Matthew 2 in Marathi

1 यहूदीयातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर,हेरोद राजाच्या काळात, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की,

2 जो यहूद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे? आम्ही पूर्वेला त्याचा तारा पाहीला आणि त्याला नमन करावयास आलो आहो.

3 जेव्हा हेरोद राजाने हे ऐकले, तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेले;

4 हेरोदाने लोकांचे सर्व मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक ह्यांना एकत्र जमवून विचारले की, ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार आहे ?

5 ते त्याला म्हणाले,” यहूदीयातील बेथलेहेमात, असे संदेष्ट्याच्या द्वारे लिहिले आहे की,

6 हे बेथलेहेमा,यहूदाच्या प्रांता, तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण तुझ्यातून असा सरदार निघेल जो मा‍झ्या इस्त्राएल लोकांचा सांभाळ करील.”

7 मग हेरोदाने मागी लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा नेमका कधी दिसला ह्याची वेळ विचारून घेतली .

8 त्याने त्यांना बेथलेहेमास पाठवताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बाळकाविषयी बारकाईने शोध करा. व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन.

9 राजाचे हे सांगणे ऐकून ते त्यांच्या वाटेने निघाले आणि जो तारा त्यांनी पूर्वेस पाहीला होता तो,त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला जेथे तो बाळक होता.

10 तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला

11 नंतर ते त्या घरात गेले अणि तो बाळक आपली आई मरीया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहीले व खाली वाकून त्यांनी त्याला नमन केले.त्यांनी आपल्या द्रव्यांच्या थैल्या उघडून सोने, ऊद व गंधरस ही दाने त्याला दिली.

12 देवाने त्यांना हेरोदाकडे परत जाऊ नका, असा स्वप्नांत इशारा दील्यामुळे ते दुसर्‍या मार्गाने आपल्या देशास निघून गेले.

13 ते गेल्यावर, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नांत दर्शन देऊन म्हणाला, ऊठ, बाळक व त्याची आई ह्यांना घेऊन मिसर देशात पळून जा, आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा कारण बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे .

14 त्या रात्री तो उठला आणि बाळक व त्याची आई ह्यांना घेऊन मिसर देशात निघून गेला

15 तो हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला. प्रभूने संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले,”मी आपल्या पुत्राला मिसर देशांतून बोलावले आहे.”

16 तेव्हा मागी लोकांनी आपणाला फसवले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहेमात व आसपासच्या सर्व प्रदेशात जे दोन वर्षांचे व त्याहून कमी वयाचे पुरूष बालके होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जिवे मारले.

17 यिर्मया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते, ते त्या समयी पूर्ण झाले.ते असे:

18 “ रामा येथे रडणे व मोठा आकांत हयांचा शब्द ऐकण्यात आला, राहेल आपल्या मुलांकरता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना.”

19 पुढे हेरोद मरण पावल्यावर, पाहा प्रभूचा दूत मिसर देशांत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला,

20 उठ, बाळकास व त्याच्या आईस घेऊन इस्त्राएल देशास जा कारण बाळकाचा जीव घ्यावयास जे पाहात होते ते मरून गेले आहेत .

21 तेव्हा तो उठला आणि बाळकाला व त्याच्या आईला घेऊन इस्त्राएल देशात आला;

22 परंतु अर्खेलाव हा आपला बाप हेरोद ह्याच्या जागी यहूदीयांत राज्य करीत आहे असे ऐकून तो तेथे जाण्यास घाबरला, आणि स्वप्नांत देवाने इशारा केल्या नंतर तो गालील प्रांतास निघून गेला,

23 व नासरेथ नावाच्या गावी जाऊन राहिला अशासाठी की,”त्याला नासोरी म्हणतील” हे जे संदेष्टयांच्या द्वारे सांगितले ते पूर्ण व्हावे.