Luke 13 in Marathi

1 त्यावेळी येशूला, तेथे उपस्थित लोकांनी, पिलाताने गालीलातील मनुष्यांचे रक्त त्यांच्याच यज्ञपशूंच्या रक्तात कसे मिसळले होते, त्या विषयी सांगितले,

2 त्याने त्यांना उत्तर दिले, “ह्या गालीलकरांनी हे जे दु:ख भोगले त्यावरुन ते इतर गालीलकरांपेक्षा जास्त पापी होते,असे तुम्हाला वाटते का?

3 मी तुम्हास सांगतो की असे नाही, जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मेले तसे तुम्हीही मराल.

4 किंवा ज्यांच्यावर शिलोहाचा बुरुज पडला व त्याखाली दबून मारले गेलेले ते अठरा जण यरूशलेम येथे राहणाऱ्या ईतर सर्व लोकांपेक्षा अधिक दोषी होते असे तुम्हाला वाटते का?

5 नाही, मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही पश्चत्ताप केला नाही तर तुम्ही सर्व जण त्यांच्यासारखे मराल.”

6 नंतर त्याने ही बोधकथा सांगितली, “एका माणसाने त्याच्या बागेत अंजिराचे झाड लावले होते, त्यावर काही फळ असेल म्हणून तो ते पाहावयास आला परंतु त्याला काहीही आढळले नाही.

7 म्हणून तो माळ्याला म्हणाला, पाहा, या अंजिराच्या झाडावर फळ पाहण्यासाठी मी गेल्या तीन वर्षांपासून येत आहे, परंतु मला त्यावर काही आढळत नाही. ते तोडून टाक. उगाच त्याने जागा तरी का अडवावी?’

8 माळ्याने उत्तर दिले, “मालक, हे एवढे एक वर्षभर ते राहू द्या. म्हणजे मी त्याच्याभोवती खणून त्याला खत घालीन.

9 मग येत्या वर्षात फळ आले तर छानच! जर आले नाही तर मग आपण ते तोडून टाकावे.”

10 आणि शब्बाथ दिवशी येशू एका सभास्थानात शिकवीत होता.

11 तेथे एक स्त्री होती, तिला अशुध्द आत्म्याने अठरा वर्षांपासून अपंग केले होते. ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते.

12 येशूने तिला पाहून तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, बाई, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस!

13 नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ नीट झाली. आणि ती देवाची स्तुती करू लागली.

14 नंतर, येशूने तिला बरे केले होते तो शब्बाथाचा दिवस होता म्हणून सभास्थानाचा अधिकारी त्याच्यावर रागावला. तो लोकांना म्हणाला, “काम करण्यासाठी सहा दिवस आहेत म्हणून या सहा दिवसांमध्ये या व बरे व्हा. पण शब्बाथ दिवशी येऊन बरे होऊ नका.”

15 येशूने त्याला उत्तर दिले, आणि म्हणाला. ढोंग्यांनो, तुम्हांपैकी प्रत्येक जण त्याच्या बैलाला व गाढवाला शब्बाथ दिवशी त्याच्या ठिकाणाहून सोडून पाणी पाजायला घेऊन जात नाही का?

16 ही तर अब्राहामाची कन्या आहे. सैतानाने हिला अठरा वर्षे बांधून ठेवले होते. त्या बंधनातून तिला शब्बाथ दिवशी सोडविणे चूक होते काय?

17 तो असे म्हणाल्यावर त्याचा विरोध करणाऱ्यांना लाज वाटली व त्याने ज्या अद्भुत गोष्टी केल्या होत्या त्यामुळे सगळा समुदाय आनंद करू लागला.

18 मग तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? आणि मी त्याला कशाची उपमा देऊ.

19 देवाचे राज्य एका मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो मोहरीचा दाणा एका मनुष्याने घेतला व आपल्या बागेत लावला व ते वाढून त्याचे मोठे झाड झाले आणि आकाशातील पाखरांनी त्याच्या फांद्यांवर घरटी बांधली.

20 तो पुन्हा म्हणाला, “मी देवाच्या राज्याला आणखी कशाची उपमा देऊ?

21 ते खमिरासारखे आहे. एका स्त्रीनेे तीन मापे पिठात खमिर मिसळले आणि ते सर्व खमिरामुळे फुगले.

22 येशू यरुशलेमाच्या दिशेने वाटचाल करीत असता, गांवागांवातून आणि खेड्यापाड्यांतून तो लोकांना शिकवीत होता.

23 कोणीतरी त्याला विचारले, “प्रभू, अगदी थोड्याच लोकांचे तारण होईल का?”तो त्यांना म्हणाला,

24 अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हाला सांगतो की, पुष्कळ जण आत येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते शक्य होणार नाही.

25 घराच्या मालकाने उठून दार बंद केल्यावर, तुम्ही बाहेर उभे राहाल व दार ठोठवाल. आणि म्हणाल, प्रभू, आम्हांसाठी दार उघडा!’ परंतु तो तुम्हाला उत्तर देईल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही.

26 नंतर तुम्ही म्हणाल, आम्ही तुमच्याबरोबर जेवलो, आम्ही तुमच्याबरोबर प्यालो, आमच्या रस्त्यावर तुम्ही शिक्षण दिले!

27 आणि तो तुम्हाला म्हणेल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही, दुष्टपणा करणाऱ्यांनो तुम्ही सर्व माझ्यापासून दूर व्हा

28 तेथे रडणे व दात खाणे चालेल, तेव्हा तुम्ही अब्राहामाला, आणि इसहाकाला आणि याकोबाला आणि सर्व संदेष्ट्यांना देवाच्या राज्यामध्ये पाहाल, पण तुम्ही स्वतः: मात्र बाहेर टाकलेले असाल.

29 आणि लोक पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून येतील व देवाच्या राज्यात मेजासभोवती आपापल्या जागेवर बसतील.

30 जे शेवटचे आहेत ते पहिले होतील, व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील, हे लक्षात ठेवा.

31 त्यावेळी काही परूशी येशूकडे आले. आणि ते त्याला म्हणाले, येथून निघा व दुसरीकडे कुठे तरी जा, कारण हेरोद तुम्हाला ठार मारणार आहे.

32 येशू त्यांना म्हणाला, “जा आणि त्या कोल्ह्याला सांगा, ऐक, मी लोकांतून भुते काढीन, आज व उद्या रोग बरे करीन आणि तिसऱ्या दिवशी माझे काम संपवीन.

33 तरीही आज, उद्या आणि परवा मला पुढे गेले पाहिजे कारण संदेष्टा यरुशलेमाबाहेर मारला जावा हे शक्य नाही.

34 “यरुशलेमे, यरुशलेमे, जी तू संदेष्टयांना मारतेस व देवाने पाठविलेल्यांवर दगडमार करतेस! कोंबडी जशी पिलांना आपल्या पंखाखाली एकवटते तसे कितीतरी वेळा तुम्हा लोकांना एकवटण्याची माझी इच्छा होती, पण तुमची तशी इच्छा नव्हती.

35 पाहा, देवाने तुमच्या घराचा त्याग केला आहे. मी तुम्हाला सांगतो, देवाच्या नावाने येणारा धन्यवादित असो’ असे म्हणण्याची वेळ येईपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही.