Philippians 3 in Marathi

1 शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्यें आनंद करा. तुम्हाला पुन्हा लिहिण्यास मी कंटाळा करीत नाही, पण ते तुमच्या सुरक्षीतपणाचें आहे.

2 त्या कुत्र्यांपासून सावध राहा. वाईट काम करणार्‍यांपासून सावध राहा. केवळ दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध राहा.

3 कारण आपण जे देवाच्या आत्म्याने देवाची सेवा करतो, जे ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे, आणि देहावर भरवसा न ठेवणारे ते आपण सुंता झालेलेच आहो.

4 तरी देहावरहि भरंवसा ठेवण्यास मला जागा आहे.आपल्याला देहावर भरंवसा ठेवता येईल असे जर दुसऱ्या कोणाला वाटत असेल तर मला तसे अधिक वाटणार.

5 मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएल लाेकांतला, बन्यामीन वंशातला, इब्र्यांचा इब्री,नियमशास्त्रदृष्टीने परूशी;

6 आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; आणि नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे.

7 तरी मला ज्या गोष्टी लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे.

8 इतकेच नाही,तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी समजतो. त्याच्यासाठी मी सर्व गोष्टींची हानी सोसली. आणि मी त्या केरकचरा लेखतो, ह्यासाठी की, मला ख्रिस्त येशू हा लाभ प्राप्त व्हावा.

9 आणि मी त्याच्याठायी आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे मिळणारे नीतिमत्व नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाव्दारे, म्हणजे देवाकडून विश्वासाव्दारे मिळणारे नीतिमत्व असे असावे.

10 हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्याचे व त्याच्या दुःखांची सहभागिता ह्यांची,त्याच्या मरणाशी एकरूप होऊन, मी आेळख करून घ्यावी.

11 म्हणजे कसेहि करून मी मृतांमधून पुनरूत्थान मिळवावे.

12 मी आताच जणू मिळवले आहे किंवा मी आताच पूर्ण झालो आहे असे नाही. पण मी ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या ताब्यांत घेतले ते मी आपल्या ताब्यांत घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागलो आहे.

13 बंधूंनो, मी ते आपल्या ताब्यांत घेतले असे मानीत नाही, पण मी हीच एक गोष्ट करतो की, मागील गोष्टी विसरून जाऊन आणि पुढील गोष्टींवर लक्ष लावून,

14 ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षिस मिळविण्यासाठी पुढच्या मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम.

15 तर जेवढे आपण प्रौढ आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृति ठेवावी आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृति ठेवली, तरी देव तेही तुम्हाला प्रकट करील.

16 तथापि आपण ज्या विचाराने येथवर मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे.

17 बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरण करणारे व्हा, आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात, त्यांच्याकडे लक्ष द्या.

18 कारण मी तुम्हाला, पुष्कळ वेळा, सांगितले आलो,आणि आता रडत सांगतो की, पुष्कळ जण असे चालतात की, ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत.

19 नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, त्यांच्या निर्लज्जपणा हे त्यांचे भुषण आहे, ते जगिक गोष्टींवर चित्त ठेवतात.

20 आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे; त्याची आपण वाट पाहात आहो.

21 तो ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्यांने तो तुमचे आमचें नीच स्थितीचे शरीर आपल्या गौरवीच्या शरिरासारखे व्हावे म्हणून त्यांचे रूपांतर करील.