Luke 24 in Marathi

1 आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या स्त्रिया अगदी पहाटेस कबरेकडे आल्या, आणि त्यांनी स्वतः तयार केलेले मसाले आणले.

2 त्यांना धोंड कबरेवरुन लोटलेला आढळला.

3 त्या आत गेल्या, परंतु त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही.

4 यामुळे त्या अवाक झाल्या असतानाच, अचानक लखलखीत कपडे घातलेले दोन पुरूष त्यांच्या बाजूला उभे राहिले.

5 तेव्हा अतिशय भयभीत होऊन त्यांनी आपले चेहरे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले,जो जिवंत आहे त्याचा शोध तुम्ही मेलेल्यांमध्ये का करता?

6 तो येथे नाही; तो उठला आहे! तो गालीलात असताना त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा.

7 ते असे की, मनुष्याच्या पुत्राला धरुन पापी लोकांच्या हाती द्यावे, त्याला वधस्तंभावर खिळावे आणि तिसऱ्या दिवशी त्याने उठावे.

8 नंतर स्त्रियांना येशूच्या शब्दाची आठवण झाली.

9 त्या कबरेपासून परतल्या आणि त्यांनी या सर्व गोष्टींचे वर्तमान अकरा प्रेषितांना व इतर सर्वांना सांगितले.

10 त्या स्त्रिया मरीया मग्दालिया, योहान्ना, आणि याकोबाची आई मरीया ह्या होत्या. त्या आणि इतर स्त्रियांसुध्दा ज्या त्यांच्याबरोबर होत्या, प्रेषितांना या गोष्टी सांगत होत्या.

11 पण प्रेषितांना त्यांचे सांगणे मूर्खपणाचे वाटले. आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही.

12 पण पेत्र उठला आणि कबरेकडे पळाला. त्याने खाली वाकून पाहिले पण त्याला तागाच्या गुंडाळण्याच्या वस्त्राशिवाय काही आढळले नाही. जे घडले त्याविषयी तो स्वतःशीच आश्चर्य करीत दूर गेला.

13 त्याच दिवशी त्याच्यातील दोघे शिष्य यरुशलेमापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते.

14 ते एकमेकांशी या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी बोलत होते.

15 ते बोलत असताना आणि या गोष्टींची चर्चा करीत असताना येशू स्वतः आला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला.

16 पण त्यांचे डोळे त्याला ओळखण्यापासून बंद करण्यात आले होते.

17 येशू त्यांना म्हणाला, 'चालत असताना तुम्ही एकमेकांबरोबर बोलत आहात त्या गोष्टी कोणत्या आहेत?' चालता चालता ते थांबले. ते अतिशय दु:खी दिसले.

18 त्यांच्यातील एकजण ज्याचे नाव क्लयपा होते, तो त्याला म्हणला, “ह्या दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नसलेले असे यरुशलेमात राहणारे तुम्ही एकटेच आहात काय?”

19 येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या मते कोणत्या गोष्टी?” ते त्याला म्हणाले, नासरेथकर येशूविषयीच्या सर्व गोष्टी. हाच तो मनुष्य जो आपल्या कृत्यांनी आणि शब्दांनी देवासमोर आणि मनुष्यांसमोर एक महान संदेष्टा झाला.

20 आणि आम्ही चर्चा करीत होतो की, कसे आमच्या प्रमुख याजकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्याला मरणदंड भोगण्यासाठी स्वाधीन केले. आणि त्यांनी त्याला वधस्तंभी खिळले.

21 आम्ही अशी आशा केली होती की, तोच एक आहे जो इस्राएलाची मुक्तता करील. आणि या सगळ्याशिवाय हे सर्व घडून गेलेल्या गोष्टीला आज तीन दिवस झालेत.

22 आणि आमच्या परिवारातील काही स्त्रियांनी आम्हाला आश्चर्य चकित केले आहे. आज अगदी पहाटे त्या कबरेकडे गेल्या, परंतु त्यांना त्याचे शरीर सापडले नाही.

