Mark 2 in Marathi

1 काही दिवसांनी येशू कफर्णहूमास परत आला तेव्हा तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले.

2 तेव्हा इतके लोक जमले की घरात त्यांना जागा उरली नाही, एवढेच नव्हे तर दाराबाहेरदेखील जागा नव्हती. तेव्हा तो त्यांना वचन शिकवीत होता.

3 मग काही लोक त्याच्याकडे पक्षघाती मनुष्याला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते.

4 परंतु गर्दीमुळे त्यांना त्या मनुष्याला येशूजवळ नेता येईना, मग तो होता तेथील त्याच्यावरचे छप्पर त्यांनी काढले व ज्या खाटेवर तो मनुष्य होता. ती खाट त्यांनी छप्परातून खाली सोडता येईल अशी जागा केली व त्या पक्षघाती मनुष्याला खाली सोडले.

5 त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”

6 तेथे काही नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते. ते आपल्या मनात विचार करू लागले की,

7 “हा मनुष्य असे का बोलत आहे? हा दुर्भाषण करीत आहे! देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो?”

8 आणि येशूला त्याच क्षणी त्याच्या आत्म्यात समजले की, ते स्वतःशी असा विचार करीत आहेत. तो त्यास म्हणाला, “तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता?

9 तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, असे या पक्षघाती मनुष्याला म्हणणे किंवा ऊठ आपला बिछाना उचल आणि आपल्या घरी जा, असे म्हणणे; यातील कोणते सोपे आहे.?”

10 परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे समजावे म्हणून, ''तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला''

11 “मी तुला सांगतो, ऊठ, तुझा बिछाना उचल आणि आपल्या घरी जा.”

12 मग तो लगेच उठला. त्याने आपला बिछाना घेतला व सर्वाच्या देखत निघाला; यामुळे ते सर्व आश्चर्यचकित झाले व देवाचे गौरव करत म्हणाले, “ आम्ही असे कधीच पाहिले नव्हते.”

13 येशू पुन्हा समुद्रकिनाऱ्याकडे गेला व पुष्कळ लोक त्याच्याजवळ आले आणि त्याने त्यांना शिक्षण दिले.

14 नंतर तो जात असता त्याने अल्फीचा मुलगा लेवी यास जकात नाक्यावर बसलेले पाहिले. मग येशू लेवीला म्हणाला, “माझ्या मागे ये.” तेव्हा लेवी उठला आणि येशूच्या मागे गेला.

15 नंतर असे झाले की येशू लेवीच्या घरी जेवायला बसला; तेथे बरेच जकातदार व पापी लोकही येशू व त्याच्या शिष्यांबरोबर जेवत होते. कारण ते पुष्कळ असून त्याच्या मागे आले होते,

16 तेव्हा काही नियमशास्त्राचे शिक्षक जे परूशी होते त्यांनी येशूला पापी व जकातदारांबरोबर जेवताना पाहिले. ते त्याच्या शिष्यांना म्हणाले, “हा पापी व जकातदार यांच्याबरोबर का जेवतो?”

17 हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, “ निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमान लोकास नाही, तर पाप्यांना बोलावण्यास आलो आहे.”

18 जेव्हा योहानाचे शिष्य व परूशी उपास करीत होते. ते काहीजण येशूकडे आले आणि त्याला म्हणाले, “योहानाचे शिष्य व परूशी लोक उपास करतात परंतु तुझे शिष्य उपास का करीत नाहीत?”

19 येशू त्यांना म्हणाला, “ वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यत त्यांनी उपास करणे त्यांना शक्य आहे काय? वर आहे तोपर्यत त्यांना उपास करणे शक्य नाही.

20 परंतु असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून घेतला जाईल आणि नंतर ते त्या दिवशी उपास करतील.

21 “कोणी नव्या कापडाचा तुकडा जुन्या कापडाला जोडीत नाही, जर तो असे करतो तर नवे कापड आकसून जाईल व जुन्याला अधिक फाडील व छिद्र मोठे होईल.

22 तसेच नवा द्राक्षारस कोणीही द्राक्षारसाच्या जुन्या कातडी पिशवीत घालीत नाही. जर तो असे करतो तर द्राक्षारस कातडी पिशवीला फाडील आणि द्राक्षारस व द्राक्षारसाची कातडी पिशवी यांचा नाश होईल. म्हणून नवा द्राक्षारस नव्या पिशवीतच घालतात.”

23 नंतर असे झाले की, येशू शब्बाथa दिवशी शेतातून जात असता, त्याचे शिष्य कणसे मोडू लागले.

24 तेव्हा परूशी येशूला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते हे का करतात?”

25 येशू त्यांना म्हणाला, “जेव्हा दावीद व त्याच्याबरोबर असलेल्या लोकांना भूक लागली व त्यांना खावयाला हवे होते. तेव्हा त्यांनी काय केले याविषयी तुम्ही वाचले नाही काय?

26 अब्याथार प्रमुख याजक असताना, तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि देवाला समर्पित केलेल्या भाकरी, ज्या नियमशास्त्राप्रमाणे याजकाशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या कशा खाल्ल्या व जे त्याच्याबरोबर होते त्यांनाही कशा दिल्या, याविषयी तुम्ही वाचले नाही काय?

27 तो त्यास सांगत होता, “शब्बाथ मनुष्यांसाठी करण्यात आला. मनुष्य शब्बाथासाठी करण्यात आला नाही.

28 म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाथाचादेखील प्रभू आहे.