Matthew 9 in Marathi

1 तेव्हा येशू नावेत बसून पलीकडे गेला व परत आपल्या नगरात आला.

2 तेव्हा काही लोकांनी पक्षघात झालेल्या मनुष्याला येशूकडे आणले. तो मनुष्य बाजेवर पडून होता. येशूने त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती मनुष्याला म्हटले, “ मुला, धीर धर. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”

3 काही नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते आपसात म्हणाले, “हा मनुष्य तर ईश्वराची निंदा करीत आहे.”

4 त्यांचे विचार ओळखून येशू म्हणाला, “तुमच्या अंतःकरणात तुम्ही वाईट विचार का करता?

5 कारण, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे म्हणणे, किंवा उठून चालू लाग, असे म्हणणे यातून कोणते सोपे आहे?

6 परंतु तुम्ही हे समजून घ्यावे की, मनुष्याच्या पुत्राला, पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” मग येशू त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाला, “ऊठ! आपली बाज उचलून घेऊन घरी जा.”

7 मग तो उठून आपल्या घरी गेला.

8 हे पाहून लोकसमुदाय थक्क झाला आणि ज्या देवाने माणसाला एवढा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला.

9 मग येशू तेथून पुढे निघाला, तेव्हा त्याने मत्तय नावाच्या माणसाला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले. तेव्हा येशू त्याला म्हणाला, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो उठून त्याच्यामागे गेला.

10 येशू मत्तयाच्या घरी जेवत असता, पुष्कळ जकातदार व पापी आले आणि येशू व त्याचे शिष्य यांच्याबरोबर जेवायला बसले.

11 परूशांनी ते पाहिले त्यांनी येशूच्या शिष्यांना विचारले, “तुमचा गुरू जकातदार व पापी यांच्याबरोबर का जेवतो?”

12 येशूने त्यांना हे बोलताना ऐकले, तो त्यांना म्हणाला, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही तर जे आजारी आहेत त्यांना आहे.

13 मी तुम्हाला सांगतो, जा आणि याचा अर्थ काय ते शिका; ‘मला यज्ञपशूंची अर्पणे नकोत, तर दया हवी.’ मी नीतिमान लोकांना नव्हे, तर पापी लोकांना बोलावण्यास आलो आहे.”

14 मग योहानाचे शिष्य त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याला विचारले, “आम्ही व परूशी पुष्कळ उपास करतो. पण तुझे शिष्य उपास करीत नाहीत. ते का?”

15 येशूने त्यांना उत्तर दिले, “नवरा मुलगा (वर) सोबत असताना त्याचे वऱ्हाडी दुःखी कसे राहतील? अशी वेळ येईल जेव्हा नवऱ्या(वराला) मुलाला त्यांच्यापासून दूर केले जाईल तेव्हा ते उपास करतील.

16 “कोणी नव्या कापडाचे ठिगळ जुन्या कापडाला लावीत नाही, कारण ते ठिगळ त्या कापडाला फाडते व छिद्र अधिक मोठे होते.

17 तसेच नवा द्राक्षारस जुन्या कातडी पिशवीत कोणी घालीत नाहीत, घातला तर पिशव्या फुटतात व द्राक्षरस सांडतो आणि पिशव्या बिघडतात; तर नवा द्राक्षारस नव्या पिशव्यात घालतात. म्हणजे दोन्हीही चांगले राहतात.”

18 येशू दाखला सांगत असता यहूद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी त्याच्याकडे आला व येशूच्या पाया पडून म्हणाला, “माझी मुलगी आताच मरण पावली आहे. परंतु आपण येऊन आपला हात तिच्या डोक्यावर ठेवावा म्हणजे ती पुन्हा जिवंत होईल.”

19 तेव्हा येशू उठून आपल्या शिष्यांबरोबर त्याच्यामागे जाऊ लागला.

20 मग पाहा, वाटेत बारा वर्षापासून रक्तस्राव होत असलेली, एक स्त्री येशूच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली.

21 कारण ती आपल्या मनात म्हणत होती, “मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईन.”

22 तेव्हा येशूने मागे वळून तिला पाहून म्हणाला, “बाई धीर धर ! तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच क्षणी बरी झाली.

23 मग येशू त्या यहूदी सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरात आला. तेव्हा त्याने बासरी वाजविणाऱ्या व रडून गोंधळ करणाऱ्या जमावाला पाहून म्हणू लागला,

24 “वाट सोडा, कारण मुलगी मेलेली नाही; ती झोपेत आहे.” तेव्हा ते त्याला हसू लागले.

25 मग त्या जमावाला बाहेर पाठवल्यावर त्याने आत जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ती मुलगी उठली.

26 आणि ही बातमी त्या सर्व प्रांतात पसरली.

27 तेव्हा येशू तेथून जात असता दोन आंधळे त्याच्यामागे ओरडत चालले. म्हणू लागले, “दाविदाच्या पुत्रा, आम्हावर दया करा.”

28 येशू आत गेला तेव्हा ते आंधळेही आत गेले. त्याने त्यांना विचारले. “मी तुम्हाला दृष्टि देऊ शकेन असा तुमचा विश्वास आहे का?” “होय, प्रभू,” त्यांनी उत्तर दिले.

29 मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्या बाबतीत घडो.”

30 आणि त्यांना पुन्हा दृष्टि आली. येशूने त्यांना सक्त ताकीद दिली, “पाहा, हे कोणाला कळू देऊ नका.”

31 परंतु ते बाहेर गेले आणि त्यांनी त्या सर्व प्रदेशात त्याची किर्ती गाजवली.

32 मग ते तेथून निघून जात असताना लोकांनी एका मुक्या भूतबाधा झालेल्या माणसाला येशूकडे आणले.

33 जेव्हा येशूने भुत काढून टाकले तेव्हा पूर्वी मुका असलेला तो मनुष्य बोलू लागला. लोकांना ह्याचे आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “इस्राएलमध्ये याआधी असे कधीही पाहण्यात आले नव्हते.”

34 परंतु परूशी म्हणाले, “हा भुतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भुते काढतो.”

35 येशू त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देत व राज्याचे सुवार्तेची घोषणा करत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे आजार बरे करत सर्व नगरातून व सर्व गावातून फिरला.

36 आणि जेव्हा त्याने त्रासलेल्या असहाय्य लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला. कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते.

37 तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “पीक खरोखर फार आहे, पण कामकरी थोडे आहेत.

38 म्हणून पिकाच्या धन्याकडे प्रार्थना करा की, त्याने आपल्या पिकाची कापणी करायला कामकरी पाठवावेत.”