John 1 in Marathi

1 प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.

2 तोच प्रारंभी देवासह होता.

3 सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्यावांचून झाले नाही.

4 त्याच्या ठायी जीवन होते; आणि ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते.

5 तो प्रकाश अंधारात प्रकाशतो; तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही.

6 देवाकडून पाठविलेला एक मनुष्य प्रकट झाला; त्याचे नाव योहान.

7 तो साक्षीकरीता, त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला; ह्यासाठी की सर्वांनी त्याच्या द्वारे विश्वास ठेवावा.

8 योहान तो प्रकाश नव्हता, पण त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला.

9 जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता.

10 तो जगात होता व जग त्याच्याद्वारे निर्माण झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही.

11 जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही.

12 पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला, तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.

13 त्यांचा जन्म रक्त किंवा देहाची इच्छा, किंवा मनुष्याची इच्छा ह्यापासून झाला नाही, तर देवापासून झाला.

14 शब्द देही झाला व त्याने आमच्यात वस्ती केली. आणि आम्ही त्याचे गौरव पाहीले, ते पित्यापसून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपा व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते.

15 योहान त्याच्याविषयी साक्ष देतो आणि मोठ्याने म्हणतो, “ज्याच्याविषयी मी सांगितले की, ‘माझ्या मागून जो येत आहे तो माझ्या पुढचा झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता’, तो हाच आहे.”

16 त्याच्या पूर्णतेतून आपल्या सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे.

17 कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्याद्वारे आले.

18 देवाला कोणीहीं कधीच पाहिले नाही. जो देवाचा एकुलता एक पुत्र जन्मलेला पित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे.

19 आणि योहानाची साक्ष ही आहे जेव्हा यहूद्यांनी यरुशलेमेहून याजक व लेवी ह्यांना त्याला विचारायला पाठवले की, “आपण कोण आहा?”

20 त्याने उघडपणे कबूल केले, नाकारले नाही, “मी ख्रिस्त नाही,'' असे त्याने कबूल केेले.

21 तेव्हा त्यांनी त्याला विचारले, “तर मग आपण कोण आहात? एलिया आहात का?” तो म्हणाला, “मी नाही.” “आपण तो संदेष्टा आहा काय?” त्याने उत्तर दिले, “मी नाही.”

22 ह्यावरून ते त्याला म्हणाले, “आपण कोण आहा? म्हणजे ज्यांनी आम्हाला पाठवले त्यांना आम्ही उत्तर देऊ. स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे?”

23 तो म्हणाला, “यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे 'परमेश्वराचा मार्ग नीट करा. असे अरण्यात अोरडणाऱ्याची वाणी मी आहे.”

24 आणि पाठविलेली माणसे परूश्यांपैकी होती.

25 आणि त्यांनी त्याला प्रश्न करून म्हटले, “आपण जर ख्रिस्त नाही, किंवा एलिया नाही, किंवा तो संदेष्टाहि नाही, तर आपण बाप्तिस्मा का करता?”

26 योहानाने त्यांना उत्तर दिले, “मी पाण्याने बाप्तिस्मा करतो, पण तुम्ही ज्याला ओळखीत नाही असा एक जण तुम्हामध्ये उभा आहे.

27 तो माझ्या मागून येणारा आहे, त्याच्या पायतणाचा बंद सोडावयास मी योग्य नाही.”

28 यार्देनेच्या पलीकडील बेथानीत योहान बाप्तिस्मा करीत होता तेथे ह्या गोष्टी घडल्या.

29 दुसर्‍या दिवशी येशूला आपल्याकडे येतांना पाहून योहन म्हणाला, “हा, पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!

30 ज्याच्याविषयी मी म्हणालो की, ‘माझ्या मागून एक जण येत आहे तो माझ्या पुढचा झाला आहे कारण तो माझ्या पूर्वी होता’ तो हाच आहे.

31 मी त्याला ओळखत नव्हतो; तरी त्याने इस्राएलात प्रकट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे.”

32 आणि योहानाने अशी साक्ष दिली की, “आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असतांना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला.

33 मी तर त्याला ओळखत नव्हतो, तरी मी पाण्याने बाप्तिस्मा करावा म्हणून ज्याने मला पाठवले त्याने मला सांगितले की, ‘तू ज्या कोणावर आत्मा उतरत असतांना आणि स्थिर राहिलेला पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे.’

34 मी स्वतः पाहिले आहे, आणि साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.”

35 त्यानंतर दुसर्‍या दिवशी योहान व त्याच्या शिष्यांतील दोघांसह उभा असता;

36 येशूला जातांना न्याहाळून पाहून म्हणाला, “हा पाहा, देवाचा कोकरा!”

37 त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले आणि ते येशूच्या मागोमाग निघाले.

38 तेव्हा येशू वळून त्यांना आपल्यामागे येताना पाहून म्हणाला, “तुम्ही काय शोधिता?” ते त्याला म्हणाले, “रब्बी, (म्हणजे गुरूजी) आपण कोठे राहता?”

39 तो त्यांना म्हणाला, “या म्हणजे पाहाल.” मग त्यांनी जाऊन तो कोठे राहतो ते बघितले आणि ते त्या दिवशी त्याच्या येथे राहिले; तेव्हा तो सुमारे दहावा तास होता.

40 योहानाचे बोलणे ऐकून त्याच्यामागे जे दोघे जण गेले, त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता.

41 त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला व त्याला म्हणला, “आम्हाला मशिहा (म्हणजे ख्रिस्त) सांपडला आहे.”

42 त्याने त्याला येशूकडे आणले; येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस. तुला केफा (म्हणजे पेत्र किंवा खडक) म्हणतील.”

43 दुसर्‍या दिवशी त्याने गालिलात जाण्याचा बेत केला; आणि तेव्हा फिलिप्प त्याला भेटला; येशूने त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.”

44 आता, फिलिप्प बेथसैदाचा, म्हणजे अंद्रिया व पेत्र ह्यांच्या गावचा होता.

45 फिलिप्पाला नथनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व तसेच संदेष्ट्यांनी लिहिले, तो म्हणजे योसेफाचा पुत्र येशू नासरेथकर आम्हाला सापडला आहे.”

46 नथनेल त्याला म्हणाला, “नासरेथमधून काहीतरी उत्तम निघू शकेल काय?” फिल्लीपाने त्याला म्हणाला, “येऊन पाहा.”

47 नथनेल आपल्याकडे येत आहे हे येशूने बघितले व तो म्हणाला, “पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे, ह्याच्यात कपट नाही.”

48 नथनेल त्याला म्हणाला, “आपणांला माझी ओळख कोठली?” येशूने त्याला उत्तर दीले, “तुला फिल्लीपाने बोलावले त्याआधी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला बघितले.”

49 नथनेलाने उत्तर दिले, “गुरूजी, आपण देवाचे पुत्र आहा, आपण इस्राएलाचे राजे आहा.”

50 येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, ''मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास ठेवतोस काय? तू ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील.”

51 आणखी तो त्याला म्हणाला, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, तुम्ही ह्यापुढे आकाश उघडलेले आणि देवदूतांना मनुष्याच्या पुत्रावर चढत उतरत असलेले पहाल.”