John 12 in Marathi

1 मग येशू वल्हांडणाच्या सहा दिवस आधी बेथानीस आला. आणि ज्या लाजराला येशूने मेलेल्यातून उठवले होते तो तेथे होता.

2 म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी रात्रीचे भोजन केले, आणि मार्था वाढीत होती. पण त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यात लाजर हा एक होता.

3 तेव्हा मरियेने अर्धा शेर, शुध्द जटामांसीचे, अतिमोलवान सुवासिक तेल घेऊन येशूच्या पायांना लावून आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले; आणि तेलाच्या सुवासाने घर भरून गेले.

4 तेव्हा, त्याच्या शिष्यांतला एक, त्याला धरून देणार होता तो यहुदा इस्कार्योत म्हणाला,

5 “हे सुवासिक तेल तीनशे रूपयांस विकून ते गरीबांस का दिले नाहीत? ”

6 त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे बोलला असे नाही, तर तो चोर असून म्हणून हे बोलला. त्याच्याजवळ डबी होती आणि तिच्यांत जे टाकण्यांत येई ते तो चोरून घेई, म्हणून तो असे बोलला.

7 ह्यावरून येशूने म्हटले, “तिच्या वाटेस जाऊ नका. मला पुरण्याच्या दिवसासाठी तिने हे राखून ठेवले आहे.

8 कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत, पण मी नेहमी तुमच्याजवळ आहे असे नाही.”

9 तो तेथे आहे असे यहुद्यांतील पुष्कळ लोकांना कळले आणि केवळ येशूकरिता नाही, तर ज्याला त्याने मेलेल्यातून उठवले होते त्या लाजरालाही आपण पाहावे म्हणून ते आले.

10 पण मुख्य याजकांनी आपण लाजरालाही ठार मारावे असा विचार केला.

11 कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहूदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवत होते.

12 दुसर्‍या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरूशलेमेस येत आहे असे ऐकून,

13 खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस घ्यायला बाहेर निघाले आणि गजर करीत म्हणाले, “होसान्ना! प्रभूच्या नावाने येणारा इस्राएलाचा राजा!”धन्यवादित असो.

14 आणि येशूला एक शिंगरू मिळाल्यावर तो त्यावर बसला.

15 ‘सियोनेच्या कन्ये, भिऊ नको, पाहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.’ह्या शास्रलेखाप्रमाणे हे घडले.

16 या गोष्टी तर त्याच्या शिष्यांना पहिल्याने समजल्या नव्हत्या, पण येशूचे गौरव झाल्यावर,त्यांना आठवण झाली की, त्याच्याविषयी या गोष्टी लिहिल्या होत्या आणि लोकांनी त्याच्यासाठी असे केले होते.

17 त्याने लाजराला कबरेतून बोलावून मेलेल्यातून उठवले, त्यावेळेस जो लोकसमुदाय त्याच्याबरोबर होता त्यांने त्याच्याविषयी साक्ष दिली.

18 त्याने हे चिन्ह केले होते असे त्यांनी ऐकले म्हणूनहि लोक त्याला भेटावयास गेले.

19 मग परूशी एकमेकांस म्हणाले, “ तुमचे काहीच चालत नाही,हे तुम्ही पाहता;पाहा, जग त्याच्यामागे चालले आहे.”

20 सणांत उपासना करावयास आलेल्या लोकांपैकी त्यांच्यात काही ग्रीक होते.

21 त्यांनी गालीलांतील बेथसैदाकर फिलिप्प ह्याच्याजवळ येऊन विनंती केली की, “महाराज, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे.”

22 फिलिप्पाने येऊन अंद्रियाला सांगितले; अंद्रिया व फिलिप्प ह्यांनी येऊन येशूला सांगितले.

23 येशूने त्यांना म्हटले, “मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे.

24 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतों, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही, तर तो एकटाच राहतो; आणि मेला तर तो पुष्कळ पीक देतो.

25 जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल आणि जो ह्या जगांत आपल्या जीवाचा व्देष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठीे रक्षण करील.

26 जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याला मान करील.

27 “आता माझा जीव अस्वस्थ होत आहे, आणि मी काय बोलू?हे बापा, तू ह्या घटकेपासून माझे रक्षण कर.पण मी ह्या कारणासाठीच या घटकेत आलो आहे.

28 हे बापा, तू आपल्या नावाचे गौरव कर.” तेव्हा आकाशवाणी झाली, ‘मी ते गौरविले आहे आणि पुन्हाहि गौरवीन.’

29 तेव्हा जे लोक सभोवती उभे होते आणि ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले, “मेघगर्जना झाली.” दुसरे म्हणाले, “त्याच्याशी देवदूत बोलला.”

30 येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “माझ्यासाठी ही वाणी झाली नाही तर तुमच्यासाठी झाली.

31 आता ह्या जगाचा न्याय होतो, आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल.

32 आणि मला जर पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन.”

33 तो तर आपण कोणत्या मरणाने मरणार पाहिजे हे सुचविण्याकरिता हे बोलला.

34 लोकांनी त्याला विचारले, “ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रांतून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण?”

35 ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे; तुम्हाला प्रकाश आहे तोवर चाला; यासाठी, अंधकाराने तुम्हाला गाठू नये; कारण जो अंधकारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही.

36 तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुम्हाजवळ प्रकाश आहे तोवर प्रकाशावर विश्वास ठेवा.” येशू ह्या गोष्टी बोलला आणि तेथून निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला.

37 त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असतांहि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही;

38 हे ह्यासाठी झाले की,यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे, ते असेः‘प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भूज कोणास प्रकट झाला आहे?’

39 म्हणून त्यांना विश्वास ठेवता आला नाही;ह्या कारणाने यशया पुन्हा म्हणाला,

40 ‘त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये,वळू नये व मी त्यांना बरे करू नये.म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व अंतःकरण कठीण केले आहे;

41 यशयाने त्याचे गौरव पाहिले म्हणून त्याने ह्या गोष्टी सांगितल्या आणि तो त्याच्याविषयी बोलला.

42 तरी अधिकार्‍यांतूनही पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपणांस सभास्थानाच्या बाहेर घालवू नये म्हणून परूश्यांमुळे ते तसे कबूल करीत नव्हते.

43 कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मनुष्याकडील गौरव अधिक प्रिय वाटले.

44 आणि येशू मोठ्याने म्हणाला, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर नाही, तर ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो.

45 आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्याला पाहतो.

46 जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे.

47 कोणी जर माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही, त्याचा न्याय मी करीत नाही; कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे, तर मी जगाचे तारण करायला आलो आहे.

48 जो माझा अवमान करतो आणि माझी वचने स्वीकारीत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे. जे वचन मी सांगितले, तेच शेवटल्या दिवशी,त्याचा न्याय करील.

49 कारण मी आपल्या मनचे बोललो नाही, तर मी काय सांगावे आणि काय बोलावे ह्याविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली आहे.

50 त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे.हे मला ठाऊक आहे.म्हणून जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.”