Luke 11 in Marathi

1 मग असे झाले की, तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता. ती संपल्यावर शिष्यांपैकी एक जण त्याला म्हणाला, प्रभू, जसे योहानाने त्याच्या शिष्यांना शिकवले; त्याचप्रमाणे तुम्ही देखिल आम्हाला प्रार्थना करायला शिकवा.”

2 मग तो त्यांना म्हणाला, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असे म्हणा:हे आमच्या स्वर्गातील ‘बापा, तुझे नांव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो,

3 आमची दररोजची लागणारी भाकर आम्हास दे,

4 आमच्या पापांची आम्हाला क्षमा कर, कारण आम्हीही आमच्या प्रत्येक अपराध्याला त्यांच्या अपराधांची क्षमा करतो. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाइटापासून सोडीव.”‘

5 मग येशू त्यास म्हणाला, “समजा तुमच्यापैकी असा कोण आहे ज्याला मित्र आहे आणि तो त्याच्याकडे मध्यरात्री गेला व त्याला म्हणाला, “मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे,

6 कारण माझा मित्र नुकताच प्रवास करून माझ्याकडे आला आहे. आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काहीही नाही.’

7 आणि तो मनुष्य आतून म्हणाला, “मला त्रास देऊ नको! मी अगोदरच दार लावलेले आहे. आणि माझी मुले माझ्याजवळ झोपलेली आहेत. मी तुला भाकर देण्यासाठी उठू शकत नाही.’

8 मी तुम्हाला सांगतो की, जरी तो उठून त्याला काही देण्यासाठी टाळाटाळ करीत असेल तरी त्याच्या मित्राच्या आग्रहामुळे तो खात्रीने उठून त्याला जितक्या भाकरींची गरज आहे तितक्या त्याला देईल.

9 आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल आणि ठोका म्हणजे तुम्हांसाठी उघडले जाईल.

10 कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल. जो कोणी शोधतो त्याला सापडेल, आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल.

11 तुम्हांमध्ये असा कोण पिता आहे की, त्याच्या मुलाने त्याला मासा मागितला असता त्यास माशाऐवजी साप देईल?

12 किंवा जर मुलाने अंडे मागितले तर कोणता पिता त्याला विंचू देईल?

13 जर तुम्ही वाईट असतांनाही तुम्हाला तुमच्या मुलांना चांगल्या देणग्या देेण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषकरून पवित्र आत्मा देईल?”

14 येशू एक भूत काढीत होता. ते मुकें होते. मग असे झाले की, जो मनुष्य बोलू शकत नव्हता ते, भूत बाहेर आल्यावर,तो बोलू लागला व लोकांचा जमाव अाश्चर्यचकित झाला.

15 परंतु त्या जमावातील काही लोक म्हणाले की, भुतांचा प्रमुख जो बालजबूल याच्या साहाय्याने तो भुते काढतो.

16 आणि काहींनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी स्वर्गातून चिन्ह मागितले.

17 पण त्यांच्या मनात काय होते हे तो जाणून होता म्हणून तो त्यांना म्हणाला, “आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि एखाद्या घरातील लोक एकमेकांविरुध्द भांडतात तेव्हा त्या घराचे तुकडे होतात.

18 आणि तुम्ही म्हणता तशी जर भुतांमध्येही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? मी तुम्हाला हे विचारतो, कारण तुम्ही म्हणता मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो.

19 पण जर मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, तर तुमचे शिष्य कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? म्हणून तेच तुमचा न्याय करतील.

20 परंतु जर मी देवाच्या साहाय्याने भुते काढतो, तर मग यावरुन हे स्पष्टच आहे की, देवाचे राज्य तुमच्याकडे आले आहे.

21 जेव्हा एखादा बलवान मनुष्य आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण शस्त्रसामग्री बाळगतो तेव्हा त्याची मालमत्ता सुरक्षित राहते.

22 परंतु कोणी त्याच्याहीपेक्षा अधिक बलवान त्याच्यावर हल्ला करून त्याचा पराभव करतो, तेव्हा ज्या शस्त्रसामग्रीवर त्याने भरंवसा ठेवला होता, ती तो घेऊन जातो व त्याला मिळालेली लूट आपल्या मित्रांना वाटतो.

23 जो माझ्या पक्षाचा नाही, तो माझ्याविरुध्द आहे आणि जो माझ्याबरोबरीने गोळा करीत नाही, तर तो उधळून टाकतो.

24 जेव्हा भूत मनुष्याबाहेर येते व ते विसावा घेण्यासाठी निर्जल प्रदेशात जागा शोधते. पण त्याला ती विश्रांती मिळत नाही. तेव्हा तो म्हणतो, “मी ज्या घरातून बाहेर आलो त्या घरात परत जाईन.’

25 तो त्या घराकडे परत जातो आणि तेव्हा त्याला ते घर झाडून नीटनेटके केलेले आढळते.

26 नंतर तो जातो आणि आपणापेक्षा अधिक बळकट व दुष्ट असे सात आत्मे घेतो, आणि ते त्या घरात जातात आणि तेथेच राहतात. तेव्हा त्या मनुष्याची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.”

27 तो या गोष्टी बोलला तेव्हा असे घडले की, गर्दीतील एक स्त्री मोठ्याने ओरडून त्याला म्हणाली, धन्य ते गर्भाशय, ज्याने तुझा भार वाहिला व धन्य ती स्तने जी तू चोखलीस!”

28 परंतु तो म्हणाला, “जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच खरे आशीर्वादित!”

