Revelation 8 in Marathi

1 जेव्हा कोकऱ्याने सातवा शिक्का उघडला, तेव्हा सुमारे अर्धा तास पर्यत स्वर्गात शांतता होती.

2 नंतर देवासमोर सात देवदूत उभे राहिलेले मी पाहिले आणि त्यांना सात तुताऱ्या देण्यात आल्या.

3 दुसरा एक देवदूत येऊन, वेदी पुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते; राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्रजनांच्या प्रार्थनांसह धुप ठेवण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता.

4 देवदूताच्या हातातून धुपाचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनासह देवासमोर वर चढला.

5 तेव्हा देवदूताने धुपाटणे घेऊन त्यांत वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला आणि मेघांचा गडगडाट व गर्जना झाल्या, विजा चमकल्या व भूमिकंप झाला.

6 ज्या सात देवदूतांजवळ सात तुताऱ्या ते वाजविण्यास तयार झाले.

7 पहिल्या देवदूताने त्याची तुतारी वाजविताच रक्त मिश्रित गारा व अग्नी ही आली. ती पृथ्वीवर टाकण्यात आली यासाठी की, पृथ्वीचा तिसरा भाग व झाडांचा तिसरा भाग जळून गेला, आणि सर्व हिरवे गवत जळून गेले.

8 दुसऱ्या देवदूताने त्याची तुतारी वाजविली आणि तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले आणि समुद्राच्या तिसऱ्या भागाचे रक्त झाले.

9 समुद्रातील तिसरा भाग जीवंत प्राणी मरण पावले, आणि तसेंच तिसरा भाग जहाजांचा नाश झाला.

10 तिसऱ्या देवदूताने त्याची तुतारी वाजविली तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या व झऱ्यांच्या तिसऱ्या भाग पाण्यावर पडला;

11 त्या ताऱ्याचे नाव कडूदवणा आणि पाण्याच्या तिसऱ्या भागाचा कडूदवणा झाला; आणि त्या पाण्याने माणसांपैकी पुष्कळ माणसे मेली; कारण ते पाणी कडू झाले होते.

12 चौथ्या देवदूताने तुतारी वाजविली, तेव्हा सूर्याचा तिसरा भाग, चंद्राचा तिसराभाग, व ताऱ्यांचा तिसरा हिस्सा मारला गेला; त्यांचा तिसरा भाग अंधकारमय झालाआणि दिवसाचा व रात्रीचाही तिसरा भाग प्रकाशित झाला नाही.

13 आणि मी पाहिले, तेव्हा एक गरूड आकाशाच्या मध्यभागी उडत होता, आणि मी त्याला मोठ्याने असे म्हणताना एेकले की, जे तीन देवदूत तुतारी वाजविणार आहेत त्यांच्या तुतारीच्या होणाऱ्या आवाजाने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार‍!