Romans 7 in Marathi

1 बंधूंनो, (मी नियमशास्त्राची माहीती असणार्‍यांशी मी बोलत आहे,) मनुष्य जोवर जिवंत आहे तोवर त्याच्यावर नियमशास्राची सत्ता आहे हे तुम्ही जाणत नाही काय?

2 कारण ज्या स्त्रीला पती आहे, ती पती जिवंत आहे तोवर त्याला नियमशास्त्राने +बांधलेली असते; पण तिचा पती मेला, तर पतीच्या नियमातून ती मुक्त होते.

3 म्हणून पती जिवंत असताना, जर ती दुसर्‍या पुरुषाची झाली तर तिला व्यभिचारिणी हे नाव मिळेल. पण तिचा पती मेला तर ती त्या नियमातून मुक्त होते. मग ती दुसर्‍या पुरुषाची झाली तरी ती व्यभिचारिणी होत नाही.

4 आणि म्हणून, माझ्या बंधूंनो, तुम्हीपण ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्राला मेलेले झाला आहात; म्हणजे तुम्ही दुसर्‍याचे, जो मेलेल्यातून उठवला गेला त्याचे व्हावे; म्हणजे आपण देवाला फळ द्यावे.

5 कारण आपण देहाधीन असतेवेळी, नियमशास्त्रामुळे उद्भवलेल्या आपल्या पापांच्या भावना आपल्या अवयवात, मरणाला फळ देण्यास कार्य करीत होत्या.

6 पण आपण ज्याच्या बंधनात होतो त्याला आपण मेलो असल्यामुळे आपण आता नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहो, ते ह्यासाठी की, आपण आत्म्याच्या नवेपणाने सेवा करावी, शास्त्रलेखाच्या जुनेपणाने नाही.

7 मग काय म्हणावे? नियमशास्त्र पाप आहे काय? कधीच नाही. पण मला नियमशास्त्राशिवाय पाप समजले नसते. कारण ‘लोभ धरू नको’ असे नियमशास्त्राने सांगितल्याशिवाय मला लोभ कळला नसता.

8 पण पापाने आज्ञेची संधी घेऊन माझ्यात सर्व प्रकारचा लोभ उत्पन्न केला. कारण नियमशास्त्राशिवाय पाप निर्जीव होते.

9 कारण मी एकदा नियमशास्त्राशिवाय जगत होतो, पण जेव्हा आज्ञा आली तेव्हा पाप सजीव झाले व मी मेलो.

10 आणि जीवनासाठी दिलेली आज्ञा मरणाला कारण झाली, हे मला दिसले.

11 पण पापाने आज्ञेची संधी घेतली आणि मला फसवले व तिच्या योगे ठार मारले.

12 म्हणून नियमशास्त्र पवित्र आहे, तशीच आज्ञा पवित्र, न्याय्य आणि चांगली आहे.

13 मग जी चांगली आहे ती मला मरण झाली काय? तसे न होवो. पण जी चांगली आहे, तिच्या योगे, पाप हे पाप असे प्रकट व्हावे, म्हणून माझ्यात, ती मरण हा परिणाम घडविते; म्हणजे पाप हे आज्ञेमुळे पराकोटीचे पापिष्ट झाले.

14 कारण आपण हे जाणतो की, नियमशास्त्र हे आध्यात्मिक आहे, पण मी दैहिक आहे; पापाला विकलेला आहे.

15 कारण मी काय करीत आहे, ते मला कळत नाही; कारण मी ज्याची इच्छा करतो ते मी करीत नाही, पण मी ज्याचा द्वेष करतो ते मी करतो.

16 मग मी जे इच्छीत नाही ते जर मी करतो, तर नियमशास्त्र चांगले आहे हे मी कबूल करतो.

17 मग आता, मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते.

18 कारण मी जाणतो की, माझ्यात (म्हणजे माझ्या देहात) काहीच चांगले वसत नाही. कारण इच्छा करणे माझ्याजवळ आहे, पण चांगले करीत राहणे नाही.

19 कारण मी जे चांगले करण्याची इच्छा करतो ते मी करीत नाही, पण मी ज्याची इच्छा करीत नाही ते वाईट मी करतो.

20 मग आता, मी जे इच्छीत नाही ते जर मी करतो, तर मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते.

21 मग मला, मी चांगले करू इच्छीत असता, वाईट माझ्याजवळ हाताशी असते, हा नियम आढळतो.

22 कारण मी माझ्या अंतर्यामी देवाच्या नियमाने आनंदित होतो;

23 पण मला माझ्या अवयवात दुसरा एक असा नियम दिसतो; तो माझ्या मनातील नियमाशी लढून, मला माझ्या अवयवात असलेल्या पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.

24 मी किती कष्टी मनुष्य! मला ह्या मरणाच्या शरिरात कोण सोडवील?

25 मी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे देवाचे उपकार मानतो. म्हणजे मग, मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.