Mark 7 in Marathi

1 काही परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक जे यरूशलेमेहून आले होते, येशूभोवती जमले.

2 आणि त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुध्द, म्हणजे हात न धुता जेवताना पाहिले.

3 (कारण परूशी व इतर सर्व यहूदी वाडवडिलांच्या रुढी पाळून विशिष्ट रीतीने नीट हात धुतल्याशिवाय जेवत नाहीत.

4 बाजारातून आणलेली कुठलीही वस्तू धुतल्याशिवाय ते खात नाहीत. त्यांच्या पूर्वजांच्या इतर अनेक चालारीती ते पाळतात आणि प्याले, घागरी, तांब्याची भांडी धुणे अशा दुसऱ्या इतर रुढीही पाळतात).

5 मग परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूला विचारले, “तुझे शिष्य वाडवडिलांच्या रुढी का पाळत नाहीत? हात न धुता का जेवतात?”

6 येशू त्यांना म्हणाला, “यशयाने जेव्हा तुम्हा ढोंगी लोकांविषयी भविष्य केले तेव्हा त्याचे बरोबरच होते. यशया लिहितो, ''हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्याची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत.''

7 ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण ते लोकांना शास्त्र म्हणून जे शिकवतात ते मनुष्यांनी केलेले नियम असतात.’

8 तुम्ही देवाच्या आज्ञांचा त्याग केला असून, आता तुम्ही मनुष्याची परंपरा पाळत आहात.”

9 आणखी तो त्यांना म्हणाला, “ तुम्ही आपल्या परंपरा पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडण्यासाठी सोयिस्कर पध्दत शोधून काढली आहे.

10 मोशेने सांगितले आहे की, ‘तू आपल्या आईवडिलांचा सन्मान कर.’ आणि 'जो मनुष्य आपल्या वडिलांबद्दल किंवा आईबद्दल वाईट बोलतो, त्याला ठार मारलेच पाहिजे.'

11 परंतु तुम्ही शिकविता,'' एखादा मनुष्य आपल्या वडिलांना व आईला असे म्हणू शकतो की तुम्हाला मदत करण्यासाठी माझ्याकडे थोडे फार आहे, परंतु तुम्हाला मदत करण्यासाठी मी ते वापरणार नाही, मी ते देवाला देईल.''

12 तर तुम्ही त्याला त्याच्या वडिलांसाठी किंवा आईसाठी पुढे काहीच करू देत नाही.

13 अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि ह्यासारख्या पुष्कळ गोष्टी करता.”

14 तेव्हा येशूने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, “प्रत्येकाने माझे ऐका, व हे समजून घ्या.

15 बाहेरून मनुष्याच्या आत जाऊन त्याला अपवित्र करील असे काही नाही. तर मनुष्याच्या आतून जे निघते तेच त्याला अशुध्द करतात ” ज्या कोणाला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.''

16 लोकसमुदायाला सोडून येशू घरात गेला तेव्हा शिष्यांनी त्याला या दाखल्याविषयी विचारले,

18 तो त्यांना म्हणाला, “तुम्हालादेखील हे समजत नाही काय?” जे बाहेरून मनुष्याच्या आत जाते ते त्याला अशुध्द करीत नाही हे तुम्हाला समजत नाही का?

19 कारण ते त्याच्या अंतःकरणात जात नाही तर त्याच्या पोटात जाते नंतर ते विष्ठेद्वारे शरीराबाहेर पडते.'' असे सांगून सर्वप्रकारचे अन्न त्याने शुध्द घोषित केले.

20 आणखी तो म्हणाला, “जे माणसाच्या अंतःकरणातून बाहेर पडते ते माणसाला अशुध्द करते.

21 कारण आतून म्हणजे अंतःकरणातून वाईट विचार बाहेर पडतात. जारकर्म, चोरी, खून,

22 व्यभिचार, लोभ, वाईटपणा, कपट, असभ्यता, मत्सर, शिव्यागाळी, अहंकार आणि मूर्खपणा,

23 या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर पडतात आणि माणसाला अशुध्द करतात.”

24 येशू त्या ठिकाणाहून निघून सोर प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला व हे कोणाला कळू नये अशी त्याची इच्छा होती. तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते.

25 पण जिच्या लहान मुलीला अशुध्द आत्मा लागला होता अशा एका स्त्रीने त्याच्या विषयी लगेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली.

26 ती स्त्री ग्रीक होती व सिरीयातील फिनीशिया येथे जन्मली होती. तिने येशूला आपल्या मुलीतून भूत काढण्याची विनंती केली.

27 तो तिला म्हणाला, “प्रथम मुलांना तृप्त होऊ दे कारण मुलांची भाकरी घेऊन कुत्र्याला टाकणे योग्य नव्हे.”

28 परंतु ती त्याला म्हणाली, “प्रभू, कुत्रीसुध्दा मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात.”

29 येशू त्या स्त्रीला म्हणाला, “तुझ्या या उत्तरामुळे तू शांतीने घरी जा. तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.”

30 मग ती घरी आली तेव्हा तिची मुलगी अंथरुणावर पडली आहे व तिच्यातून भूत निघून गेले आहे. असे तिने पाहिले.

31 येशू सोर भोवलालच्या प्रदेशातून परतला आणि सिदोनाहून दकापलीसच्या वाटेने गालील समुद्राकडे आला.

32 तेथे काही लोकांनी एका बहिऱ्या तोतऱ्या मनुष्याला येशूकडे आणले व आपण त्याच्यावर हात ठेवा अशी विनंति केली.

33 येशूने त्याला लोकांपासून एका बाजूस घेऊन त्याच्या कानात आपली बोटे घातली व थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला.

34 त्याने स्वर्गाकडे पाहून उसासा टाकला व म्हणाला, “इफ्फाथा” म्हणजे मोकळा हो.

35 आणि त्याच क्षणी त्याचे कान मोकळे झाले आणि जिभेचा बंद सुटला व त्याला बोलता येऊ लागले.

36 तेव्हा हे कोणाला सांगू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले. परंतु तो त्यांना जसजसे सांगत गेला, तसतसे ते अधिकच जाहीर करत गेले.

37 ते लोक फारच आश्चर्यचकित झाले व म्हणाले, “त्याने सर्व काही चांगले केले आहे. तो बहिऱ्यांना ऐकण्यास आणि मुक्यांना बोलावयास लावतो.”