Acts 3 in Marathi

1 आणि पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळेस, नवव्या ताशी वर मंदिरात जात होते.

2 आणि जन्मापासून पांगळा असा एक मनुष्य होता ; मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ मंदिरात जाणाऱ्याकडे भीक मागण्यास दररोज त्याला कोणीतरी नेऊन ठेवत असत.

3 पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने त्यांच्याकडे भीक मागितली.

4 तेव्हा पेत्र योहानाबरोबर त्याला निरखून पाहत म्हणाला , आमच्याकडे पाहा.

5 तेव्हा त्यांच्यापासून काही मिळेल अशी आशा धरून त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले.

6 आणि पेत्र म्हणाला, रूपे व सोने माझ्याजवळ काहीच नाही, पण जे माझ्याजवळ आहे ते मी तुला देतो; नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने उठून चालू लाग.

7 आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले; तेव्हा लागलेच त्याची पावले व त्याचे घोटे यांत बळ आले.

8 आणि तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला,आणि तो चालत व उड्या मारत व देवाची स्तुती करत त्याच्याबरोबर मंदिरात गेला.

9 आणि सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले.

10 आणि जो मंदिराच्या सुंदर दरवाजा जवळ भीक मागण्यासाठी बसत असे तो हाच आहे, असे त्यांनी त्याला ओळखले, तेव्हा त्याला जे झाले होते त्यावरून ते आश्चर्याने व विस्मयाने व्याप्त झाले.

11 तेव्हा तो पेत्राला व योहानाला धरून राहिला असता, सर्व लोक फार आश्चर्य करीत शलमोनाचा व्दारमंडप म्हटलेल्या ठिकाणी त्याच्याकडे धावत आले.

12 हे पाहून पेत्राने त्या लोकास उत्तर दिले; तो म्हणाला, अहो इस्त्राएल मनुष्यांनो, यावरून तुम्ही आश्चर्य का करता , अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालायला लावले आहे, असे समजून आम्हाकडे का न्याहाळून पाहता?

13 अब्राहामाचा व इसहाकाचा व याकोबाचा देव, आमच्या पूर्वजांचा देव, याने आपला सेवक येशू याचे गौरव केले आहे, त्याला तुम्ही मरणास सोपवून दिले, व पिलाताने त्याला सोडून देण्याचे ठरवले असताही त्याला तुम्ही त्याच्यासमक्ष नाकारले.

14 तुम्ही तर जो पवित्र व न्यायी त्याला नाकारले, आणि घातक माणूस आम्हाला द्यावा, असे मागितले;

15 आणि जीवनाच्या अधिपतीला तुम्ही जिवे मारले; त्याला देवाने मेलेल्यामधून उठवले, याचे आम्ही साक्षी आहो.

16 आणि त्याच्या नावाने, त्याच्या नावावरील विश्वासाकडून ज्याला तुम्ही पाहता व ओळखता त्या ह्या माणसाला शक्तिमान केले आहे; आणि त्याच्याव्दारे प्राप्त झालेल्या विश्वासानेच तुम्ही सर्वांच्यादेखत याला हे पूर्ण आरोग्य दिले आहे.

17 तर आता भावांनो, मी जाणतो की, अज्ञानाने तुम्ही, तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही, हे केले;

18 परंतु आपल्या ख्रिस्ताने दुःखे सोसावी म्हणून देवाने आपल्या सर्व भविष्यवाद्यांच्या तोंडाने जे पूर्वी कळवले होते ते याप्रमाणे पूर्ण केले आहे.

19 तर तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व फिरा, अशासाठी की, विसाव्याचे समय प्रभूच्या समक्षतेपासून यावेत,

20 आणि तुमच्याकरिता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू याला त्याने पाठवावे.

21 सर्व गोष्टींची सुस्थिती पुनःस्थापित होण्याच्या काळांपर्यत स्वर्गात त्याला राहणे अवश्य आहे; त्या काळाविषयी युगाच्या आरंभापासून देवाने आपल्या पवित्र भविष्यवाद्याच्या तोंडून सांगितले आहे

22 मोशेने तर सांगितले की, प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा भविष्यवादी तुमच्या भावांमधून उठवील, तो जे काही तुम्हाला सांगेल ते सर्व त्याचे ऐका.

23 आणि असे होईल की, जो कोणी जीव त्या भविष्यवाद्यांचे ऐकणार नाही तो लोकांमधून अगदी नष्ट केला जाईल.

24 आणखी शमुवेलापासून जे भविष्यवादी परंपरेने झाले, जितके बोलत आले त्या सर्वानी ह्या दिवसाविषयी सांगितले.

25 तुम्ही भविष्यवाद्यांचे मुले आहा, आणि तुझ्या संततीव्दारे पृथ्वीतील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील, असे अब्राहामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांशी जो करार केला, त्या कराराची तुम्ही मुले आहा.

26 देवाने आपला सेवक येशू याला उठवून प्रथम तुमच्याकडे पाठवले; यासाठी की त्याने तुमच्यातील प्रत्येकाला तुमच्या दुष्कर्मापासून फिरण्याने तुम्हास आशीर्वाद द्यावा.