Revelation 20 in Marathi
1 आणि मी बघितले की, एक देवदूत आकाशामधून खाली आला; त्याच्या हातात अगाधकूपाची किल्ली व एक मोठी साखळी होती.
2 आणि ज्याला दियाबल आणि सैतान म्हणतात त्या पुरातन सर्पाला म्हणजे त्या अजगराला त्याने धरले, एक हजार वर्षांसाठी त्याला बांधले,
3 आणि अगाधकूपात टाकले; आणि त्यात बंद करून वर शिक्का लावला; म्हणजे ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांना आणखी फसवू नये. त्यानंतर त्याला पुन्हा थोडा वेळ सोडणे जरूर होते.
4 तेव्हा मी सिंहासने बघितली व त्यावर जे कोणी बसले होते त्यांच्याकडे न्यायनिवाडा देण्यात आला; आणि येशूच्या साक्षीसाठी व देवाच्या वचनासाठी ज्यांचा शिरच्छेद झाला होता, आणि त्या पशूला किंवा त्याच्या मूर्तीला ज्यांनी नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर त्याचा शिक्का मारलेला नव्हता, त्यांचे आत्मे मला दिसले. ते परत जिवंत झाले व त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले.
5 पण ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत बाकीचे मेलेले पुन्हा जिवंत झाले नाहीत. हे पहिले पुनरुत्थान होय.
6 ज्याला पहिल्या पुनरुत्थानात भाग आहे, तो आशीर्वादित आणि पवित्र आहे. अशांवर दुसर्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक होतील, आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील.
7 जेव्हा ती हजार वर्षे संपतील तेव्हा सैतानाला त्याच्या कैदेतून सोडण्यात येईल.
8 आणि तो पृथ्वीच्या चारी कोपर्यांतील गोग व मागोग ह्या राष्ट्रांना, लढाईसाठी एकत्र करावे म्हणून तो त्यांना फसवायला बाहेर निघेल. त्यांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी आहे.
9 ते पृथ्वीच्या विस्तारावर गेले आणि त्यांनी पवित्र जनांची छावणी व प्रिय नगरी वेढली. तेव्हा स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने त्यांना गिळून घेतले.
10 आणि त्यांना फसविणार्या सैतानाला अग्नीच्या व गंघकाच्या सरोवरात टाकण्यात आले. तो पशू व तो खोटा संदेष्टा हे तेथेच असून ते रात्रंदिवस सदासर्वकाळ पीडा भोगतील.
11 तेव्हा मी एक, मोठे, शुभ्र राजासन आणि त्यावर जो बसला होता त्याला बघितले. त्याच्या उपस्थितीतून पृथ्वी व आकाश ही पळून गेली, आणि त्यांना कोठेच जागा मिळाली नाही.
12 मग मी मृतांना, लहान व मोठे ह्यांना राजासनासमोर उभे राहिलेले बघितले; आणि तेव्हा पुस्तके उघडली गेली. नंतर आणखी एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे पुस्तक होते. आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींवरून ज्यांच्या त्यांच्या कामांप्रमाणे मृतांचा न्याय करण्यात आला.
13 समुद्राने आपल्यामधील मेलेले होते ते दिले, आणि मृत्यु व मृतलोक ह्यांनीही आपल्यामधील मेलेले होते ते दिले. आणि त्यांच्या कामांप्रमाणे त्यांचा प्रत्येकाचा न्याय करण्यात आला.
14 आणि मृत्यु व मृतलोक अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. हे दुसरे मरण होय. हे अग्नीचे तळे म्हणजे दुसरे मरण.
15 आणि ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले आढळले नाही त्याला अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले.