Mark 14 in Marathi

1 वल्हांडण व बेखमीर भाकरीच्या सणाच्या दोन दिवस अगोदर मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक कपटाने त्याला धरून जिवे मारण्याचा मार्ग शोधीत होते.

2 कारण ते म्हणत होते “आपण ते सणात करू नये नाही तर लोक दंगा करतील.”

3 येशू बेथानी येथे शिमोन कुष्ठरोगी याच्या घरी मेजावर जेवायला बसला असता कोणी एक स्त्री वनस्पतीपासून बनवलेल्या शुध्द सुगंधी तेलाची फार मौल्यवान अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिने अलाबास्त्र कुपी फोडली आणि सुगंधी तेल येशूच्या डोक्यावर ओतले.

4 तेथे असलेले काही लोक रागावले, ते एकमेकांना म्हणाले, “सुगंधी तेलाचा असा नाश व्हावा हे बरे नाही.

5 कारण हे सुगंधी तेल तीनशेपेक्षा अधिक किंमतीला विकता आले असते आणि ते पैसे गरीबांना देता आले असते.” त्यांनी तिच्यावर कडक टीका केली.

6 पण येशू म्हणाला, “तिला एकाकी असू द्या. तिला का त्रास देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे.

7 गरीब तर नेहमी तुमच्याजवळ असतील, आणि पाहिजे त्या वेळेला त्यांना मदत करणे तुम्हाला शक्य आहे. परंतु मी नेहमीच तुमच्याबरोबर असेन असे नाही.

8 तिला शक्य झाले ते तिने केले. तिने दफनविधीच्या तयारीच्या काळाअगोदरच माझ्या शरीरावर सुगंधी तेल ओतले आहे.

9 मी तुम्हाला खरे सांगतो सर्व जगात जेथे कोठे सुवार्तेची घोषणा केली जाईल तेथे तिची आठवण म्हणून तिने जे केले ते नेहमीच सांगितले जाईल.”

10 नंतर बारा शिष्यांपैकी एक, यहूदा इस्कर्योत येशूला विश्वासघाताने धरून देण्यासाठी मुख्य याजकांकडे गेला.

11 त्यांना हे ऐकून आनंद झाला. आणि त्यांनी त्याला पैसे देण्याचे वचन दिले. मग यहूदा येशूला धरून त्यांच्या हातात देण्याची संधी पाहू लागला.

12 बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी जेव्हा वल्हांडण सणाचा कोकरा बळी करत असत तेव्हा येशूचे शिष्य त्याला म्हणाले, “आम्ही जातो आणि वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी करतो. आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे?”

13 येशूने आपल्या दोघा शिष्यांना पाठवले आणि त्यांना सांगितले, “शहरात जा, आणि पाण्याचे भांडे घेऊन जाणारा मनुष्य तुम्हाला भेटेल, त्याच्या मागे जा.

14 आणि जेथे तो आत जाईल त्या घराच्या मालकास सांगा, ‘गुरुजी म्हणतात, जेथे मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडण सणाचे भोजन करणे शक्य होईल अशी खोली कोठे आहे?’

15 आणि तो तुम्हाला माडीवरची एक मोठी नीटनेटकी केलेली खोली दाखवील, तेथे आपल्यासाठी तयारी करा.”

16 शिष्य निघाले आणि ते शहरात गेले. आणि येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांना सर्व आढळले. मग त्यांनी वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी केली.

17 संध्याकाळ झाली तेव्हा येशू बारा जणांसह आला.

18 मेजावर बसून ते जेवीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हाला खरे सांगतो, तुमच्यापैकी जो एक जण मला शत्रूच्या स्वाधीन करून देईल, तो माझ्याबरोबर येथे जेवीत आहे.”

19 शिष्य अतिशय खिन्न झाले व प्रत्येक जण त्याला म्हणू लागला, “तो मी आहे का?”

20 तो त्यांना म्हणाला, “बारा जणांपैकी एक जो माझ्याबरोबर ताटात भाकर बुडवत आहे तोच.

21 हाय, हाय, त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात जसे लिहिले आहे, तसा मनुष्याचा पुत्र जाईल, परंतु ज्याच्याकडून मनुष्याचा पुत्र धरून दिला जाईल, त्याचा नाश होवो. तो जन्मला नसता तर ते त्याच्यासाठी बरे झाले असते.”

