Luke 1 in Marathi

1 पुष्कळ लोकांनी आमच्यामध्ये घडलेल्या घटनांची नोंद करण्याचा प्रयत्न केला आहे.

2 जे सुरुवातीपासून त्याचे प्रत्यक्ष साक्षी आणि त्या वचनाचे सेवक झाले, त्यांनीच आम्हाला ह्या गोष्टी कळविल्या .

3 म्हणून, हे थियफिला महाराज, मी काळजीपूर्वक सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आहे, म्हणून मला असे वाटले की, या सर्व घटनांविषयी आपणाला व्यवस्थित माहिती लिहावी.

4 हे तू जाणून घ्यावेस अशी माझी इच्छा आहे की, आपल्याला ज्या गोष्टींचे शिक्षण मिळाले आहे त्यांचा निश्चितपणा आपल्याला कळावा.

5 यहूदीयाचा राजा हेरोद याच्या दिवसांत, जखऱ्या नावाचा कोणी एक याजक होता. तो अबीयाच्या याजक गटातील होता. त्याची पत्नी अहरोनाच्या वंशातील असून तिचे नाव अलीशिबा होते.

6 ते दोघेही देवापुढे नीतिमान होते आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधीत निर्दोषपणे चालत असत

7 परंतु त्यांना मूल नव्हते कारण अलीशिबा वांझ होती, शिवाय दोघेही फार म्हातारे झाले होते.

8 एकदा असे झाले की, तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे त्याचे याजकाचे काम करत असता,

9 याजकपदाच्या रीतीप्रमाणे मंदिरात देवापुढे धूप जाळण्यासाठी चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली.

10 आणि लोकांचा सगळा जमाव धूप जाळण्याच्या वेळेस बाहेर प्रार्थना करीत उभा होता.

11 तेव्हा देवाचा दूत, धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला.

12 त्याला पाहून जखऱ्या अस्वस्थ व भयभीत झाला.

13 परंतु देवदूत त्याला म्हणाला, जखऱ्या, भिऊ नको, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे, आणि तुझी बायको अलिशिबा हिच्याकडून तुला पुत्र होईल, तू त्याचे नाव योहान ठेव.

14 ताे जन्मास आल्याने तुला आनंद होईल व उल्हास वाटेल तसेच पुष्कळ लोक हर्षित होतील.

15 तो देवाच्या दृष्टीने महान होईल आणि तो द्राक्षरस किंवा मद्य पिणार नाही. तो आईच्या गर्भात असतांनाच पवित्र आत्म्याने भरलेला असेल.

16 तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना, प्रभू त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल.

17 बापांची मने मुलांकडे आणि आज्ञा न मानणार्‍यांना नीतिमानांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी तयार केलेली प्रजा उभी करावयाला तो एलियाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने त्यांच्यापुढे चालेल.

18 'मग जखऱ्या देवदूताला म्हणाला, हे घडणारच असे मी कशावरुन समजू? कारण मी वृध्द मनुष्य आहे, आणि माझी पत्नीसुध्दा उतारवयात आहे.'

19 देवदूताने त्याला उत्तर दिले, 'मी देवाच्या पुढे उभा राहणारा गब्रीएल आहे, आणि तुझ्याशी बोलायला व तुला ही सुवार्ता सांगायला मला पाठविण्यात आले आहे.

20 पाहा, हे घडेपर्यंत तुला बोलता येणार नाही व तू मुका राहशील. कारण माझे शब्द जे योग्य वेळी पूर्णपणे खरे ठरणार आहेत त्या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाहीस.'

21 तेव्हा जखऱ्याची वाट पाहणाऱ्या लोकांना तो मंदिरात इतका वेळ का राहिला याचे आश्चर्य वाटले.

22 तो बाहेर आल्यावर त्याला त्यांच्याबरोबर बोलता येईना. तेव्हा त्यांना जाणीव झाली की, मंदिरात त्याने दृष्टांन्त पाहिला आहे. तो त्यांना खुणा करत होता परंतु तो तसाच मुका राहीला .

23 त्याच्या सेवेचा कालावधि पूर्ण झाल्यावर तो घरी परत गेला.

