John 14 in Marathi

1 तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका; देवावर विश्वास ठेवा, माझ्यावरहि विश्वास ठेवा.

2 माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते; मी तुमच्यासाठी जागा तयार करावयास जातो

3 आणि, मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन; ह्यासाठी जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.

4 मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला माहीत आहे.”

5 थोमा त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हाला माहीत नाही; मग मार्ग आम्हाला कसा माहीत असणार?”

6 येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.

7 मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाहि ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता आणि तुम्ही त्याला पाहिलेहि आहे.”

8 फिलिप्प त्याला म्हणाला, “प्रभूजी, आम्हाला पिता दाखवा, म्हणजे आम्हाला तेवढें पुरें आहे.”

9 येशूने त्याला म्हटले, “ फिलिप्पा मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे; तर ‘आम्हाला पिता दाखवा’ असे तू कसे म्हणतोस?

10 मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे, असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनच्या सांगत नाही; माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कामे करतो.

11 मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे ह्यावर तुम्ही विश्वास ठेवा ; नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझ्यावर विश्वास ठेवा.

12 “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतों, मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील, आणि त्यापेक्षां अधिक मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो.

13 पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन.

14 तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.

15 माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल.

16 मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल.अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सर्वकाळ राहावे.

17 तो खरेपणाचा आत्मा आहे, जग त्याला ग्रहण करू शकत नाही,कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही; तुम्ही त्याला ओळखता,कारण तो तुम्हाबरोबर राहतो,आणि तो तुम्हामध्ये वस्ती करील.

18 “मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही; मी तुम्हाकडे येईन.

19 आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही. पण तुम्ही मला पाहाल; मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत राहाल.

20 त्या दिवशी तुम्हाला समजेल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे, व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे.

21 ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याला प्रकट होईन.”

22 यहुदा त्याला म्हणाला, (इस्कार्योत नव्हे), “प्रभूजी, असे काय झाले की, आपण स्वतः आम्हास प्रकट व्हाल आणि जगाला प्रकट होणार नाही?”

23 येशूने त्याला उत्तर दिले, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील; माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन, त्याच्याबरोबर वस्ती करून राहू.

24 जो माझ्यावर प्रीती करीत नाही तो माझी वचने पाळीत नाही. आणि तुम्ही जे वचन ऐकता ते माझे नाही तर ज्याने मला पाठवले त्या पित्याचे आहे.

25 “मी तुमच्याबरोबर रहात असतांना ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत.

26 तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वाची तुम्हास आठवण करून देईल.

27 मी तुम्हास शांती देऊन ठेवितों; मी आपली शांती तुम्हास देतों. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही; तुमचे अंतःकरण अस्वस्थ किंवा भयभीत होऊ नये.

28 ‘मी जातो आणि तुम्हाकडे परत येईन.’असे जे मी तुम्हास सांगितले ते तुम्ही एेकले आहे.माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता; कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे.

29 ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून ते होण्याअगोदर,आता मी तुम्हाला सांगितले आहे,

30 ह्यापुढे, मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही.

31 परंतु मी पित्यावर प्रीती करतो, आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे मी करतो, हे जगाने आेळखावे म्हणून असे होते.उठा, आपण येथून जाऊ.