Revelation 1 in Marathi
1 हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे ते देवाने त्याला, a ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहेत, त्या आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी, दिले आहे, आणि ख्रिस्ताने त्याच्या देवदूताला पाठवून या सर्व गोष्टी योहानाला कळवण्यास सांगितले.
2 योहानाने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी म्हणजे त्याने जे जे पाहिले त्या सर्वाविषयी साक्ष दिली;
3 ह्या संदेशाची वचने वाचणारा, ती एेकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळतात ते आशीर्वादित आहेत. कारण काळ जवळ आला आहे.
4 योहानाकडून, आशिया प्रांतातील सात मंडळ्यांना जो आहे, जो होता व जो येणार आहे त्याच्याकडून आणि त्याच्या सिंहासनासमोरील सात आत्म्यांकडून तुम्हास कृपा व शांती असो.
5 आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी , जो मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला, आणि पृथ्वीवरील राजांचा तो अधिपती आहे. आणि जो येशू आमच्यावर प्रेम करतो, ज्या येशूने आम्हाला आमच्या पापांपासून त्याच्या रक्ताने मुक्त केले;
6 ज्याने आम्हाला त्याच्या देवपित्यासाठी एक राज्य आणि याजक बनविले त्याला गौरव व सामर्थ्य युगानुयुग असोत. आमेन.
7 पहा, येशू ढगांसह येत आहे! प्रत्येक डोळा त्याला पाहील, ज्यांनी त्याला भोसकले तेसुध्दा त्याला पाहतील. पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे आकांत करतील, होय, असेच होईल! आमेन.
8 प्रभू देव म्हणातो, “मी अल्फा आणि ओमेगा आहे. मी जो आहे, जो होतो आणि जो येत आहे. मी सर्वसमर्थ आहे. ”
9 मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशू मधील क्लेश , राज्य व धीर ह्यांचा तुम्हाबरोबर भागीदार आहे. येशूच्या सत्यात आणि देवाच्या वचनामुळे आणि येशूच्या साक्षीमुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो.
10 प्रभूच्या दिवशी आत्म्याने माझा ताबा घेतला. माझ्या मागे मी कर्ण्याच्या आवाजासारखा मोठा आवाज ऐकला.
11 तो आवाज म्हणाला, “तू या सर्व गोष्टी पाहतोस त्या तू एका पुस्तकात लिही, आणि इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया आणि लावदिकीया ह्या सात मंडळ्यांना पाठव. ”
12 माझ्याबरोबर कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी मी मागे वळलो, जेव्हा मी मागे वळालो, तेव्हा मी सोन्याच्या सात दीपसमया पाहिल्या.
13 त्या समयांच्या मध्यभागी “मनुष्याच्या पुत्रासारखा” व लांब पायघोळ झगा घातलेला, छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला, असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला.
14 त्याचे डोके आणि केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीप्रमाणे शुभ्र होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते.
15 त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोनपितळेसारखे होते. त्याचा आवाज अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखा होता.
16 त्याच्या उजव्या हातात सात तारे होते. त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूंनी तीक्ष्ण धार असणारी तरवार निघाली होती. त्याचा चेहरा दिवसाच्या अतिशय प्रखर तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखा दिसत होता.
17 मी त्याला पाहिले, तेव्हा मी मेलेल्या सारखा त्याच्या पायाजवळ पडलो त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवला आणि म्हणाला, “घाबरू नको! मी पहिला आणि शेवटला,
18 आणि जो जिवंत तो मी आहे; मी मेलो होतो, पण तरी पाहा, मी अनंतकाळासाठी जिवंत आहे! आणि माझ्या जवळ मरणाच्या व मृतलोकाच्या किल्ल्या आहेत.
19 म्हणून ज्या गोष्टी तू पाहतोस, ज्या घडत आहेत आणि ज्या गोष्टी नंतर घडणार आहेत त्याही लिही.
20 जे सात तारे तू माझ्या हातात पाहिलेस आणि ज्या सात सोन्याच्या दीपसमया तू पाहिल्यास त्यांचा गुपित अर्थ हा आहे सात दीपसमया या सात मंडळ्या आहेत. आणि सात तारे हे सात मंडळ्यांचे देवदूत आहेत.