Revelation 7 in Marathi

1 आणि त्यानंतर मी चार देवदूत पृथ्वीच्या चारकोनावर उभे राहीलेले पाहीलेः त्यांनी पृथ्वीतील चार वाऱ्यास असे घट्ट धरून ठेवले होते की पृथ्वीवर व समुद्रावर आणि कोणत्याही झाडावर वारा वाहू नये.

2 मी दुसरा एक देवदूत पूर्वेकडून वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला नुकसान करण्याचे सोपवून दिले होते त्यांना तो मोठ्याने आेरडून म्हणाला,

3 आमच्या देवाचे दास यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यत पृथ्वीला व समुद्राला आणि झाडासही नुकसान करू नका.

4 ज्यांच्या वर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी एेकली इस्राएल लोकांच्या सर्व वंशातील एकशे चव्वेचाळीस हजांरावर शिक्का मारण्यात आला.

5 यहूदा वंशातील बारा हजारांवर शिक्का मारण्यात आला रऊबेन वंशापैकी बारा हजारांवर गाद वंशापैकी बारा हजारांवर

6 आशेर वंशापैकी बारा हजारांवर नफताली वंशापैकी बारा हजारांवर मनश्शे वंशापैकी बारा हजारांवर

7 शिमोन वंशापैकी बारा हजारांवर लेवी वंशापैकी बारा हजारांवर इस्साखार वंशापैकी बारा हजारांवर

8 जबुलून वंशापैकी बारा हजारांवर, योसेफ वंशापैकी बारा हजारांवर बन्यामीन वंशापैकी बारा हजारावर शिक्का मारण्यात आला.

9 या गोष्टीनंतर मी पाहिले, तो प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक व भाषा यांच्यातील कोणाच्याने मोजला जाऊ शकणार नाही एवढा मोठा समुदाय, तो राजासनापुढे व कोकऱ्याच्यापुढे उभा होता. पांढरे झगे घातलेले आणि त्यांच्या हातात झावळ्याच्या फांद्या हाेत्या.

10 ते मोठ्याने आेरडून म्हणत होते राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून, तारण आहे.

11 तेव्हा राजासन व वडील आणि चार जिवंत प्राणी यांच्यासभोवती सर्व देवदूत उभे होते, आणि ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमन करीत

12 म्हणाले, “आमेन!धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत! आमेन!”.

13 तेव्हा वडिलातील एका ने मला विचारले हे पांढरे झगे घातलेले हे कोण आहेत आणि ते कोठून आले आहेत?

14 मी त्याला म्हटले, प्रभो, तुला माहित आहे. आणि तो मला म्हणाला जे मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. त्यांनी आपले झगे धुतले आहेत आणि कोकऱ्याच्या रक्तात पांढरे केले आहेत.

15 म्हणून ते देवाच्या राजासनासमोर आहेत आणि ते रात्रंदिवस त्याच्या मंदिरात सेवा करतात. जो राजासनावर बसलेला आहे तो आपला मंडप त्यांच्यावर घालील.

16 ते आणखी भूकेले आणि आणखी तान्हेले होणार नाहीत, त्यास सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही.

17 कारण राजासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल, आणि तो जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यांजवळ नेईल, आणि देव त्यांच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसून टाकील.