22 ते भोजन करीत असता येशूने भाकर घेतली, उपकारस्तुती केली, ती मोडली आणि त्यांना दिली. तो म्हणाला, “घ्या, हे माझे शरीर आहे.”

23 नंतर येशूने प्याला घेतला, उपकारस्तुती केली. तो प्याला त्यांना दिला आणि सर्व त्यांतून प्याले.

24 मग येशू म्हणाला, “हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. पुष्कळांसाठी ते ओतले जात आहे.

25 मी तुम्हाला खरे सांगतो की, देवाच्या राज्यात मी नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत मी यापुढे द्राक्षाचा उपज (द्राक्षारस) पिणार नाही.”

26 नंतर त्यांनी उपकारस्तुतीचे गीत गाईले व ते जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले.

27 येशू शिष्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व अडखळून पडाल. कारण असे लिहिले आहे की, ‘मी मेंढपाळास मारीन आणि मेंढरे विखुरली जातील.’

28 परंतु माझे पुनरूत्थान झाल्यावर मी तुमच्यापुढे गालीलात जाईन.”

29 पेत्र म्हणाला, “ जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही.

30 मग येशू त्याला म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज रात्री दोनदा कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”

31 तरीही पेत्र अधिक आवेशाने म्हणाला, “जरी मला आपणाबरोबर मरावे लागले तरी सुध्दा मी आपणाला नाकारणार नाही.” आणि इतर सर्व जण तसेच म्हणाले.

32 नंतर ते गेथशेमाने म्हटलेल्या जागी आले, तेव्हा येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.”

33 येशूने आपल्याबरोबर पेत्र, याकोब व योहान यांना घेतले. दुःख व वेदनांनी त्याचे मन भरून आले.

34 तो त्यांना म्हणाला, “माझा जीव मरणाइतका वेदना सोशीत आहे. येथे राहा व जागृत असा.”

35 त्यांच्यापासून थोडे दूर अंतरावर जाऊन तो जमिनीवर पडला आणि त्याने प्रार्थना केली की, “शक्य असेल तर ही घटका मजपासून टळून जावो.”

36 तो म्हणाला, “अब्बा बापा, तुला सर्व काही शक्य आहे. हा प्याला मजपासून दूर कर तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे कर.”

37 नंतर येशू आला आणि त्यांना झोपलेले पाहिले. तो पेत्राला म्हणाला, “शिमोना, तू झोपी गेलास काय? तासभर तुझ्याच्याने जागे राहवत नाही काय?

38 जागृत राहा आणि प्रार्थना करा म्हणजे तुम्ही परीक्षेत पडणार नाही. आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे.”

39 पुन्हा येशू दूर गेला आणि त्याच गोष्टी उच्चारून त्याने प्रार्थना केली.

40 नंतर तो परत आला व त्याला ते झोपलेले आढळले. कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्याला काय उत्तर द्यावे हे त्यांना कळेना.

41 तो पुन्हा तिसऱ्या वेळेस आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही अजूनही झोपलेले आणि विश्रांति घेत आहात काय? पुरे झाले! आता वेळ आली आहे. मनुष्याचा पुत्र पाप्यांच्या हाती धरून दिला जात आहे.

42 उठा, आपण जाऊ या. पाहा, मला धरून देणारा मनुष्य इकडे येत आहे.”

43 आणि येशू बोलत आहे तोपर्यंत बारा जणांपैकी एक - यहूदा आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील यांनी पाठवलेले अनेक लोक तलवारी व सोटे घेऊन आले.

44 घात करून देणाऱ्याने त्यांना अशी खूण दिली होती की, “मी ज्या कोणाचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्याला धरा आणि बाजूला काढा.”

45 मग यहूदा आल्याबरोबर तो येशूकडे गेला आणि म्हणाला, “गुरूजी!” आणि यहूदाने येशूचे चुंबन घेतले.

46 नंतर त्यांनी त्याच्यावर हात टाकले आणि त्याला अटक केली.

47 तेथे जवळ उभे असलेल्यांपैकी एकाने आपली तलवार काढली आणि प्रमुख याजकाच्या नोकरावर वार करून त्याचा कान कापून टाकला.

48 नंतर येशू त्यांना म्हणाला, “मी लुटारू असल्याप्रमाणे तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन मला पकडायला बाहेर पडलात काय?”

