Luke 14 in Marathi

1 एका शब्बाथ दिवशी तो परुश्यांच्या पुढाऱ्यापैकी एकाच्या घरी जेवावयास गेला, तेव्हा तेथे जमलेले लोक येशूवर बारकाईने नजर ठेवून होते.

2 आणि तेथे त्याच्यासमोर जलोदर झालेला एक मनुष्य होता.

3 येशूने नियमशास्त्राच्या शिक्षकांना व परुश्यांना विचारले, शब्बाथ दिवशी बरे करणे नियमशास्त्राला धरुन आहे की नाही?

4 परंतु ते गप्पच राहिले. तेव्हा येशूने त्या आजारी माणसाला धरुन त्याला बरे केले व त्याला पाठवून दिले.

5 मग तो त्यांना म्हणाला, जर तुमच्यापैकी एखाद्याला एक मुलगा किंवा एक बैल आहे व तो विहीरीत पडला, तर शब्बाथ दिवशी तुम्ही त्याला ताबडतोब बाहेर काढणार नाही काय?

6 आणि ह्या प्रश्नाला उत्तर देणे त्यांना जमले नाही.

7 नंतर, आमंत्रित पाहुणे स्वतः:साठी मानाच्या जागा कसे शोधीत होते हे पाहून, त्याने त्यांना एक दाखला सांगितला, तो म्हणाला,

8 जेव्हा एखादा तुम्हाला लग्नाच्या मेजवानीला आमंत्रित करील, तेव्हा मानाच्या आसनावर बसू नका. कारण तुमच्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या माणसाला त्याने कदाचित आमंत्रण दिले असेल.

9 मग ज्याने तुम्हा दोघांना आमंत्रित केले आहे तो येईल, आणि तुम्हाला म्हणेल, “या माणसाला तुझी जागा दे.’ मग अपमानित होऊन तुम्हाला खालच्या जागी बसावे लागेल.

10 पण जेव्हा तुम्हाला आमंत्रित केलेले असेल, तेव्हा जा आणि अगदी खालच्या (शेवटच्या) जागी जाऊन बसा. यासाठी की, जेव्हा यजमान येईल, तेव्हा तो तुम्हाला म्हणेल, “मित्रा, वरच्या आसनावर येऊन बैस.’ तेव्हा तुझ्या पाहुण्यांसमोर तुझा मान होईल.

11 कारण जो कोणी स्वतः:ला उंच करतो तो नमवला जाईल व जो स्वतः:ला नमवतो तो उंच केला जाईल.”

12 मग ज्याने आमंत्रण दिले होते त्याला तो म्हणाला, तू जेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी भोजनास बोलावशील तेव्हा तुझ्या मित्रांना, भावांना, किंवा तुझ्या नातेवाईकांना वा श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नको, कारण तेही तुला परत आमंत्रण देतील व अशा रीतीने तुझ्या आमंत्रणाची परतफेड केली जाईल.

13 पण जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, लंगडे, पांगळे, आंधळे यांना आमंत्रण दे.

14 म्हणजे तुला आशीर्वाद मिळतील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही नाही. तर नीतीमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल.

15 मेजाभोवती बसलेल्यांपैकी एकाने जेव्हा हे ऐकले, तेव्हा तो येशूला म्हणाला, जो देवाच्या राज्यात भाकर खाईल, तो प्रत्येक जण धन्य!

16 मग येशू त्याला म्हणाला, एक मनुष्य एका मोठ्या मेजवानीची तयारी करीत होता. त्याने पुष्कळ लोकांना आमंत्रण दिले.

17 भोजनाच्या वेळी ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना या, कारण सर्व तयार आहे असा निरोप सांगण्यासाठी नोकराला पाठवले.

18 ते सर्वजण सबब सांगू लागले. पाहिला त्याला म्हणाला, मी शेत विकत घेतले आहे आणि मला जाऊन ते पाहिले पाहिजे. कृपा करून मला क्षमा कर.

19 दुसरा म्हणाला, मी बैलाच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहोत व त्या कशा आहेत हे बघण्यासाठी मी चाललो आहे, कृपा करून मला क्षमा कर.

20 आणखी तिसरा म्हणाला, “मी लग्न केले आहे, व त्यामुळे मी येऊ शकणार नाही.

21 तो नौकर परत आला, व त्याने आपल्या मालकाला या गोष्टी सांगितल्या. मग घराचा मालक रागावला आणि नोकराला म्हणाला, बाहेर रस्त्यावर आणि नगरातल्या गल्ल्यांमध्ये लवकर जा व गरीब, आंधळे, असहाय्य, लंगडे यांना घेऊन इकडे ये!

22 नौकर म्हणाला, मालक, आपल्या आज्ञेप्रमाणे केले आहे. आणि तरीही अाणखी जागा रिकाम्या आहे.

23 मालक नौकराला म्हणाला, रस्त्यावर जा, कुंपणाजवळ जा आणि तेथे असलेल्या लोकांना आग्रहाने आत येण्यास सांग म्हणजे माझे घर भरून जाईल.

24 कारण मी तुम्हाल सांगतो की, त्या आमंत्रित माणसांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखायला मिळणार नाही.

25 मोठ्या संख्येने लोक येशूबरोबर चालत होते. तो त्यांच्याकडे वळाला व म्हणाला,

26 जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वतः:च्या जिवाचासुध्दा व्देष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही.

27 जो कोणी स्वतः:चा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येणार नाही, तो माझा शिष्य होऊ शकणार नाही.

28 जर तुम्हांपैकी कोणाला बुरुज बांधायचा असेल तर तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करून तो पूर्ण करावयास त्याच्याजवळ पुरेसे पैसे आहे की नाही हे पाहणार नाही काय?

29 नाहीतर कदाचित तो पाया घालील आणि पूर्ण करू शकणार नाही. आणि जे पाहणारे आहेत ते त्याची थट्टा करतील आणि म्हणतील,

30 या मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली पण पूर्ण करू शकला नाही!’

31 किंवा एक राजा दुसऱ्या राजाबरोबर लढाई करण्यास निघाला, तर तो अगोदर बसून याचा विचार करणार नाही का? की, त्याच्या दहा हजार मनुष्यांनिशी त्याच्या शत्रूशी, जो वीस हजार सैन्यानिशी चालून येत आहे, त्याला मुकाबला करता येणे शक्य आहे काय?

32 जर तो त्याला तोंड देऊ शकणार नसेल, तर त्याचा शत्रू दूर अंतरावर असतानाच तो मध्यस्थ पाठवून शांततेसाठी सलोख्याचे बोलणे सुरू करील.

33 त्याच प्रकारे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येणार नाही.

34 “मीठ चांगले आहे, पण मिठाची जर चव गेली, तर त्याला खारटपणा कशाने येईल?

35 ते पूर्णपणे निरुपयोगी ठरेल व लोक ते फेकून देतील.ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको!