Matthew 25 in Marathi

1 तेव्हा “त्या दिवसात स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे असेल, त्यांनी त्यांचे दिवे घेतले व वराला भेटण्यास गेल्या.

2 त्यांच्यातल्या पाच मूर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या.

3 मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण दिव्यासाठी तेल घेतले नाही.

4 शहाण्या कुमारींनी दिव्याबरोबर आपल्या भांड्यात तेल घेतले.

5 आता वराला उशीर झाल्याने त्या सर्वांना डुलक्या लागल्या व त्या झोपी गेल्या

6 “मध्यरात्री कोणीतरी घोषणा केली, ‘वर येत आहे! बाहेर जाऊन त्याला भेटा!’

7 “सर्व मुली जाग्या झाल्या आणि त्यांनी आपले दिवे तयार केले.

8 तेव्हा मूर्ख शहाण्यांना म्हणाल्या, ‘तुमच्या तेलातून अाम्हाला द्या. आमचे दिवे विझत आहेत.’

9 “पण शहाण्यांनी उतर देऊन म्हटले ते तुम्हाला आणि आम्हाला कदाचित पुरणार नाही; त्यापेक्षा तुम्ही विकणाऱ्यांकडे जा आणि तुमच्यासाठी विकत घ्या.”

10 त्या तेल विकत घ्यायला गेल्या तेव्हा वर आला. तेव्हा ज्या तयार होत्या त्या मेजवानीसाठी त्याच्याबरोबर आत गेल्या. मग दार बंद झाले.

11 “नंतर दुसऱ्या कुमारींकाही आल्या आणि म्हणाल्या, ‘प्रभूजी!प्रभूजी!आमच्यासाठी दार उघडा!

12 “पण त्यांने उत्तर देऊन म्हटले, ‘मी तुम्हाला खरे सांगतो मी तुम्हाला ओळखत नाही!’

13 “म्हणून नेहमी तयार असा. कारण मनुष्याचा पुत्र कधी येणार तो दिवस व ती वेळ तुम्हाला माहीत नाही.

14 कारण हे दूरदेशी जाणाऱ्या मनुष्यासारखे आहे, ज्याने प्रवासाला जाण्याअगोदर आपल्या नोकरांना बोलावून आपली मालमत्ता त्यांच्या हाती दिली.

15 त्यांच्यातील एकाला त्याने पाच हजार रुपये दिले. दुसऱ्याला त्याने दोन हजार रुपये दिले आणि तिसऱ्याला त्याने एक हजार रुपये दिले. प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्याने पैसे दिले. मग तो आपल्या प्रवासाला गेला.

16 ज्याला पाच हजार रुपये दिले होते त्याने त्याप्रमाणे काम करायला सुरूवात केली आणि आणखी पाच हजार रुपये त्याने मिळविले.

17 त्याचप्रमाणे, ज्याला दोन हजार रुपये मिळाले होते त्याने आणखी दोन हजार रुपये कमवले.

18 पण ज्याला एक हजार मिळाले होते, त्याने जमिनीत एक खड्डा खोदला आणि मालकाचे पैसे त्यात लपवले.

19 “बराच काळ लोटल्यानंतर त्या नोकरांचा मालक आला व त्याने त्यांचा हिशेब घ्यायला सुरुवात केली.

20 ज्याला पाच हजार रुपये मिळाले होते, त्याने मालकाकडे आणखी पाच हजार आणून दिले, तो म्हणाला, ‘मालक, तुम्ही दिलेल्या रुपयांवर मी आणखी पाच हजार रुपये मिळविले.’

21 “त्याचा मालक म्हणाला, ‘शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य नोकर आहेस. त्या थोड्या पैशांचा तू चांगला वापर केलास म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!’

22 “नंतर ज्या मनुष्याला दोन हजार रुपये मिळाले होते, तो मालकाकडे आला आणि म्हणाला, ‘मालक, तुम्ही मला दोन हजार रुपये दिले होते त्यापासून मी आणखी दोन हजार कमवले आहेत.

23 “मालक म्हणाला, ‘चांगल्या आणि विश्वासू दासा! तू थोड्या पैशाविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी तुझी आणखी पुष्कळशा गोष्टींवर नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!

