Luke 7 in Marathi

1 ऐकणाऱ्या लोकांना त्याने आपलीं सर्व वचने सांगणे संपवल्यानंतर त्याने कफर्णहूमात प्रवेश केला.

2 तेव्हा कोणा एका शताधीपतीचा आवडता दास आजारी होऊन मरणास टेकला होता.

3 मग त्याने येशूविषयी ऐकून यहूद्यांच्या वडिलांना त्याच्याकडे पाठवून, तू येऊन माझ्या दासाला वांचवावे, अशी त्याला विनंती केली.

4 जेव्हा ते येशू जवळ आले तेव्हा त्यांनी त्याला आग्रहाने विनंती केली, ज्याच्यासाठी तू हे करावे, तो योग्य आहे.

5 कारण तो आमच्या राष्ट्रावर प्रेम करतो, आणि त्याने आमच्यासाठी आमचे सभास्थान बांधून दिले.

6 त्यामूळे येशू त्यांच्याबरोबर मार्गात चालत गेला. आणि तो घरापासून फार दूर नव्हता, तोच त्या शताधीपतीने मित्रांना त्यांच्याकडे पाठवून म्हटले, प्रभू, आपण त्रास करून घेऊ नका, कारण तुम्ही माझ्या घरी यावे असा मी योग्य नाही.

7 त्या मुळे तुमच्याकडे येण्यासही मी स्वतः:ला योग्य मानले नाही, परंतु तुम्ही फक्त शब्द बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल.

8 कारण मीही दुस-याच्या अधिकाराखाली असलेला माणूस असून माझ्या हाताखाली शिपाई आहेत; आणि याला मी म्हणतो, जा, म्हणजे हा जातो, व दुस-याला ये म्हणतो, म्हणजे तो येतो, आणि माझ्या दासाला म्हणतो, हे कर, म्हणजे तो ते करतो.

9 जेव्हा येशूने हे ऐकले तेव्हा त्याला त्याच्याविषयी आश्चर्य वाटले, तो त्याच्यामागे येणाऱ्या जमावाकडे वळून म्हणाला,'मी तुम्हाला सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलात देखील आढळला नाही.

10 आणि जे पाठवलेले होते, ते घरी परतले, तेव्हा त्यांना आढळून आले की, तो सेवक बरा झाला आहे.

11 आणि दुस-या दिवशी असे झाले की, तो नाईन नावाच्या गांवाकडे जात होता, आणि त्याचे पुष्कळ शिष्य व मोठा समुदाय हे त्याच्याबरोबर जात होते.

12 जसा तो गांवाच्या वेशीजवळ आला तेव्हा पाहा, कोणा एका मेलेल्या माणसाला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता, व ती विधवा होती; आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते.

13 तेव्हा तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला,व तो तिला म्हणाला 'रडू नकोस'

14 मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला; तेव्हा खांदेकरी स्थिर उभे राहीले, आणि तो म्हणाला, 'तरूणा, मी तुला सांगतो, उठ!'.

15 आणि तो मेलेला उठून बसला व बोलू लागला; मग येशूने त्याला त्याच्या आईजवळ दिले .

16 तेव्हा सर्वांना भय वाटले, आणि ते देवाला गौरव करीत म्हणाले, 'आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे' आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे.'

17 येशूविषयीची ही बातमी सर्व यहूदीयात आणि सभोवतालच्या परिसरात पसरली.

18 योहानाच्या शिष्यांनी योहानाला जाऊन हे सर्व काही सांगितले,

19 नंतर योहानाने आपल्या दोन शिष्यांना बोलाविले आणि त्याने त्यांना प्रभुकडे हे विचारण्यासाठी पाठवले की, 'जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?

20 जेव्हा ते लोक त्याच्याकडे आले, ते म्हणाले, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आम्हाला तुमच्याकडे हे विचारण्यास पाठवले आहे की, 'जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?

21 त्याच घटकेस येशूने अनेक लोकांचे रोग, आजार बरे केले, पुष्कळांमधील भुते काढली, आंधळ्यांना दृष्टी दिली.

22 येशूने त्यांना उत्तर दिले, जा आणि तुम्ही जे ऐकले व पाहिले आहे ते योहानाला सांगा, आंधळे पाहतात, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुध्द होतात, बहिरे ऐकतात, मेलेले जिवंत केले जातात आणि गरीब लोक सुवार्ता ऐकतात.

23 आणि जो कोणी माझ्याविषयी अडखळत नाही तो आशीर्वादित आहे .

24 मग योहानाचे निरोप्ये गेल्यावर तो योहानाविषयी समुदायांशी बोलू लागला, तुम्ही काय पाहायला बाहेर रानांत गेला? वाऱ्याने हलवलेला बोरू काय?

25 तर तुम्ही काय पाहायला बाहेर गेला ? मऊ वस्त्रे घातलेल्या माणसाला काय ? पाहा, भडक पोषाख घातलेले व चैनींत असणारे लोक राजवाड्यांत असतात.

