Luke 9 in Marathi

1 मग त्याने त्या बारा जणांस एकत्र बोलावून त्यांना सर्व भुतांवर, आणि रोग बरे करायला, सामर्थ्य व अधिकार दिला,

2 आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याविषयीचा संदेश जाहीर करायला व रोग्यांना बरे करायला पाठवले.

3 तो त्यांना म्हणाला, वाटेसाठी काही घेऊ नका; काठी किंवा झोळी किंवा भाकर किंवा पैसा घेऊ नका आणि दोन- दोन अंगरखेही घेवू नका.

4 आणि ज्या कोणत्याही घरात तुम्ही जाल, तेथेच राहा, व तेथूनच निघून जा.

5 आणि जितके तुम्हाला अंगीकारीत नाहींत तितक्यांच्याविरुध्द साक्ष व्हावी म्हणून तुम्ही त्या नगरातून निघते वेळी आपल्या पायांची धूळ झाडून टाका.

6 तेव्हा ते निघाले, आणि सर्व ठिकाणी शुभवर्तमान सांगत व रोग बरे करीत गांवो-गांवी फिरत गेले.

7 घडत असलेल्या सर्व गोष्टी ऐकून हेरोद राजा फार घोटाळ्यात पडला, कारण योहान मेलेल्यांमधून उठला आहे असे कित्येक म्हणत होते;

8 आणि कित्येक म्हणत होते की एलिया प्रकट झाला आहे, आणि दुसरे म्हणत होते की पुरातन भविष्यवाद्यांतील कोणी एक उठला आहे.

9 तेव्हा हेरोद म्हणाला, योहानाचे शीर मी तोडले, पण ज्याच्याविषयी अशा गोष्टी मी ऐकतों तो हा कोण आहे? आणि तो त्याला भेटायला पाहत होता.

10 मग प्रेषितांनी परत येऊन आपण जे काही केले होते ते त्याला सविस्तर सांगितले. मग तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नांवाच्या नगराकडे एकीकडे गेला.

11 परंतु ह्याविषयी लोकांनी ऐकल्यावर ते त्याच्या मागे गेले. तेव्हा तो त्यांचे स्वागत करून त्यांच्याशी देवाच्या राज्याविषयी बोलूं लागला, आणि ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना त्याने बरे केले.

12 दिवस संपत आला, तेव्हा बारा जण जवळ येऊन त्याला म्हणाले, ''समुदायाला निरोप दे, म्हणजे ते आसपासच्या गावांत व खेड्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहो.''

13 पण तो त्यांना म्हणाला, ''तुम्हीच त्यांना खायला द्या.'' ते म्हणाले, ''आम्ही जाऊन ह्या लोकांसाठी अन्न विकत आणले नाही, तर पाच भाकरी व दोन मासे एवढ्याशिवाय आम्हाजवळ काही नाही.''

14 कारण ते सुमारें पाच हजार पुरूष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, 'पन्नास पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यास बसवा,'

15 मग त्यांनी सांगितल्या प्रमाणे करून सर्वांस बसवले.

16 त्याने त्या पांच भाकरी व ते दोन मासे घेतले, आणि वर स्वर्गाकडे पाहून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले.

17 तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले; आणि त्यांनी मोडलेल्या तुकड्यांतले उरले ते बारा टोपल्या भरून त्यांनी उचलून घेतले.

18 आणि असे झाले की तो एकांतात प्रार्थना करत असता शिष्य त्याच्या बरोबर होते, तेव्हा त्याने त्यांना विचारून म्हटले, लोकसमुदाय मला कोण म्हणून म्हणतात?

19 मग त्यांनी उत्तर देऊन म्हटले, बाप्तिस्मा करणारा योहान, पण कित्येक म्हणतात एलीया, व कित्येक म्हणतात की पुरातन भविष्यवाद्यांतील कोणी एक पुन्हा उठला आहे.

20 त्याने त्यांना म्हटले, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? तेव्हा पेत्राने उत्तर देऊन म्हटले, ''देवाचा ख्रिस्त.''

