Philippians 4 in Marathi

1 म्हणून माझ्या प्रियजनहो, मी ज्यांच्यासाठी उत्कंठित आहे ते तुम्ही माझा आनंद व मुगूट आहा; म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा.

2 मी युवदियेला विनंती करतो, आणि सुंतुखेला विनंती करतो की, तुम्ही प्रभूच्या ठायीं एकमनाचे व्हा.

3 आणि हे माझ्या खर्‍या सोबत्या, पण मी तुलाहि विनवितो की, तू ह्या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत असे माझे सहकारी ह्यांच्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले त्यांना साहाय्य कर.

4 प्रभूमध्ये सर्वदाआनंद करा; पुन्हा सांगतो, आनंद करा.

5 सर्व लोकांना तुमची सहनशीलता कळून येवो; प्रभू समीप आहे.

6 कशाविषयीचीहि काळजी करू नका, पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा;

7 म्हणजे सर्व बुध्दीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.

8 बंधूंनो,शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुध्द आहे, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांवर विचार करा.

9 माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे जे ऐकले व पाहिले ते तुम्ही आचरीत राहा, आणि शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील.

10 मला प्रभूमध्ये फार आनंद झाला.आता तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हाला संधी नव्हती.

11 मला काही कमी पडल्यामुळे मी बोलत आहे असे नाही,कारण, मी असेन त्या स्थितीत संतुष्ट राहण्यास शिकलो आहे.

12 दीन अवस्थेत कसे रहावे हे मी जाणतो, आणि विपुलतेत कसे रहावे हेही मी जाणतो; कसेही व कोणत्याही परिस्थितीत, तृप्त होण्यास तसेच उपाशी राहण्यास, विपुलतेत राहण्यास तसेच गरजेत राहण्यास मला शिक्षण मिळाले आहे.

13 आणि मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.

14 पण माझ्या दुःखांत तुम्ही सहभागी झालात हे तुम्ही चांगले केलेत.

15 फिलिप्पैकरांनो, तुम्ही जाणता की, सुवार्तेच्या प्रारंभी जेव्हा मी मासेदोनियामधून निघालो, तेव्हा तुमच्याशिवाय कोणतीच मंडळी माझ्याबरोबर देण्याघेण्याच्या बाबतीत माझी भागीदार झाली नाही.

16 मी थेस्सलनिकांत होतो तेव्हा तुम्ही एकदाच नाही दुसर्‍यांदाही माझी गरज भागविली.

17 मी देणगीची अपेक्षा करतो असे नाही, पण तुमच्या हिशोबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा करतो.

18 पण माझ्याजवळ सर्व काही आहे आणि विपुल आहे, आणि एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळाल्याने मला भरपूर झाले आहे. ते जणू काय सुगंध, असे देवाला मान्य व संतोषकारक अर्पण असे आहे.

19 माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या व्दारे पुरवील.

20 आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.

21 ख्रिस्त येशूतील सर्व पवित्र जनांस सलाम सांगा. माझ्याबरोबरचे बंधु तुम्हाला सलाम सांगतात.

22 सर्व पवित्र जन, आणि विशेषतः कैसराच्या घरचे तुम्हाला सलाम सांगतात.

23 प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.