26 तर तुम्ही काय पाहायाला बाहेर गेला? भविष्यवाद्याला काय? होय, मी तुम्हास सांगतो, भविष्यवाद्याहूनही जो अधिक मोठा आहे त्याला.

27 पाहा, मी आपल्या दूताला तुझ्या मुखापुढे पाठवतो, तो तुझ्यापुढे तुझी वाट तयार करील, असे ज्याच्या विषयी लिहिले आहे तो हाच आहे.

28 मी तुम्हास सांगतो की स्त्रियांपासून जे जन्मले त्यांच्यांमध्ये योहानापेक्षा मोठा असा कोणी नाही, तरी देवाच्या राज्यांत जो अगदी लहान आहे, तो त्याच्यापेक्षां मोठा आहे.

29 आणि जकातदारांसह सर्व लोकांनी ऐकून देव न्यायी आहे असे ठरवले. कारण त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता.

30 परंतु परूशी व शास्त्री यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा न घेऊन आपल्या संबंधीची देवाची योजना धिक्कारली.

31 तर मग मी या पिढीच्या माणसांना कोणती उपमा देऊ ? आणि ती कशासारखी आहेत ?

32 जी मुले बाजारामध्ये बसून एकमेकांना हाक मारतात त्यांच्यासारखी ती आहेत, ती म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला तरी तुम्ही नाचला नाही, आम्ही विलाप केला तरी तुम्ही रडला नाही.

33 कारण बाप्तिस्मा करणारा योहान भाकर न खातां आणि द्राक्षरस न पिता आला आहे, आणि तुम्ही म्हणता, त्याला भूत लागले आहे.

34 मनुष्याचा पुत्र खात पीत आला आहे, आणि तुम्ही म्हणतां, पाहा,हा खादाड माणूस व दारूबाज, जकातदारांचा व पाप्यांचा मित्र !

35 परंतु ज्ञान आपल्या सर्व लेकरांकडून न्यायी ठरलेले आहे.

36 तेव्हा परूश्यांपैकी कोणा एकानें, तू माझ्याबरोबर जेवावे अशी येशूला विनंती केली. मग तो परूश्याच्या घरात जाऊन जेवायला बसला.

37 आणि पाहा, कोणीएक पापी बाई त्या नगरांत होती; येशू परूश्यांच्या घरात जेवायला बसला आहे हे एेकुण ती सुगंधी तेलाची अलाबास्र कुपी घेऊन आली.

38 आणि ती मागे त्याच्या पायांजवळ रडत उभी राहूून आसवांनी त्याचे पाय भिजवूं लागली, व तिने ते आपल्या डोक्याच्या केसांनी पुसून, त्याच्या पायांचे पुष्कळ मुके घेतले व त्यांना सुगंधी तेल लावले.

39 तेव्हा ज्या परूश्याने येशूला बोलावले होते, त्याने हे पाहून आपल्या मनांत म्हटले, हा भविष्यावादी असता तर जी बाई त्याला स्पर्श करीत आहे ती कोण, व कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्याला कळले असते.

40 तेव्हा येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, शिमोना, तुझ्याशी मला काही बोलायचे आहे, तेव्हा तो म्हणाला, गुरूजी, बोला.

41 एका सावकाराचे दोन कर्जदार होते; एकाला पांचशे रूपये देणे होते व दुसऱ्याला पन्नास.

42 परंतु कर्ज फेडायला त्यांच्या जवळ काही नव्हते म्हणून त्याने दोघांना क्षमा केली. तर त्यांच्यापैकी कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करील?

43 तेव्हा शिमोनाने उत्तर देऊन म्हटले, ज्याला अधिक माफ केले तो, असे मला वाटते. मग येशू त्याला म्हणाला, ठीक ठरवलेस.

44 तेव्हा त्याने त्या बाईकडे वळून शिमोनाला म्हटले, ही बाई तुला दिसते ना? मी तुझ्या घरात आलो, तू माझ्या पायांसाठी पाणी दिले नाही; परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवले, आणि आपल्या केसांनी ते पुसले.

45 तू माझा मुका घेतला नाही, परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही,

46 तू माझ्या डोक्याला तेल लावले नाही, परंतु हिने माझ्या पायांना सुगंधी तेल लावले आहे.

47 या कारणासाठी मी तुला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे त्यांची क्षमा झाली आहे; कारण हिने पुष्कळ प्रीती केली; परंतु ज्याला थोडक्याची क्षमा होते तो थोडकी प्रीती करतो.

48 तेव्हा येशूने तिला म्हटले, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.

49 मग त्याच्याबरोबर जेवायला बसले होते ते आपसांत म्हणू लागले, पापांची देखील क्षमा करणारा हा कोण आहे?

50 मग त्याने त्या बाईला म्हटले, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे,शांतीने जा.