21 पण हे कोणाला सांगू नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली.

22 आणि म्हटले, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दु:खे सोसावी, आणि वडील व मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून नाकारले जावे, व जीवे मारले जावे, व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे.

23 आणि तो सर्वांना म्हणाला, जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो तर त्याने स्वतः:ला नाकारावे व दररोज आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे चालावे.

24 कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्याला गमावील, परंतु जो कोणी माझ्याकरता आपला जीव गमावील तो त्याला वाचवील.

25 कारण माणसाने सगळे जग मिळवून स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ होईल?

26 जो कोणी माझ्याविषयीची व माझ्या वचनाविषयी लाज धरील त्यांच्याविषयींची लाज मनुष्याचा पुत्र जेव्हा आपल्या स्वतःच्या व बापाच्या व पवित्र दूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील.

27 आणि मी तुम्हास खचित सांगतो की, येथे उभे राहणाऱ्यांतले काही असे आहेत की, ते देवाचे राज्य पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.

28 आणि या गोष्टी सांगितल्यानंतर सुमारे आठ दिवसांनी असे झाले की, पेत्र व योहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला.

29 तेव्हा तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचें रूप पालटले व त्याचे वस्त्र पांढरे लखलखीत झाले.

30 आणि पाहा, दोन पुरूष त्याच्याशी संभाषण करीत होते; हे मोशे व एलीया होते,

31 ते तेजस्वी दिसत होते, आणि जे त्याचे प्रयाण तो यरूशलेमेत पूर्ण करणार होता, त्याविषयी ते बोलत होते.

32 तेव्हा पेत्र व त्याच्या बरोबर जे होते ते झोंपेने भारावले होते, परंतु ते पूर्णपणे जागे झाले तेव्हा त्यांचे तेज, आणि जे दोन पुरूष त्याच्या जवळ उभे राहिले होते त्यांनाही पहिले.

33 मग असे झाले की ते त्याच्यापासून दूर होत असता पेत्राने येशूला म्हटले, हे गुरु, येथें असणे आम्हास बरे आहे; तर आम्ही तीन मंडप करू, तुझ्यासाठी एक व मोशेसाठी एक व एलीयासाठी एक. आपण काय बोलत आहोत याचे त्याला भान नव्हते.

34 तो या गोष्टी बोलत असता एक ढग येऊन त्यांच्यावर सावली करू लागला, आणि ते ढगांत शिरले तेव्हा ते भ्याले.

35 आणि ढगांतून वाणी आली, ती म्हणाली, हा माझा निवडलेला पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका

36 आणि ही वाणी झाल्यावर येशू एकटाच दिसला आणि ते उगेच राहिले, व ज्या गोष्टी त्यांनी पहिल्या होत्या त्यांतले कांहींच त्यांनी त्या दिवसांमध्ये कोणाला सांगितले नाही.

37 आणि असे झाले की दुसऱ्या दिवशी ते डोंगरावरून खाली आल्यावर मोठा लोकसमुदाय त्याला भेटला.

38 तेव्हा पाहा, समुदायातील एक माणूस मोठ्याने ओरडून म्हणाला, हे गुरु, मी तुला विनंती करतो, माझ्या मुलाकडे पाहा, कारण तो माझे एकुलते मुल आहे.

39 आणि पाहा, कोणी आत्मा त्याला धरतो, आणि हा एकाएकी ओरडतो, मग तो ह्याला असा पिळतो की त्याच्या तोंडाला फेस येतो, तो याला पुष्कळ त्रास देतो व ह्याला मोठ्या प्रयासाने सोडून जातो.

40 आणि तो काढावा म्हणून मी तुझ्या शिष्यांना विनंती केली, परंतु त्यांच्याने तो निघेना.

41 तेव्हा येशूने उत्तर देऊन म्हटले, हे अविश्वासी व विपरीत पिढी, मी कोठपर्यंत तुमच्याबरोबर राहू व तुमचे सोसू ? तू आपल्या मुलाला इकडे आण.