24 “नंतर ज्याला एक हजार रुपये मिळाले होते तो मालकाकडे आला व म्हणाला, ‘मालक, मला माहीत होते की आपण एक कठीण शिस्तीचे मनुष्य आहात. जेथे पेरणी केली नाही तेथे तुम्ही कापणी करता आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेता.

25 मला आपली भीती होती. म्हणून मी जाऊन तुमचे हजार रुपये जमिनीत लपवून ठेवले. हे घ्या! हे तुमचेच आहेत!’

26 “मालकाने उत्तर दिले, ‘अरे वाईट आणि आळशी नोकरा! मी जेथे पेरणी केली नाही तेथे कापणी करतो आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेतो, हे तुला माहीत होते.

27 तर तू माझे पैसे सावकाराकडे ठेवायचे होतेस म्हणजे मी घरी आल्यावर मला व्याजासहित पैसे मिळाले असते.

28 “म्हणून मालकाने दुसऱ्या नोकरांना सांगितले, ‘याच्याजवळचे एक हजार रुपये घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार रुपये आहेत त्याला द्या.

29 कारण आपल्याकडे जे आहे, त्याचा वापर करणाऱ्याला आणखी देण्यात येईल, आणि त्याला त्याच्या गरजेपेक्षा जास्त मिळेल. पण जो आपल्याजवळ असलेल्याचा उपयोग करीत नाही त्याच्याजवळ जे काही असेल ते सर्व त्याजपासून काढून घेण्यात येईल.’

30 नंतर मालक म्हणाला, ‘त्या निकामी नोकराला बाहेरच्या अंधारात टाका. तेथे रडणे व दात खाणे चालेल.’मनुष्याचा पुत्र सर्वांचा न्याय करील.

31 “मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी राजानावर बसेल.

32 मग सर्वं राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र जमतील. त्यांना तो एकमेकांपासून विभक्त करील. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरे शेरडांपासून वेगळी करतो.

33 तो मेंढरांना आपल्या उजवीकडे बसवील पण शेरडांना तो डावीकडे बसवील.

34 “मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे धन्यवादित आहात! हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा.

35 हे तुमचे राज्य आहे कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले

36 मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिलेत. मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतलीत. मी तुरूंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात.

37 “मग जे नीतिमान आहेत ते उत्तर देतील, ‘प्रभू आम्ही तुला केव्हा भुकेला व तहानेला पाहिला आणि तुला खायला आणि प्यायला दिले?

38 आम्ही तुला परका म्हणून कधी पाहिले आणि तुला आत घेतले किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले?

39 आणि तू आजारी असताना आम्ही तुला कधी भेटायला आलो? किंवा तुरूंगात असताना कधी तुझ्याकडे आलो?’

40 “मग राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हाला खरे सांगतो येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.

41 “मग राजा आपल्या डाव्या बाजूच्यांना म्हणेल, ‘माझ्यापासून दूर जा, तुम्ही शापित आहात, अनंतकाळच्या अग्नीत जा. हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे.

42 ही तुमची शिक्षा आहे कारण मी भुकेला होतो पण तुम्ही मला काही खायला दिले नाही, मी तहानेला होतो पण तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही.

43 मी प्रवासी असता माझा पाहुणचार केला नाही. मी वस्त्रहीन होतो. पण तुम्ही मला कपडे दिले नाहीत. मी आजारी आणि तुरूंगात होतो पण तुम्ही माझी काळजी घेतली नाही.

44 “मग ते लोक सुध्दा त्याला उत्तर देतील, ‘प्रभू आम्ही कधी तुला उपाशी अगर तहानेले पाहिले किंवा प्रवासी म्हणून कधी पाहिले? किंवा वस्त्रहीन, आजारी किंवा तुरूंगात कधी पाहिले आणि तुला मदत केली नाही?

45 “मग राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हाला खरे सांगतोः माझ्या अनुयायांतील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा जेव्हा तुम्ही नाकारले, तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करण्याचे नाकारले.’

46 “मग ते अनीतिमान लोक सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील, पण नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगण्यास जातील.”