Titus 2 in Marathi

1 पण चांगल्या शिकवणीस शोभणार्‍या गोष्टी तू स्वतः शिकवीत जा.

2 त्या अशा की, वृध्द पुरुषांनी संयमशील, गंभीर व समंजस व्हावे, आणि विश्वास, प्रीती व सहनशीलता ह्यात दृढ व्हावे.

3 वृध्द स्त्रियांनी, त्याचप्रमाणे, आपल्या आचरणात पवित्रेस शोभणाऱ्या असाव्या; चुगलखोर, मद्य पिणाऱ्या नसाव्या; चांगले शिक्षण देणार्‍या असाव्या;

4 आणि आपल्यातील तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या पतींवर व मुलांवर प्रेम करावे.

5 आणि त्यांनी समंजस, शुध्दाचरणी, घर संभाळणार्‍या, ममताळू, व पतीच्या अधीन राहणार्‍या व्हावे; म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.

6 आणि तसेच तरुण पुरुषांनी समंजस मनाचे व्हावे म्हणून, तू त्यांना बोध कर.

7 तू सर्व गोष्टींत चांगल्या कामांचे उदाहरण असे स्वतःला दाखव; तुझ्या शिक्षणात निर्मळपणा, गंभीरता,

8 आणि निरपवाद चांगली शिकवण दिसू दे, म्हणजे टिका करणार्‍याला तुझ्याविषयी बोलण्यास काही वाईट न मिळून तो लज्जित व्हावा.

9 आणि दासांनी सर्व गोष्टींत त्यांच्या स्वामींच्या आज्ञेत रहावे, त्यांना संतोष देणारे व्हावे आणि उलट बोलू नये;

10 त्यांनी चोर्‍या करू नयेत तर सर्व गोष्टींत चांगला विश्वासूपणा दाखवावा; आणि आपल्या तारक देवाच्या शिकवणीस, सर्व लोकांत, त्यांनी शोभा आणावी; असा तू त्यांना बोध कर.

11 कारण, सर्व लोकास तारणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे.

12 ती आपल्याला असे शिकवते की, अभक्तीचा व जगीक वासनांचा त्याग करून, आपण ह्या आताच्या युगात संयमाने, नीतिने व सुभक्तीने वागले पाहीजे;.

13 आणि आपल्या धन्य आशेची, म्हणजे आपला महान देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी;

14 आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की, आपली सर्व अनाचारातून सुटका करावी,आणि चांगल्या कामात आवेशी असलेले आपले स्व:ताचे लोक आपणासाठी शुध्द करावेत.

15 तू ह्या गोष्टी समजावून सांग, बोध कर, आणि, सर्व अधिकार पूर्वक दोष पदरी घाल. कोणी तुझा उपहास करू नये.