29 जसजसा लोकसमुदाय वाढू लागला, तेव्हा तो बोलू लागला, ही पिढी दुष्ट पिढी आहे. ती चिन्ह मागत आहे, आणि योनाच्या चिन्हाशिवाय कोणतेही चिन्ह तिला दिले जाणार नाही.

30 कारण जसा योना निनवेच्या लोकांकरिता चिन्ह होता तसा मनुष्याचा पुत्रही या पिढीसाठी चिन्ह होईल.

31 दक्षिणेकडची राणी न्यायाच्या दिवशी या पिढीबरोबर उठून त्यांना दोषी ठरवील. कारण ती पृथ्वीच्या टोकाकडून शलमोनाचे शहाणपण ऐकण्यासाठी आली, आणि पाहा, शलमोनापेक्षाही थोर असा एक येथे आहे.

32 न्यायाच्या दिवशी निनवेचे लोक या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील. कारण योनाचा उपदेश ऐकून त्यांनी पश्चाताप केला आणि पाहा, योनापेक्षाही थोर असा एक येथे आहे.

33 कोणीही दिवा लावून तळघरात किंवा भांड्याखाली ठेवत नाहीत, तर आत येणाऱ्यांना प्रकाश दिसवा म्हणून तो दिवठणीवर ठेवतात.

34 डोळा हा तुमच्या शरीराचा दिवा आहे. जर तुमचे डोळे चांगले आहेत, तर तुमचे शरीरही प्रकाशाने भरलेले आहे.

35 पण ते जर वाईट आहेत तर तुमचे शरीर अंधकारमय आहेत म्हणून तुमच्यातला प्रकाश हा अंधार तर नाही ना, याची काळजी घ्या.

36 जर तुमचे सर्व शरीर प्रकाशमय आहे आणि त्याच्यातील कोणताही भाग अंधकारमय नाही तर, जशी दिव्याची प्रकाशकिरणे तुला प्रकाश देतात, तसे ते तुला पूर्णपणे प्रकाशीत करील.”

37 येशूने आपले बोलणे संपविले तेव्हा एका परुश्याने त्याला आपल्या घरी येऊन स्वतः: बरोबर जेवायला बोलाविले. तो आत गेला आणि आपल्या जागी जेवायला बसला.

38 परंतु त्याने जेवणापूर्वी हात धुतले नाहीत हे पाहून परुश्याला फार आश्चर्य वाटले.

39 तेव्हा प्रभू त्याला म्हणाला, “तुम्ही परूशी प्याला व ताट बाहेरुन स्वच्छ करता पण तुम्ही आतून लोभीपणाने व दुष्टतेने भरलेले आहात.

40 अहो बुध्दीहीन मनुष्यांनो! ज्याने बाहेरील बाजू बनवली त्यानेच आतली बाजू बनवली नाही का?

41 पण जे आतमध्ये आहे, ते गरीबांना द्या. आणि नंतर सर्व काही तुमच्यासाठी स्वच्छ होईल.

42 परंतु तुम्हा परुश्यांना हायहाय असो कारण तुम्ही पुदिना, जीरे व प्रत्येक भाजीपाल्याचा दशांश देता. परंतु तुम्ही न्याय आणि देवाविषयीचे प्रेम याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही नितीने जगावे व देवावर प्रेम करणे या गोष्टी प्रथम करणे आवश्यक आहे त्याचवेळेस इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये.

43 तुम्हा परुश्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्हाला सभास्थानातील महत्त्वाच्या जागी बसणे आणि बाजारात नमस्कार घेणे आवडते.

44 तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही न दिसणाऱ्या कबंरासारखे आहात, अशा कबरांवर लोक नकळत पाय देऊन चालतात.

45 नियमशास्त्राचा एक शिक्षक येशूला म्हणाला, “गुरुजी, तुम्ही असे बोलता तेव्हा तुम्ही आमचासुध्दा अपमान करता.

46 तेव्हा येशू म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचाही धिक्कार असो, कारण तुम्ही लोकांना वाहण्यास कठीण असे ओझे त्यांच्यावर लादता व ते उचलण्यास तुमच्या एका बोटानेसुध्दा मदत करीत नाही.

47 तुमचा धिक्कार असो, कारण तुमच्या पूर्वजांनी ठार केलेल्या भविष्यवाद्यांसाठी तुम्ही कबरा बांधता.

48 असे करून तुमच्या पूर्वजांनी केलेल्या कृत्यांचे समर्थन करता.

49 यामुळे देवाचे ज्ञानसुध्दा असे म्हणाले, “मी प्रेषित व संदेष्टे त्यांच्याकडे पाठवील. त्यांपैकी काही जणांना ते ठार मारतील व काही जणांचा ते छळ करतील!’

50 तर, भविष्यवाद्यांचे जे रक्त जगाच्या प्रारंभापासून सांडले गेले त्याबद्दलचा दंड या पिढीस भरून द्यावा लागेल.

51 होय, मी तुम्हास खरोखर सांगतो की, हाबेलाच्या रक्तापासून ते देवाचे मंदिर व वेदी यांच्यामध्ये मारल्या गेलेल्या, जखऱ्या याच्या रक्तापर्यंत या पिढीला जबाबदार धरण्यात येईल.

52 तुम्हा शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला, तुम्ही स्वतः: आत गेला नाहीत आणि जे आत जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनाही जाऊ दिले नाही.

53 येशू तेथून निघून जात असता नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी त्याचा फार विरोध करू लागले व त्याला अनेक गोष्टींविषयी प्रश्न विचारु लागले.

54 तो जे बोलेल त्या शब्दांमध्ये त्याला पकडण्यासाठी ते टपून होते.