Revelation 2 in Marathi

1 इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही: “जाे आपल्या उजव्या हातात सात तारे धरतो आणि सात सोन्याच्या समयांमधून चालतो त्याचे हे शब्द आहेत

2 “तू काय करतोस ते मला माहीत आहे. तुझे काम,कष्ट व सहनशीलता हे मी जाणतो. मला हे माहीत आहे की दुष्ट तुला सहन होत नाहीत आणि जे स्वतःला प्रेषित समजतात पण जे तसे नाहीत त्यांची तू परीक्षा केली आणि ते खोटे आहेत हे तुला दिसून आले.

3 मला माहित आहे की, तुझ्यात सहनशीलता आहे, माझ्या नावामुळे तू दु:ख सहन केले आणि तू थकला नाहीस.

4 “तरीही तुझ्याविरुध्द माझे म्हणणे आहे: तू आपली पहिली प्रीती सोडली आहेस.

5 म्हणून तू कोठून पडलीस ह्याची आठवण कर पश्चाताप कर व प्रथम जी कामे केलीस ती पुन्हा कर. जर तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणाहून काढून टाकीन.

6 पण असे काही आहे जे तू करतोस, तू निकलाईतांचा कृत्यांचा व्देष करतेस, मीही त्यांच्या कृत्यांचा व्देष करतो.

7 “आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको! जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेतल्या जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याचा अधिकार देईन.

8 “स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला हे लिही: “जो पहिला आणि शेवटला आहे त्याचे हे शब्द आहेत, जो मेला होता पण पुन्हा जिवंत झाला. तो हे म्हणतो

9 “मला तुमचे दु:ख आणि गरीबी माहीत आहे. (परंतु तुम्ही धनवान आहात!) ज्या वाईट गाेष्टी लोक बोलतात त्याविषयी मला माहीत आहे, ते म्हणतात आम्ही यहूदी आहोत, (पण ते तसे नाहीत, ते सैतानाचे सभास्थान आहेत.)

10 जे दु:ख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरू नकोस. पहा! मी तुला सांगतो,सैतान तुम्हांपैकी काहींची परीक्षा पाहण्यासाठी तुरुंगांत टाकील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मग मी तुम्हाला जीवनाचा मुगुट देईन.

11 “आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको, जो विजय मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही.

12 “पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही: “ज्याच्याकडे दोन्ही बाजूंनी धार असणारी(दुधारी) तरवार आहे, त्याचे हे शब्द आहेत,

13 मला माहीत आहे जेथे सैतानाचे सिंहासन आहे. तेथे तुम्ही राहता. तरीही तुम्ही माझे नाव घट्टपणे धरून राहिला आहात. जेथे सैतान राहतो तेथे माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा जो तुम्हामध्ये जिवे मारला गेला.त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीस.

14 “पण तुझ्याविरुध्द माझ्याजवळ काही गोष्टी आहेत. कारण मूर्तींना वाहिलेली अर्पणे खाणे व लैंगिक पापे करणे, हा अडथळा इस्राएलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालाकाला ज्याने शिकविले,त्या बलामाची शिकवण ज्यांनी स्वीकारली आहे असे लोक तुझ्याजवळ आहेत.

15 त्याचप्रमाणे निकलाईताची शिकवण आचरणारे सुध्दा काहीजण तुमच्यामध्ये आहेत.

16 म्हणून पश्चात्ताप करा! नाहीतर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि आपल्या तोंडातील तरवारीने त्यांच्याशी लढेन.

17 “आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.“जो विजय मिळवतो त्याला मी गुप्त ठेवलेल्या मान्न्यातून काही देईन. मी त्याला पांढरा खडा देईन त्यावर नवीन नाव लिहिलेले असेल. ज्याला तो देण्यात येईल त्यालाच ते समजेल.

18 “थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही: “देवाचा पुत्र हे सांगत आहे, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय चमकणाऱ्या सोनपितळासारखे आहेत.

19 “मला तुमची कामे तुमची प्रीती आणि विश्वास, तुमची सेवा आणि सहनशीलता माहीत आहे. आणि तुझी शेवटली कामे पहिल्यापेक्षा अधिक आहेत हे माहीत आहे.

20 परंतु तुमच्याविरुध्द माझे म्हणणे आहे: इजबेल नावाची स्त्री जी स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि ती तिच्या शिकवणीने माझ्या सेवकांना अनैतिक लैंगिक पाप व मूर्तीना वाहिलेले अन्न खावयास भूलविते. तरी तुम्ही तिला खुशाल तसे करू देता.

21 मी तिला पश्चात्ताप करण्यासाठी वेळ दिला आहे, परंतु ती अनैतिक लैंगिक पापाविषयी पश्चाताप करू इच्छीत नाही.

22 पाहा!“म्हणून मी तिला अंथरूणावर खिळून टाकीन, आणि जे तिच्याबरोबर व्यभिचार करतात ते जर आपल्या कामांचा पश्चाताप करणार नाहीत, तर मी त्यांना मोठ्या संकटात पाडीन.

23 तर मी तिच्या मुलांना मरीने ठार मारीन. मग सर्व मंडळ्यांना हे कळेल की, जो मने आणि अंतःकरणे पारखतो तो मी आहे . मी तुम्हा प्रत्येकाला तुमच्या कामाप्रमाणे प्रतिफळ देईन.

24 “पण थुवतीरा येथील मंडळीतील जे दुसरे लोक आहेत जे तिची शिकवण आचरीत नाहीत त्यांना मी सांगतो की, ज्यास सैतानाची_ म्हणतात ती गुपिते तुम्हाला माहित नाहीत, त्या तुमच्यावर मी दुसरे ओझे लादणार नाही.

25 मी येईपर्यंत जे तुमच्याकडे आहे त्याला बळकटपणे धरून राहा

26 “जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कामे करीत राहतो, त्याला मी राष्ट्रांवर अधिकार देईन.

27 आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करतात तसा तो लोहडंडाने त्यांचावर अधिकार गाजवील .

28 जसा पित्याकडून मला अधिकार मिळाला तसा मीसुध्दा त्यास देईल. मी त्याला पहाटेचा तारा देईन.

29 आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.