Matthew 10 in Marathi

1 येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ बोलावले, आणि त्याने त्यांना भुते घालवण्याचा अधिकार दिला. तसेच प्रत्येक आजार व दुखणी बरे करण्याचा अधिकार दिला.

2 बारा प्रेषितांची नावे अशी आहेत. पेत्र (ज्याला शिमोन म्हणत)आणि त्याचा भाऊ अंद्रिया,जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान

3 फिलिप्प व बर्थलमय,थोमा आणि मत्तय जकातदार,अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय

4 शिमोन कनानी व पुढे ज्याने त्याचा विश्वासघात केला तो यहूदा इस्कार्योत.

5 येशूने या बारा जणांना अशी आज्ञा देऊन पाठवले की यहूदीतर लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका.

6 तर त्याऐवजी इस्राएलच्या हरवलेल्या मेंढराकडे जा.

7 तुम्ही जाल तेव्हा हा संदेश जाहीर करा. स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.

8 रोग्यांना बरे करा, मृतांना उठवा. कुष्ठरोग्यांना शुध्द करा. भुते काढा, तुम्हाला फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या.

9 तुमच्या कमरेला सोने, चांदी किंवा तांबे घेऊ नका.

10 सोबत पिशवी घेऊ नका, तुमच्या प्रवासासाठी फक्त तुमचे अंगावरचे कपडे व पायातील वहाण असू द्या. अधिकचे वस्त्र किंवा वहाणा घेऊ नका. काठी घेऊ नका, कारण कामकऱ्याला आपले अन्न मिळणे आवश्यक आहे.

11 “ज्या कोणत्याही नगरात किंवा खेड्यात तुम्ही जाल, तेथे कोण योग्य व्यक्ति आहे याचा शोध करा आणि तेथून निघेपर्यंत त्या व्यक्तीच्या घरी राहा.

12 त्या घरात प्रवेश करतेवेळी येथे शांती असो.असे म्हणा.

13 जर ते घर खरोखर योग्य असेल तर तुमची शांती तेथे राहील पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल.

14 आणि जो कोणी तुम्हाला स्वीकारणार नाही किंवा तुमचे शब्द ऐकणार नाही तेव्हा त्याच्या घरातून किंवा नगरातून बाहेर पडताना तुम्ही आपल्या पायाची धूळ झटकून टाका.

15 मी तुम्हाला खरे सांगतो. न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोराला अधिक सोपे जाईल.

16 “लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरूपद्रवी व्हा.

17 माणसांविषयी सावध असा. कारण ते तुम्हाला न्यायसभेच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानामध्ये ते तुम्हाला फटके मारतील.

18 माझ्यामुळे ते तुम्हाला राज्यपाल व राजे यांच्यासमोर आणतील. तुम्ही त्यांच्यापुढे व परराष्ट्रीयांना माझ्याविषयी सांगाल.

19 जेव्हा तुम्हाला अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा कसे बोलावे याविषयी काळजी करू नका. त्यावेळेला तुम्ही काय बोलायचे ते सांगितले जाईल.

20 कारण बोलणारे तुम्ही नसून तुमच्या पवित्र आत्मा तुमच्याद्वारे बोलेल.

21 “भाऊ आपल्या भावाविरूध्द व पिता आपल्या मुलाविरूध्द उठेल आणि त्याला विश्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आईवडिलांविरूध्द उठून त्यांना जिवे मारण्यास देतील.

22 माझ्या नावामुळे सर्व तुमचा व्देष करतील. पण शेवटपर्यत जो टिकेल तोच तरेल.

23 एका ठिकाणी जर तुम्हाला त्रास दिला जाईल, तर दुसरीकडे जा. मी तुम्हाला खरे सांगतो मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्त्राएलच्या सर्व गावामध्ये तुमचे असे फिरणे संपणार नाही.

24 “शिष्य त्याच्या शिक्षकापेक्षा वरचढ नाही, किंवा नोकर मालकाच्या वरचढ नाही.

25 शिष्य आपल्या शिक्षकासारखा व नोकर आपल्या मालकासारखा होणे, इतके पुरे. जर घराच्या धन्याला त्यांनी बालजबूल म्हटले तर घरातील इतर माणसांना ते किती वाईट नावे ठेवतील!”लोकांचे नको तर देवाचे भय बाळगा.

26 “म्हणून त्यांना भिऊ नका, कारण उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही.

27 जे मी तुम्हाला अंधारात सांगतो ते तुम्ही प्रकाशात बोला, आणि कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते तुम्ही छतावरून गाजवा.

28 “जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्याला भ्या.

29 दोन चिमण्या एका पैशाला विकत नाहीत का? तरीही तुमच्या पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही.

30 आणि तुमच्या डोक्यावरचे केससुध्दा त्याने मोजलेले आहेत.

31 म्हणून घाबरु नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान आहात.

32 “जो कोणी मनुष्यांसमोर मला स्वीकारील त्याला मीसुध्दा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन.

33 पण जो कोणी मनुष्यांसमोर मला नाकारील त्याला मी सुध्दा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.

34 “असे समजू नका की मी पृथ्वीवर शांतता करायला आलो आहे. मी शांतता स्थापित करायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो आहे.

35 मी फूट पाडायला आलो आहे, ‘म्हणजे मुलाला त्याच्या पित्याविरुध्द आणि मुलीला तिच्या आईविरुध्द सुनेला तिच्या सासूविरुध्द उभे करायला आलो आहे.

36 सारांश मनुष्याच्या घरचीच माणसे त्याचे शत्रू होतील.’

37 “जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही.

38 जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही.

39 जो आपला जीव मिळवतो तो त्याला गमवील पण जो माझ्याकरता आपला जीव गमावतो तो त्याला मिळवील.

40 “जी व्यक्ति तुम्हाला स्वीकारते ती व्यक्ति मला स्वीकारते आणि ज्या पित्याने मला पाठवले त्यालाही स्वीकारते.

41 जो कोणी संदेष्ट्यांचा स्वीकार त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतो, त्याला संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल, आणि नितीमानाला नितीमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नितीमानाचे प्रतिफळ मिळेल

42 मी तुम्हाला खरे सांगतो की, ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ प्यालाभर थंड पाणी प्यायला देईल तो आपल्या प्रतिफळाला मुळीच मुकणार नाही.”