42 मग तो जवळ येत आहे इतक्यांत भुताने त्याला खाली आपटले, व भारी पिळून टाकले, पण येशूने त्या अशुध्द आत्म्याला धमकावले, व मुलाला बरे करून त्याच्या बापाजवळ परत दिले.

43 मग देवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले. आणि तो जी कामे करीत होता त्या सर्वांवरून सर्व जण आश्चर्य करीत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला,

44 या गोष्टी तुम्ही लक्षांत ठेवा कारण मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे.

45 परंतु हे बोलणे त्यांना समजले नाही, व त्यांना ते समजू नये म्हणून ते त्यांच्यापासून गुप्त राखलेले होते; आणि ते या बोलण्याविषयी त्याला विचारायला भीत होते.

46 त्यानंतर आपणांमध्ये कोण मोठा आहे याविषयी त्यांच्यामध्ये वादविवाद उठला.

47 तेव्हा येशूने त्यांच्या अंतकरणाचे विचार जाणून एका बालकाला जवळ घेऊन त्याला आपल्यापाशी उभे केले,

48 आणि त्यांना म्हटले, जो कोणी माझ्या नावाने या बालकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो, आणि जो कोणी माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो; कारण तुम्हा सर्वांमध्ये जो सर्वांहून लहान आहे तोच मोठा आहे.

49 तेव्हा योहानाने उत्तर देऊन म्हटले, हे गुरु, आम्ही कोण एकाला तुझ्या नावाने भुते काढतांना पाहिले,आणि आम्ही त्याला मना केले, कारण तो आमच्याबरोबर तुझ्या मागे चालत नाही.

50 तेव्हा येशूने त्याला म्हटले, मना करू नका, कारण जो तुम्हाला प्रतिकूल नाही तो तुम्हाला अनुकूल आहे.

51 आणि असे झाले की त्याला वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा यरूशलेमेस जाण्याच्या दृढनिश्चयाने त्याने आपले तोंड वळवले.

52 मग त्याने आपल्यापुढे निरोप्ये पाठवले, तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यास शोमरोन्यांच्या एका गावात गेले,

53 पण त्यांनी त्याला अंगीकारले नाही, कारण यरूशलेमेकडे जाण्याचा त्याचा रोख होता.

54 तेव्हा त्याचे शिष्य याकोब व योहान हे पाहून म्हणाले,हे प्रभू, एलीयाने केले होते तसेच आकाशांतून अग्नीनें पडून त्याचा नाश करावा म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी तुझी इच्छा आहे काय?

55 परंतु त्याने वळून त्यांना धमकावले आणि म्हटले, तुम्ही कोणत्या आत्म्याचे आहा हे तुम्हास ठाऊक नाही;

56 कारण मनुष्याचा पुत्र माणसांच्या जिवांचा नाश करायला आला नाही, तर त्यांना तारायला आला आहे. मग ते दुसऱ्या गावाला गेले.

57 आणि ते वाटेनें चालत असता कोणीएक त्याला म्हणाला, जेथे कोठे तू जाशील तेथे मी तुझ्या मागे येईन.

58 तेव्हा येशू त्याला म्हणाला, खोकडांस बिळे व आकाशांतल्या पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकायला ठिकाण नाही.

59 मग त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, माझ्या मागे ये. परंतु तो म्हणाला, हे प्रभू, पहिल्याने मला जाऊ दे, आणि माझ्या बापाला पुरूं दे,

60 तेव्हा येशूने त्याला म्हटले, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांस पुरू दे, परंतु तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.

61 तेव्हा आणखी एक जण म्हणाला, हे प्रभू, मी तुझ्या मागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरात जे आहे त्यांचा निरोप घेऊ दे.

62 पण येशूने त्याला म्हटले , जो कोणी नांगराला आपला हात घातल्यावर मागील गोष्टींकडे पाहत राहतो असा कोणीही देवाच्या राज्याला उपयोगी नाही.