John 13 in Marathi

1 आता, वल्हांडण सणाअगोदर असे झाले की, येशूने आता ह्या जगांतून पित्याकडे निघून जाण्याची वेळ आली आहे, हे जाणून, ह्या जगातील स्वकीयांवर त्याची जी प्रीती होती, ती त्याने शेवटपर्यंत केली.

2 शिमोनाचा पुत्र यहुदा इस्कार्योत ह्याच्या मनात येशूला विश्वासघाताने शत्रूच्या हाती द्यावे असे सैतानाने आधीच घातले होते.

3 येशू जाणत होता की, पित्याने त्याच्या हातात सर्व दिले होते, आणि तो देवाकडून आला होता व देवाकडे जात होता;

4 येशू भोजनावरून उठला, त्याने आपली बाह्य वस्त्रे एकीकडे ठेवली, आणि एक रूमाल घेऊन आपल्या कमरेला बांधला.

5 त्यानंतर येशू एका घंगाळात पाणी ओतून आणि तो शिष्यांचे पाय धुऊ लागला व कमरेला बांधिलेल्या रूमालाने पुसू लागला.

6 मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय?”

7 येशूने त्याला उत्तर दिले, “मी काय करतो ते तुला आता कळत नाही, पण ते तुला पुढे कळेल.”

8 पेत्र त्याला म्हणाला, “तुम्हाला माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत.” येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.”

9 शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभूजी, माझे केवळ पायच धुऊ नका, तर हात आणि डोकेंहि धुवा.”

10 येशूने त्याला म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायांशिवाय दुसरे काही धुवायची गरज नाही, तर तो सर्वांगी शुध्द आहे; तुम्ही शुध्द आहा, पण सगळे जण नाही.”

11 कारण आपणाला विश्वासघाताने शत्रूच्या हाती कोण धरून देणार आहे हे त्याला ठाऊक होते, म्हणून तो म्हणाला, “तुम्ही सगळे जण शुध्द नाही.”

12 मग त्याने त्यांचे पाय धुतल्यावर आपली बाह्यवस्त्रे घालू व तो पुन्हा खाली बसल्यावर त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला काय केले ते तुम्हाला समजले काय?

13 तुम्ही मला गुरू आणि प्रभू म्हणता, आणि ते ठीक म्हणता, कारण मी तसाच आहे.

14 मग मी जर तुमचा प्रभू आणि गुरू असता तुमचे पाय धुतले तर तुम्हीपण एकमेकांचे पाय धुवावेत.

15 “कारण मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालू दिला आहे.

16 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतों, दास आपल्या धन्यापेक्षां मोठा नाही; आणि पाठविलेला पाठविणाऱ्यापेक्षा मोठा नाही.

17 जर ह्या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तर तुम्ही धन्य आहा.

18 “मी तुमच्यातील सर्वांविषयी बोलत नाही. मी ज्यांना निवडले आहे त्यांना मी ओळखतो. तरी, ‘ज्याने माझी भाकर खाल्ली त्यानेच माझ्याविरुध्द आपली टाच उचलली’, हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे.

19 आतापासून हे होण्याच्या आधीच मी हे तुम्हाला सांगून ठेवतो,यासाठी की जेव्हा हे होईल, तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की, मी तो आहे.

20 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो की, मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो, आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो.”

21 असे बोलल्यावर येशू आत्म्यात अस्वस्थ झाला आणि साक्ष देऊन म्हणाला, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, तुमच्यांतला एकजण मला विश्वासघात करून शत्रूच्या हाती धरून देईल.”

22 तो कोणाविषयी बोलतो ह्या संशयाने शिष्य एकमेकांकडे पाहू लागले.

23 तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यांतील एक जण येशूच्या उराशी टेकलेला होता.

24 म्हणून ज्याच्याविषयी तो बोलतो तो कोण आहे हे आम्हास सांग, असे शिमोन पेत्राने त्याला खुणावून म्हटले.

25 तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता त्याला म्हणाला, “प्रभूजी,तो कोण आहे?”

26 येशूने उत्तर दिले, “मी ज्याला हा घास ताटात भिजवून देईन, तोच तो आहे.” आणि त्याने तो घास ताटात भिजवल्यावर, तो शिमोनाचा पुत्र यहुदा इस्कार्योत ह्याला दिला.

27 आणि घास दिल्याबरोबर सैतान त्यांच्यामध्ये शिरला. मग येशूने त्याला म्हटले, “तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक.”

28 पण त्याने त्याला असे कशासाठी सांगितले हे भोजनास बसलेल्यातील कोणालाही समजले नाही.

29 कारण यहूदाजवळ डबी होती म्हणून सणासाठी आपणांस गरज आहे ते विकत घ्यावे किंवा गरिबांस काहीतरी द्यावे असे येशू सांगतो आहे,असे कित्येकांस वाटले.

30 मग घास घेतल्यावर तो लगेच बाहेर गेला; त्यावेळी रात्र होती.

31 तो बाहेर गेल्यावर येशू म्हणाला, “आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे, आणि त्याच्या ठायी देवाचे गौरव झाले आहे;

32 देव आपल्याठायी त्याचे गौरव करील. तो त्याचे लवकर गौरव करील.

33 मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे; तुम्ही माझा शोध कराल; आणि मी यहुद्यांना सांगितले की,‘मी जाईन तिकडे तुम्हाला येता येणार नाही.’तसे तुम्हासही आता सांगतो.

34 मी एक नवी आज्ञा तुम्हाला देतो; तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हींहि एकमेकांवर प्रीती करावी.

35 तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हमजे ह्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.”

36 शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता?” येशूने त्याला उत्तर दिले, “मी जाईन तिकडे, आता, तुला माझ्यामागे येता येणार नाही; पण नंतर तू येशील.”

37 पेत्र त्याला म्हणाला, “प्रभूजी, मला आपल्यामागे आताच का येता येणार नाही? मी आपल्यासाठी माझा जीव देईन.”

38 येशूने त्याला उत्तर दिले,काय? “तू माझ्यासाठी तू आपला जीव देशील? मी तुला खचीत खचीत सांगतों, तू मला तीनदा नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही.”