Matthew 3 in Marathi

1 त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहूदीयाच्या रानांत येऊन अशी घोषणा करू लागला की,

2 पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.

3 त्याच्याचविषयी यशया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते की, “अरण्यात घोषणा करणार्‍याची वाणी झाली की ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा’; त्याच्या ‘वाटा सरळ करा.”

4 ह्या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते,त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता. आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता.

5 तेव्हा यरुशलेम,सर्व यहूदिया व यार्देनेच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला.

6 त्यांनी आपआपली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला.

7 परंतु परूशी व सदूकी ह्यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यास म्हटले, अहो दुष्ट सापांच्या पिलांनो, होणाऱ्या क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी सावध केले?

8 हयास्तव पश्चात्तापास योग्य असे फळ द्या;

9 आणि अब्राहाम आमचा बाप आहे, असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका; कारण मी तुम्हाला सांगतो, ह्या दगडांपासून अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे;

10 आणि आताच तर झाडांच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते.

11 मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा; परंतु मा‍झ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या चपला उचलून चालण्याची देखील माझी लायकी नाही; तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे .

12 त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझत्या अग्नीने जाळून टाकील.

13 तेव्हा योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरिता येशू गालीलाहून यार्देन नदीवर त्याच्याकडे आला;

14 परंतु योहान त्याला मना करीत म्हणाला, आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा, असे असता आपण माझ्याकडे येता हे कसे ?

15 येशूने त्याला उत्तर दिले, आता हे होऊ दे; कारण ह्या प्रकारे सर्व न्यायीपण पूर्णपणे करणे हे आपणाला योग्य आहे. तेव्हा त्याने तसे होऊ दिले.

16 मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला आणि पाहा, आकाश उघडले; तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबूतरासारखा उतरताना व आपणावर येतांना पाहीला ,

17 आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी फार संतुष्ट आहे.