23 त्यांनी येऊन आम्हाला सांगितले की, त्यांना देवदूतांचा दृष्टांत घडला आणि देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे.

24 तेव्हा आमच्यातील काही कबरेकडे गेले, आणि स्त्रियांनी जसे सांगितले होते, तसेच त्यांना आढळले, पण त्यांनी त्याला पाहिले नाही.

25 मग येशू त्यांना म्हणाला, संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात.

26 ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?

27 आणि म्हणून त्याने मोशेपासून सुरुवात करून आणि सर्व संदेष्ट्यापर्यंत सांगून, पवित्र शास्त्रात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करून सांगितले.

28 ज्या खेड्याकडे ते जात होते, त्याच्याजवळ ते आले आणि येशूने असा बहाणा केला की, जणू काय तो पुढे जाणार आहे.

29 परंतु जास्त आग्रह करून ते म्हणाले, “आमच्या बरोबर राहा. कारण संध्याकाळ झालीच आहे. आणि दिवसही मावळला आहे.” मग तो त्यांच्याबरोबर राहावयास आत गेला.

30 जेव्हा तो त्यांच्याबरोबर जेवायला मेजासभोवती बसला, त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले. नंतर त्याने ती मोडली व ती त्यांना तो देऊ लागला.

31 तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्याला ओळखले. पण तो त्यांच्यातून अदृश्य झाला.

32 मग ते एकमेकांना म्हणू लागले, तो वाटेवर आपणाशी बोलत असताना व शास्त्राचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंत:करणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?

33 मग ते लगेच उठले, व यरूशलेमेस परत गेले. तेव्हा त्यांना अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर असलेले इतर एकत्र जमलेले आढळले.

34 प्रेषित आणि इतरजण म्हणाले, “खरोखर प्रभू उठला आहे! आणि शिमोनाला दिसला आहे.”

35 नंतर त्या दोन शिष्यांनी वाटेत काय घडले ते त्यांना सांगितले आणि तो भाकर मोडत असताना त्यांनी त्याला कसे ओळखले ते सांगितले.

36 ते या गोष्टी त्यांना सांगत असतानाच येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यास म्हणाला, “तुम्हास शांती असो.”

37 ते दचकले आणि भयभीत झाले. त्यांना असे वाटले की, ते भूत पाहत आहेत.

38 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही असे अस्वस्थ का झालात? तुमच्या मनात शंका का निर्माण झाल्या?

39 माझे हात व पाय पाहा तुम्हाला मी दिसतो तोच मी आहे. मला स्पर्श करा आणि पाहा की, मला आहे तसे हाडमांस भुताला नसते.

40 असे बोलून त्याने त्यास आपले हातपाय दाखवले. तरीही त्यांच्या आनंदामुळे त्यांना ते खरे वाटेना.

41 ते आश्चर्यचकित झाले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “येथे तुमच्याजवळ खाण्यासाठी काय आहे?”

42 मग त्यांनी त्याला भाजलेला माशाचा तुकडा दिला.

43 त्याने तो घेतला व त्यांच्यासमोर खाल्ला.

44 तो त्यांना म्हणाला, “ह्याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हांबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, भविष्यवादी आणि स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.”

45 नंतर शास्त्र समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली.

46 मग तो त्यांना म्हणाला, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख भोगावे आणि मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी उठावे,

47 आणि यरुशलेमापासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापांची क्षमा गाजविण्यात यावी.

48 या गोष्टींचे तुम्ही साक्षी आहात.

49 पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत ह्या शहरात राहा,

50 नंतर तो त्यांना बाहेर दूरवर बेथानीपर्यंत घेऊन गेला आणि त्याने हात वर करून आशीर्वाद दिला.

51 तो आशीर्वाद देत असतानाच तो वर आकाशात घेतला गेला.

52 नंतर त्यांनी त्याची उपासना केली व ते मोठ्या आनंदाने यरुशलेमाला परतले.

53 आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करत राहिले.