24 त्या दिवसानंतर त्याची पत्नी अलीशिबा गरोदर राहिली व पाच महिने लपून राहिली, ती म्हणाली,

25 लोकांमध्ये माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी प्रभूनें माझ्याकडे पाहिलेंं तेव्हा त्याने माझ्यासाठी असे केले.

26 अलीशिबेच्या गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात, देवाने गब्रीएल दूताला गालीलांतील नासरेथ नांवाच्या गावी,

27 एका कुमारीकडे पाठवले. तिची दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या मनुष्याशी मागणी झाली होती, आणि त्या कुमारीचे नाव मरीया होते.

28 देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, अभिवादन! तुझ्यावर कृपा झालेली आहे. प्रभू तुझ्याबरोबर आहे.

29 परंतु ती त्याच्या शब्दाने अस्वस्थ झाली, आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करू लागली.

30 देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस, देवाने तुझ्यावर कृपा केली आहे.

31 पाहा! तू गरोदर राहशील, आणि तुला मुलगा होईल, त्याचे नांव तू येशू ठेव.

32 तो महान होईल व त्याला थोर देवाचा पुत्र म्हणतील. आणि प्रभू देव त्याला त्याचा पिता दावीद याचे सिंहासन देईल.

33 तो याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळासाठी राज्य चालवील आणि त्याच्या राज्याचा कधीही अंत होणार नाही.”

34 तेव्हा मरीया दूताला म्हणाली, हे कसे होईल? कारण मला पुरूष ठाऊक नाही.

35 देवदूत तिला म्हणाला, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि थोर देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील. आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्याला देवाचा पुत्र म्हणतील.

36 बघ, तुझी नातेवाईक अलीशिबा हि सुध्दा म्हातारपणात गरोदर असून तिला पुत्रगर्भ राहीला आहे आणि जिला वांझ म्हटले जाई तिला आता सहावा महिना आहे.

37 कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

38 मरीया म्हणाली, खरोखर ,मी प्रभूची दासी आहे, आपल्या म्हणण्या प्रमाणे मला होवो. मग देवदूत तिच्या पासून निघून गेला.

39 त्याच दिवसात मरीया उठली आणि घाईने यहूदीयाच्या डोंगराळ भागातील एका गावी गेली.

40 तिने जखऱ्याच्या घरात प्रवेश केला आणि अलीशिबेला अभिवादन केले.

41 जसे मरीयेचे अभिवादन अलीशिबेने ऐकले तिच्या उदरातील बाळाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने भरली.

42 ती उंच स्वर काढून मोठ्याने म्हणाली, स्त्रियांमध्यें तू धन्य आहेस, आणि तुझ्या पोटचें फळ धन्य आहे.

43 माझ्या प्रभूच्या मातेने मजकडे यावे हा मान मला काेठून ?

44 जेव्हा तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडली, तेव्हा माझ्या उदरातील बाळाने आनंदाने उडी मारली

45 जिने विश्वास ठेवला आहे ती धन्य, कारण ज्या गोष्टी प्रभूने तिला सांगितल्या त्याची पूर्णता होईल.

46 मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानतो,

47 आणि देव जो माझा तारणारा याच्या ठायी माझा आत्मा आनंदीत झाला आहे.

48 कारण त्याने आपल्या दासीची दैन्य अवस्था पाहीली. आतापासून मला सर्व पिढ्या आशीर्वादित म्हणतील.

49 कारण जो सर्व समर्थ आहे, त्याने माझ्यासाठी मोठी कामे केली आहेत; आणि 'त्याचे नाव पवित्र आहे.'

50 जे त्याचे भय धरतात त्यावर त्याची कृपा पिढ्यान पिढ्या आहे

51 त्याने त्याच्या हाताने सामर्थ्याची कार्ये केली आहेत; जे गर्विष्ठ अंतकरणाचे आहेत त्यांची त्याने पांगापांग केली आहे.

52 त्याने राज्य करणाऱ्यांना त्यांच्या राजासनांवरून ओढून काढले आहे आणि गरीबास उंचावले आहे.

53 त्याने भुकेल्यास चांगल्या पदार्थांने तृप्त केले आहे. आणि धनवानास रिकाम्या हाताने परत पाठवले आहे .

