Mark 1 in Marathi

1 देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची ही सुरूवात आहे.

2 यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिल्या प्रमाणे, “पाहा! मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील.

3 अरण्यांत घोषणा करणाऱ्याची वाणी झाली, ''परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा.”

4 त्याप्रमाणेच योहान आला, तो अरण्यांत बाप्तिस्मा देत होता आणि पापांच्या क्षमेसाठी पश्चातापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करीत होता.

5 यहूदीया व यरूशलेम येथील सर्व लोक योहानाकडे आले. त्यांनी आपली पापे कबूल करून त्यांच्यापासून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.

6 योहान उंटाच्या केसांपासून बनवलेली वस्त्रे घालीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याचा पट्टा असून, तो टोळ व रानमध खात असे.

7 तो घोषणा करून म्हणत असे, “माझ्यापेक्षाही महान असा कोणी एक माझ्यामागून येत आहे, आणि मी त्याच्या वहाणांचा बंद लवून सोडण्याच्या देखील पात्रतेचा नाही.

8 मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतो पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील.”

9 त्या दिवसात असे झाले की, येशू गालीलातील नासरेथाहून आला आणि योहानाच्या हातून यार्देनेत येशूचा बाप्तिस्मा झाला.

10 येशू पाण्यातून वर येताना, आकाश उघडलेले आहे आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा उतरत आहे, असे त्याला दिसले.

11 तेव्हा आकाशातून वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी प्रेम करतो. तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”

12 मग आत्म्याने लगेचच त्याला अरण्यांत घालवले.

13 सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यांत चाळीस दिवस राहीला. तो वनपशूंमध्ये होता, आणि देवदूत येऊन त्याची सेवा करीत होते.

14 योहानाला अटक झाल्यानंतर, येशू गालीलास आला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने गाजवली.

15 आणि तो म्हणाला, “आता योग्य वेळ आली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.

16 येशू गालीलाच्या समुद्राजवळून जात असता तेव्हा त्याला शिमोन व शिमोनाचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते.

17 येशू त्यांना म्हणाला, ''माझ्या मागे या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन.''

18 मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले.

19 तेथून काहीसे पुढे गेल्यावर येशूला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे नावेत जाळी नीट करताना दिसले.

20 त्याने लगेच त्यांना हाक मारून बोलावले; मग त्यांनी त्यांचा बाप जब्दी व नोकरचाकर यांना नावेत सोडून त्याच्या मागे गेले.

21 नंतर ते कफर्णहूमास गेले, लगेचच त्याने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले.

22 त्याच्या शिकवणुकीने ते चकित झाले, कारण येशू नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे शिकवीत नव्हता, तर त्याला अधिकार असल्यासारखा शिकवीत होता.

23 त्याचवेळी त्यांच्या सभास्थानात अशुध्द आत्मा लागलेला एक मनुष्य होता, तो एकदम मोठ्याने ओरडला,

24 आणि म्हणाला, “नासरेथच्या येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस ? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे, देवाचा पवित्र तो तूच.

25 परंतु येशूने त्याला धमकावून म्हटले, “शांत राहा व याच्यातून नीघ.”

26 ''नंतर अशुध्द आत्म्याने त्याला पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर निघून गेला.''

27 आणि लोक आश्चर्यचकित झाले, व एकमेकांस विचारू लागले, “येथे काय चालले आहे? हा मनुष्य काही तरी नवीन आणि अधिकाराने शिकवीत आहे. तो अशुध्द आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात!

28 येशूविषयीची ही बातमी ताबडतोब गालीलाच्या सर्व प्रदेशात पसरली.

29 येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लगेच तो योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेला.

30 शिमोनाची सासू तापाने बिछान्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगितले.

31 तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले, आणि तिचा ताप निघून गेला व ती त्याची सेवा करू लागली.

32 संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी आणि भूतांनी पछाडलेल्यास त्याच्याकडे आणले.

33 सर्व शहर दारापुढे जमा झाले.

34 त्याने निरनिराळ्या रोगानी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकांतून भुते काढली. पण त्याने भुतांना बोलू दिले नाही कारण ती त्याला ओळखत होती.

35 मग त्याने अगदी पहाटेस अंधार असतानाच घर सोडले आणि एकांत स्थळी जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली.

36 शिमोन व त्याच्यासोबत असलेले येशूचा शोध करीत होते,

37 व तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, “ आम्ही सर्वजण तुमचा शोध करीत आहेत.”

38 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “आपण जवळपासच्या गावात जाऊ या, म्हणजे मला तेथे देखील उपदेश करणे शक्य होईल. कारण त्यासाठीच मी बाहेर पडलो आहे.”

39 मग तो सर्व गालीलातून, त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत आणि भुते काढीत फिरला.

40 एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची विनंति केली. तो येशूला म्हणाला, '' आपली इच्छा असली तर मला शुध्द करण्यास आपण समर्थ आहात.''

41 येशूला त्याची दया आली, त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले , “माझी इच्छा आहे, शुध्द हो.”

42 आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शुध्द झाला.

43 येशूने त्याला सक्त ताकीद दिली व लगेच जाण्यास सांगितले.

44 आणि म्हटले “पाहा, याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्याला पटावे म्हणून तू आपल्या शुध्दीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर.

45 परंतु तो तेथून गेला व घोषणा करून करून ही बातमी इतकी पसरवली. याचा परिणाम असा झाला की, येशूला उघडपणे शहरात जाता येईना. म्हणून तो बाहेर अरण्यातच राहत असे, आणि तरी चोहोबाजूंनी लोक त्याच्याकडे येत असत.