49 मी दररोज मंदिरात शिकवीत असता तुम्हाबरोबर होतो आणि तुम्ही मला अटक केली नाही. परंतु शास्त्रलेख पूर्ण झालाच पाहिजे.”

50 सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.

51 एक तरूण मनुष्य अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्या मागे चालत होता. त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला,

52 परंतु तो तागाचे वस्त्र टाकून उघाडाच पळून गेला.

53 नंतर त्यांनी येशूला तेथून प्रमुख याजकाकडे नेले. आणि सर्व मुख्य याजक, वडील व नियमशास्त्राचे शिक्षक जमा झाले.

54 थोडे अंतर ठेवून पेत्र येशूच्या मागे थेट प्रमुख याजकाच्या वाड्यात गेला. तेथे पेत्र कामदारांबरोबर विस्तवाजवळ शेकत बसला.

55 मुख्य याजक आणि सर्व यहूदी सभा येशूला जिवे मारण्यासाठी पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांना काही मिळेना.

56 पुष्कळांनी त्याच्याविरूध्द खोटी साक्ष दिली. परंतु त्यांची साक्ष सारखी नव्हती.

57 नंतर काही जण उभे राहीले आणि त्याच्या विरूध्द साक्ष देऊन म्हणाले, “आम्ही त्याला असे म्हणताना ऐकले की,

58 “हाताने बांधलेले मंदिर मी पाडून टाकीन आणि हातांनी न बांधलेले असे दुसरे मंदिर तीन दिवसात उभारीन.’

59 परंतु तरीही या बाबतीत त्यांच्या साक्षीत मेळ नव्हता.

60 नंतर प्रमुख याजक त्यांच्यापुढे उभा राहिले आणि त्याने येशूला विचारले, “तू उत्तर देणार नाहीस काय? हे लोक तुझ्याविरुध्द आरोप करताहेत हे कसे?”

61 परंतु येशू गप्प राहिला. त्याने उत्तर दिले नाही. नंतर प्रमुख याजकाने पुन्हा विचारले, “धन्य देवाचा पुत्र तो तू ख्रिस्त आहेस काय?”

62 येशू म्हणाला, “मी आहे, आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेले व आकाशातील मेघांसह येताना पाहाल.”

63 प्रमुख याजकाने आपले कपडे फाडले आणि म्हणाला, “आपणाला अधिक साक्षीदारांची काय गरज आहे?

64 तुम्ही निंदा ऐकली आहे. तुम्हाला काय वाटते?” सर्वांनी त्याला मरणदंड योग्य आहे अशी शिक्षा फर्मावली.

65 काही जण त्याच्यावर थुंकू लागले. त्याचे तोंड झाकून बुक्क्या मारू लागले व त्याला म्हणू लागले, “ओळख बरे, तुला कोणी मारले?” कामदारांनी त्याला ताब्यात घेतले आणि मारले.

66 पेत्र अंगणात असतानाच प्रमुख याजकांच्या दासीपैकी एक तेथे आली.

67 आणि तिने पेत्राला शेकताना पाहिले. तेव्हा तिने त्याच्याकडे निरखून पाहिले व म्हणाली, “तू सुध्दा नासरेथकर येशूबरोबर होतास ना?”

68 परंतु पेत्राने ते नाकारले, आणि म्हणाला, “तू काय म्हणतेस हे मला कळत नाही व समजतही नाही.” पेत्र अंगणाच्या दरवाजाच्या देवडीवर गेला आणि कोंबडा आरवला.

69 जेव्हा दासीने त्याला पाहिले तेव्हा जे लोक तेथे होते त्यांना ती म्हणू लागली की, “हा मनुष्य त्यांच्यापैकीच एक आहे.”

70 पेत्राने पुन्हा ते नाकारले. नंतर थोड्या वेळाने तेथे उभे असलेले लोक पेत्राला म्हणाले, “खात्रीने तू त्यांच्यापैकी एक आहेस, कारण तू सुध्दा गालीली आहेस.”

71 पेत्र स्वतःची निर्भत्सना करीत व शपथ वाहून म्हणाला, “तुम्ही ज्या माणसाविषयी बोलत आहात त्याला मी ओळखत नाही!”

72 आणि लगेच दुसऱ्यांदा कोंबडा आरवला. “दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील,” असे येशू म्हणाला होता याची पेत्राला आठवण झाली व तो अतिशय दुःखी झाला व ढसढसा रडला.