John 2 in Marathi

1 नंतर तिसर्‍या दिवशी गालिलांतील काना येथे एक लग्न होते, आणि येशूची आई तेथे होती.

2 येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमत्रंण होते.

3 मग द्राक्षारस संपला तेव्हा, येशूची आई त्याला म्हणाली,“त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.”

4 येशू तिला म्हणला, “बाई, ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध आहे? माझी वेळ अजून आली नाही.”

5 त्याची आई नोकरांना म्हणाली, “हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा,

6 तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण, यहूद्यांच्या शुध्दीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते, त्यात दोन दोन, तीन तीन मण पाणी मावेल असे ते होते.

7 येशू त्यांना म्हणाला, “रांजन पाण्याने भरा.” आणि त्यांनी ते काठोकाठ भरले.

8 मग त्याने नोकरांना सांगितले, “आता आता त्यातले काढून भोजनकारभार्‍याकडे घेऊन जा,” तेव्हा त्यांनी ते नेले.

9 द्राक्षारस बनलेले पाणी भोजनकारभार्‍याने जेव्हा चाखले, आणि तो कोठला होता हे त्याला माहीत नव्हते, (पण ज्या नोकरांनी पाणी काढले त्यांना माहीत होते) तेव्हा भोजनकारभारी वराला बोलावून,

10 त्याला म्हटले, “प्रत्येक मनुष्य अगोदर चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग बेचव वाढतो, पण तू तर चांगला द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहेस.”

11 येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले, आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

12 त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली कफर्णहूमास गेले; पण ते तेथे फार दिवस राहिले नाहीत.

13 मग यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला व येशू यरूशलेमला वर गेला.

14 आणि त्याला मंदिरात गुरे, मेंढरे आणि कबुतरे विकणारे, आणि सराफ हे बसलेले आढळले.

15 तेव्हा त्याने दोर्‍यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे ह्या सर्वांना मंदिरातून घालवून दिले. सराफांचा खुर्दाही ओतून टाकला आणि चौरंग पालथे केले.

16 व त्याने कबुतरे विकणार्‍यांना म्हटले, “ह्यांना येथून काढा, माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.”

17 तेव्हा ‘तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील.' असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले.

18 त्यावरून यहूदी त्याला म्हणाले, ''तुम्ही हे करता तर आम्हाला तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता?''

19 येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले. “तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन ते दिवसात उभारीन.”

20 ह्यावरून यहूदी म्हणाले, “ हे मंदिर बांधण्यास शेचाळीस वर्षे लागली आणि आणि तुम्ही हे तीन दिवसात उभारणार काय?”

21 तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता.

22 म्हणून तो असे म्हणत असे हे तो मेलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले, आणि त्यांनी शास्त्रलेखावर व येशूने उच्चारलेल्या वचनावर विश्वास ठेवला.

23 आता वल्हांडण सणाच्या वेळी, तो यरुशलेमात असता, त्याने केलेली चिन्हे पाहून पुष्कळ जणांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला.

24 असे असले तरी येशू त्यांना आेळखून असल्यामुळे त्याला स्वतःला त्यांच्यावर विश्वास नव्हता.

25 शिवाय, मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी ह्याची त्याला गरज नव्हती; कारण मनुष्यात काय आहे हे तो ओळखीत होता.