Mark 5 in Marathi

1 मग ते समुद्राच्या पलीकडे, गरसेकरांच्या देशात आले.

2 तो नावेतून उतरताच अशुध्द आत्मा लागलेला एक माणूस कबरांतून निघून त्याला भेटला.

3 तो कबरात राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते.

4 कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असताही. त्याने साखळदंड तोडून टाकले होते, व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते. आणि त्याला वठणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते.

5 तो नेहमी रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरांमध्ये राहून ओरडत असे, व टोकदार दगडांनी आपले अंग ठेचून घेत असे.

6 येशूला दुरून पाहताच, तो धावत आला व त्याच्या पाया पडला.

7 आणि मोठ्याने ओरडून म्हणाला,'' हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस.''

8 कारण येशू त्याला म्हणत होता, '' अरे अशुध्द आत्म्या, ह्या माणसातून निघ.''

9 त्याने त्याला विचारले, ''तुझे नाव काय?'' त्याने उत्तर दिले, '' माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत.

10 आणि आम्हाला ह्या देशातून घालवू नकोस अशी तो त्याला आग्रहाने विनंती करत होता.

11 तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता.

12 तेव्हा अशुध्द आत्म्यांनी त्याला विनंती केली की,''आम्ही त्या डुकरांत शिरावे, म्हणून त्यांच्याकडे आम्हाला लावून दे.''

13 मग त्याने त्यास परवानगी दिली. तेव्हा ते अशुध्द आत्मे निघून डुकारात शिरले, आणि तो सुमारे दोन हजार डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला व पाण्यात गुदमरून मेला.

14 डुकरे राखणारे पळाले व त्यांनी गावात व शेतमळ्यांत हे वर्तमान सांगितले, तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक आले.

15 ते येशू जवळ आल्यावर तो भूतग्रस्त, म्हणजे ज्यात सैन्य होते तो, कपडे घातलेला आणि शुध्दीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली.

16 ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते, व डुकरांंविषयीची हकीकत त्यांना सांगितली.

17 तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे ते त्याला विनवू लागले.

18 मग तो नावेत जात असता, पूर्वी भूतग्रस्त असलेला मनुष्य त्याला विनंती करू लागला की, मला ही तुमच्या सोबत घ्या.

19 परंतु त्याने त्याला आपल्या सोबत येऊ दिले नाही, तर त्याला म्हटले, '' तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा, आणि प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग.

20 तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलीस प्रांतात जाहीर करू लागला. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले.

21 मग येशू नावेत बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला, आणि तो समुद्राजवळ होता.

22 तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी, आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला.

23 त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली की,'' माझी लहान मुलगी मरायला टेकली आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा.''

24 मग तो त्याच्या बरोबर निघाला तेव्हा पुष्कळ लोक त्याच्यामागून चालत होते, आणि त्याच्या भोवती गर्दी करीत होते.

25 आणि तेथे रक्तस्रावाने बारा वर्षे पीडलेली एक स्त्री होती.

26 तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते तरी तिला काही गुण न येता तिचा रोग अाणखी बळावला होता.

27 येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राला स्पर्श केला.

28 कारण ती म्हणत होती,'' केवळ ह्याच्या वस्त्रांना स्पर्श जरी केला तरी मी बरी होईन.''

29 तेव्हा लगेचच तिचा रक्तस्त्राव थांबला, आणि आपण त्या पीडेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला.

30 अापणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्याठायी लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वाळून म्हटले,'' माझ्या वस्त्रांना कोणी स्पर्श केला?''

31 त्याचे शिष्य त्याला म्हणाले,'' लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करत आहे हे आपण पाहत आहा, तरी आपण म्हणता, मला कोणी स्पर्श केला?

32 मग जिने हे केले होते तिला पाहण्यास त्याने सगळीकडे बघितले.

33 तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले, ते जाणून भीत भीत व कापत कापत त्याच्या कडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृतांत सांगितला.

34 तो तिला म्हणाला,'' मुली,तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो.''

35 तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली ,''आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता?''

36 परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष्य न देता, सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला,'' भिऊ नकोस. विश्वास मात्र धर.''

37 त्याने पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान, ह्यांच्याशिवाय कोणालाही आपल्याबरोबर येऊ दिले नाही.

38 मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आले, तेव्हा रडत असलेल्या व फारच आकांत करीत असलेल्या लोकांची गडबड त्याने पाहिली.

39 तो आत जाऊन त्यास म्हणाला,'' तुम्ही कशाला रडता व गडबड करता? मूल मेले नाही, झोपेत आहे.''

40 तेव्हा ते त्याला हसू लागले. पण त्याने त्या सर्वांना बाहेर काढून दिले. आणि मुलीचे आईबाप व आपल्याबरोबरची माणसे, ह्यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला.

41 नंतर मुलीच्या हातास धरून तो म्हणाला,'' तलीथा कूम,''ह्याचा अर्थ,'' मुली, मी तुला सांगतो, ऊठ.''

42 आणि लगेच ती मुलगी उठून चालू लागली; (कारण ती बारा वर्षाची होती.) ते अत्यंत आश्चर्यचकित झाले.

43 हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली,आणि तिला खाण्यास द्या असे सांगितले.