John 16 in Marathi

1 “तुम्ही अडखळविले जाऊ नये म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत.

2 ते तुम्हास सभास्थानाच्या बाहेर घालवतील; इतकेच काय पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहो असे वाटेल,अशी वेळ येत आहे.

3 त्यांनी पित्याला आणि मलाहि ओळखले नसल्यामुळे ते असे करतील.

4 “ मी तुम्हाला ह्या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या आहेत की, ती घडण्याची वेळ आली म्हणजे त्या मी तुम्हाला सांगितल्या होत्या ह्याची आठवण व्हावी. ह्या गोष्टी मी तुम्हाला, प्रारंभापासून, सांगितल्या नाहीत, कारण मी तुमच्याबरोबर होतो.

5 पण ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी आता जातो आणि आपण कोठे जाता असे तुमच्यापैकी कोणीही मला विचारीत नाही.

6 पण मी ह्या गोष्टी तुमच्याशी बोलल्यामुळें तुमचे अंतःकरण दुःखाने भरले आहे.

7 तरीपण मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही; मी गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन;

8 आणि तो आल्यावर तो जगाची पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्यायाविषयी खातरी करील.

9 पापाविषयी; कारण ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत.

10 नीतिमत्वाविषयी; कारण मी माझ्या पित्याकडे जातो, आणि पुढे तुम्हाला मी दिसणार नाही.

11 आणि न्यायाविषयी; कारण ह्या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे.

12 “मला तुम्हाला अजून पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत पण तुम्ही आताच त्या सहन करू शकणार नाही.

13 पण तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे ऐकेल तेच सांगेल आणि हाेणार्‍या गोष्टी तुम्हाला कळवील.

14 तो माझे गौरव करील, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवील.

15 जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे; म्हणून मी म्हणालों की, जे माझे आहे त्यांतून घेऊन ते तुम्हाला कळवील.

16 “थोड्या वेळाने,मी तुम्हाला दिसणार नाही; आणि पुन्हा, थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.”

17 तेव्हा त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकांस म्हणाले, “हा आम्हास,थोड्या वेळाने मी तुम्हास दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल, शिवाय, ‘कारण मी पित्याकडे जातो.’ असे जे म्हणतो त्याचा अर्थ काय?”

18 ते म्हणत होते, “हा ‘थोड्या वेळाने’ असे जे म्हणतो ह्याचा अर्थ काय? हा काय बोलतो ते आम्हास समजत नाही.”

19 आपणाला विचारावे असे त्यांच्या मनात आहे, हे आेळखून येशू त्यांना म्हणाला, “मी म्हटले की, थोड्या वेळाने, तुम्हाला मी दिसणार नाही, आणि पुन्हा, थोड्या वेळाने, तुम्ही मला पहाल, ह्याविषयी एकमेकांना विचारीत आहा काय?

20 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, तुम्ही रडाल आणि शोक कराल, तरी जग आनंद करील. तुम्हाला दुःख होईल, पण तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल.

21 स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिचीप्रसूतीची घटका आलेली असते; पण बालक जन्मल्यावर जगात एक मनुष्य जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवत होत नाही.

22 आणि म्हणून, आता तुम्हाला दुःख झाले आहे; तरी मी तुम्हाला पुन्हा भेटेन, आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल, आणि तुमच्यापासून तुमचा आनंद कोणी हिरावून घेणार नाही.

23 आणि त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला माझ्या नावाने देईल.

24 तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही; मागा म्हणजे तुम्हास मिळेल,ह्यासाठी की, तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.

25 “ह्या गोष्टी मी तुमच्याशी दाखल्यात बोललो आहे; पण जेव्हा मी तुमच्याशी दाखल्यात बोलणार नाही पण मी तुम्हाला उघडपणे पित्याविषयी सांगेन अशी वेळ येत आहे.

26 त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल; आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन असे मी तुम्हाला म्हणत नाही.

27 कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे.

28 मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा, जग सोडून पित्याकडे जातो.”

29 त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “पाहा, आता आपण उघडपणे बोलत आहा, दाखला सांगत नाही.

30 आता आम्हाला कळले आहे की, आपल्याला सर्व काही कळते आणि कोणी आपल्याला विचारावे ह्याची आपणाला गरज नाही.ह्यावरून आपण देवापासून आला आहा असा आम्ही विश्वास धरतो.

31 येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आता विश्वास ठेवता काय?

32 पाहा, अशी वेळ येत आहे किंबहुना आली आहे की, तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपआपल्या घरी, जाल व मला एकटे सोडाल; पण मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे.

33 माझ्या ठायी तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील; तरी धीर धरा, मी जगाला जिकले आहे.”