Matthew 5 in Marathi

1 तेव्हा येशू त्या लोकसमुदायांना पाहून डोंगरावर चढला, व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले.

2 तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला.

3 जे आत्म्याने ‘दीन’ ते आशीर्वादित आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.

4 ‘जे शोक करीत आहेत’, ते आशीर्वादित आहेत, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल’.

5 ‘जे सौम्य’ ते आशीर्वादित आहेत, कारण ‘त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.’

6 जे न्यायीपणाचे भुकेले व तान्हेले ते आशीर्वादित आहेत, कारण ते संतुष्ट होतील.

7 जे दयाळू ते आशीर्वादित आहेत, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल.

8 ‘जे अंतःकरणाचे शुध्द ’ ते आशीर्वादित आहेत, कारण ते देवाला पाहतील.

9 जे शांती करणारे ते आशीर्वादित आहेत, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.

10 न्यायीपणाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते आशीर्वादित आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.

11 माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरूध्द सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहात.

12 आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे बक्षीस मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्याचा त्यांनी तसाच छळ केला.

13 “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा कसे खारट बनवता येईल? तर ते निरूपयोगी होऊन फेकून देण्याच्या लायकीचे बनेल. माणसे ते पायदळी तुडवतील.

14 “तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपत नाही.

15 आणि दिवा लावून तो कोणी टोपलीखाली लपवून ठेवत नाही. उलट तो उंचावर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वाना प्रकाश देतो.

16 तशाच प्रकारे तुम्ही सुध्दा इतरांच्यासाठी प्रकाश असे झाले पाहिजे. यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.

17 नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असे समजू नका; मी रद्द करावयास नव्हे तर पूर्ण करावयास आलो आहे.

18 कारण मी तुम्हास खचीत सांगतो, आकाश व पृथ्वी हीं नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रांतील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही.

19 ह्यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञांतील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील.

20 मी तुम्हाला सांगतो, नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी ह्यांच्यापेक्षा तुमचे न्यायीपण अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यांत तुमचा प्रवेश होणारच नाही.

21 ‘खून करू नको’, आणि जो कोणी खून करील तो न्याय‍सभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.

22 मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागावेल तो न्याय‍सभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, अरे वेडगळा, असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या पात्र होईल आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा, असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल.

23 ह्यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या मनात भावाच्या विरूध्द काही आहे अशी तुला आठवण झाली,

24 तर आपले दान तसेच वेदीसमोर ठेव आणि प्रथम आपल्या भावाकडे जाउन त्याच्याबरोबर समेट कर, आणि मग येऊन आपले दान अर्पण कर.

25 वाटेवर तुझा फिर्यादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी समेट कर, नाहीतर कदाचित फिर्यादी तुला न्याय‍धीशाच्या हाती देईल, न्याय‍धीश तुला शिपायांच्या हाती देईल, आणि तू तुरूंगात पडशील.

26 मी तुला खचीत सांगतो दमडीन् दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाहीस.

27 ‘व्यभिचार करू नको’ म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे

28 मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेने पाहतो त्याने आपल्या अंतःकरणात तिच्याशीं व्यभिचार केलाच आहे.

29 तुझा उजवा डोळा पापाची सुरूवात करीत असेल तर तो उपटून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.

30 ‘ तुझा उजवा हात पापाची सुरूवात करीत असेल तर तो तोडून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.

31 ‘कोणी आपली बायको टाकतो तर त्याने तिला सूटपत्र द्यावे’ हे सांगितले होते.

32 मी तर तुम्हाला सांगतो की, जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या बायकोबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो.

33 ‘खोटी शपथ वाहू नको’ तर ‘आपल्या शपथा परमेश्वरापुढे खऱ्या कर’ म्हणून प्राचीन काळच्या लोकांना सांगितले होते, हेही तुम्ही ऐकले आहे.

34 मी तर तुम्हास सांगतो शपथ वाहूच नका; ‘स्वर्गाची’ नका, कारण ‘ते देवाचे राजासन आहे’;

35 ‘पृथ्वीचीही’ वाहू नका, कारण ‘ती त्याचे पादासन आहे’; ‘यरुशलेमेचीहि वाहू नका. कारण ती थोर राजाची नगरी आहे.

36 आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नको, कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस.

37 तर तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे; ह्याहून जे अधिक ते त्या दुष्टापासून आहे.

38 ‘डोळ्याबद्दल डोळा’ व दाताबद्दल दात’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे

39 मी तर तुम्हाला सांगतो, दुष्टाला अडवू नका . जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो , त्याच्याकडे दुसरा गाल कर;

40 जो तुझ्यावर आरोप करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे;

41 आणि जो कोणी तुला धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा .

42 जो कोणी तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ व पाहतो त्याला पाठमोरा होऊ नको.

43 आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर’ व आपल्या वैऱ्यावर व्देष कर, असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे .

44 मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जो तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.

45 अशासाठी की , तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो.

46 कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय ? जकातदारही तसेच करीतात ना?

47 आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र सलाम करीत असला तर त्यांत विशेष ते काय करता ? परराष्ट्रीयही तसेच करीतात ना ?

48 ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे ‘तुम्ही पूर्ण व्हा’.