54 आपल्या पूर्वजास त्याने सांगीतल्या प्रमाणे अब्राहाम व त्याचे संतान ह्यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरूण

55 त्याने आपला सेवक इस्राएल ह्याला साहाय्य केले आहे.

56 अलीशिबेबरोबर तीन महीने राहिल्यानंतर मरिया अापल्या घरी परत गेली.

57 अलीशिबेची प्रसूतीची वेळ आल्यावर, तिने एका मुलास जन्म दिला.

58 प्रभूने तिच्यावर मोठी कृपा केली आहे, हे तिच्या शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी ऐकले आणि ते तिच्या आनंदात सहभागी झाले.

59 मग असे झाले की, आठव्या दिवशी मुलाची सुंता करण्यासाठी ते आले असता, त्याच्या पित्याच्या नावाप्रमाणे ते बाळाच नाव देखिल जखऱ्या ठेवणार होते.

60 परंतु त्याच्या आईने उत्तर दिले, नाही त्या ऐवजी त्याचे नाव योहान ठेवायचे आहे.

61 ते तिला म्हणाले, तुझ्या नातलगात ह्या नावाचा कोणीच नाही.

62 नंतर त्यांनी त्याच्या वडिलांना हातवारे करून विचारले, ह्याचे नाव काय ठेवावे, अशी तुझी इच्छा आहे

63 तेव्हा त्याने लिहिण्यासाठी पाटी मागितली आणि, त्याचे नांव योहान आहे, असे लिहीले यावरुन त्या सर्वांना खूपच आश्चर्य वाटले.

64 त्याच क्षणी त्याचे तोंड उघडले व त्याची जीभ मोकळी झाली, आणि तो बोलू लागला व देवाची स्तुती करू लागला.

65 तेव्हा सर्व शेजारी भयभीत झाले आणि यहूदीयाच्या सर्व डोंगराळ प्रदेशात लोक या सर्व गोष्टींबद्दल बोलू लागले.

66 ज्या कोणी हे ऐकले ते प्रत्येकजण विचार करत होते, ते म्हणाले, हे मूल पुढे कोण होणार आहे? प्रभू त्याच्याबरोबर आहे असे त्यांच्या लक्षात आले.

67 जखऱ्या पवित्र आत्म्याने भरला , आणि त्याने ही भविष्यवाणी केली; तो म्हणाला,

68 'इस्राएलाचा देव प्रभू', हयाची स्तुती असो, कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेतली आणि लोकांना सोडविण्यासाठी मार्ग तयार केला.

69 त्याने आपला सेवक दाविद याच्या घराण्यातून आमच्या साठी सामर्थ्यशाली तारणारा दिला आहे.

70 हे देवाने त्याच्या पवित्र संदेष्ट्यांव्दारे फार पूर्वीच सांगितले होते.

71 जे आमचे शत्रु आहेत व जे आमचा व्देष करतात त्यांच्यापासून मुक्त करण्याचे अभिवचन त्याने आम्हाला दिले.

72 आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे. व आपल्या पवित्र कराराची आठवण ठेवणार आहे,

73 हा करार एक शपथ होती जी त्याने आमचा पूर्वज अब्राहामाला वाहिली.

74 ती अशी की, तुम्ही आपल्या शत्रुंच्या हातून सुटून

75 माझ्यासमोर पवित्रतेने व नीतीने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल, असे मी करीन.

76 हे बालका, तुला सर्वोच्च देवाचा संदेष्टा म्हणतील. कारण प्रभूचे मार्ग सिध्द करण्या करीता तू त्यांच्या पुढे चालशील.

77 ह्यासाठी की त्याच्या लोकास त्यांच्या पापांच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा.

78 देवाच्या करुणेमुळे स्वर्गीय दिवसाची पहाट उजाडेल व मरणाच्या दाट छायेत जे जगत आहेत त्यांच्यावर प्रकाशेल.

79 तीच्याकडून जे अंधारांत आहेत व मृत्यूच्या छायेंत बसले आहेत त्यांना प्रकाश देण्यासाठी आणि आमचे पाय शांतीच्या मार्गास लावण्यासाठी दिवसाचा उदय करून आमची भेट घेईल.

80 मग तो मुलगा वाढत गेला आणि आत्म्यात सामर्थ्यशाली झाला. इस्राएल लोकांना प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत तो अरण्यात राहिला.