनुष्य पापी आहे तो असली चिन्हे कशी करू शकतो?”

17 म्हणून, पुन्हा ते त्या अांधळ्याला म्हणाले, “त्याने जर तुझे डोळे उघडले तर तू त्याच्याविषयी काय म्हणतोस?” तो म्हणाला, “तो एक संदेष्टा आहे.”

18 म्हणून यहूद्यांनी ज्याला दृष्टी आली होती त्याच्या विषयी त्याच्या आईबापांना बोलवून विचारपूस करीपर्यत, तो पूर्वी अांधळा असून व आता डोळस झाला आहे,ह्यावर विश्वास ठेवला नाही.

19 त्यांनी त्यांना विचारले, “तुमचा जो मुलगा अांधळा जन्मला म्हणून तुम्ही म्हणता तो हा आहे काय? मग आता त्याला कसे दिसते?”

20 त्याच्या आईबापानी उत्तर दिले, “हा आमचा मुलगा आहे; आणि हा अंधळा जन्मला होता हे आम्हाला माहीत आहे.

21 तरी आता त्याला दृष्टी कशी आली हे आम्हाला माहीत नाही, किंवा त्याचे डोळे कोणी उघडले हेहि आम्हाला माहीत नाही. त्याला विचारा, तो वयात आलेला आहे, तो स्वतःविषयी सांगेल.”

22 त्याच्या आईबापांना यहूद्यांचे भय होते म्हणून ते असे म्हणाले, कारण, तो ख्रिस्त आहे असे कोणी पत्करल्यास त्याला सभा बहिष्कृत करावे,असे यहुद्यांचे आधीच एकमत झाले होते.

23 ह्यामुळे त्याच्या आईबापानी म्हटले, ‘तो वयात आलेला आहे, त्याला विचारा.’

24 तेव्हा जो मनुष्य अांधळा होता त्याला त्यांनी दुसर्‍यांदा बोलावले आणि ते त्याला म्हणाले, “देवाचे गौरव कर; हा मनुष्य पापी आहे हे आम्ही जाणतो.”

25 ह्यावरून त्याने उत्तर दिले, “तो पापी आहे किंवा नाही हे मी जाणत नाही. मी एक गोष्ट जाणतो; मी पूर्वी अांधळा होतो आणि आता मला दिसते.”

26 म्हणून ते त्याला म्हणाले, “त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे उघडले?”

27 त्याने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला आताच सांगितले, तरी तुम्ही ऐकले नाही; ते पुन्हा ऐकायची इच्छा का करिता?तुम्हाहि त्याचे शिष्य होऊ इच्छिता काय?”

28 तेव्हा त्यांनी त्याची हेटाळणी केली, आणि ते त्याला म्हणाले, “तू त्याचा शिष्य आहेस; आम्ही मोशेचे शिष्य आहोत.

29 देव मोशेबरोबर बोलला हे आम्हाला माहीत आहे. हा कोठला आहे हे आम्हाला माहीत नाही.”

30 त्या माणसाने त्यांना उत्तर दिले “ हेच तर मोठे आश्चर्य आहे की, हा कोठला आहे हे तुम्हाला माहीत नाही; आणि तरी त्याने माझे डोळे उघडले.

31 आपल्याला हे माहीत आहे की, देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो मनुष्य देवाचा उपासक आहे आणि जो त्याच्या इच्छेप्रमाणे करतो त्याचे तो ऐकतो.

32 अांधळा जन्मलेल्या कोणाचे डोळे उघडल्याचे युगाच्या आरंभापासून कधी कोणाच्या ऐकण्यात आले नव्हते .

33 हा जर देवापासून नसता तर ह्याला काही करता आले नसते.”

34 त्यांनी त्याला म्हटले, “तू सर्वस्वी पापात जन्मलास, आणि तू आम्हाला शिकवतोस काय?” आणि त्यांनी त्याला बाहेर घालविले.

35 त्यांनी त्याला बाहेर घालविले हे येशूने ऐकले; आणि त्याला तो सांपडल्यावर तो त्याला म्हणाला, “तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय?”

36 त्याने उत्तर दिले, “महाराज मी त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे?”

37 येशूने त्याला म्हटले, “तू त्याला पाहिले आहे आणि तुझ्याबरोबर आता बोलत आहे तोच तो आहे.”

38 तो म्हणाला, “प्रभूजी, मी विश्वास ठेवतो.” आणि त्याने त्याला नमन केले.

39 तेव्हा येशू म्हणाला, “मी न्यायनिवाड्यासाठी ह्या जगात आलो आहे; ह्यासाठी की, ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे, आणि ज्यांना दिसते त्यांनी अांधळे व्हावे.”

40 तेव्हा परूश्यांतील जे त्याच्याबरोबर होते त्यांनी ह्या गोष्टी ऐकल्या; आणि ते त्याला म्हणाले, “आम्हीहि पण अांधळे आहोत काय?”

41 येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही अांधळे असता तर तुम्हाला पाप नसते, परंतु तुम्ही म्हणता की, ‘आम्हाला आता दिसते’, म्हणून तुमचे पाप तसेंच राहते.