Hebrews 12 in Marathi

1 म्हणून, आपण एवढया मोठया साक्षीरुपी मेघाने वेढलेले आहो म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.

2 जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या राजासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.

3 तुम्ही खचून जाऊ नये आणि धीर सोडू नये म्हणून ज्याने पापी लोकांचा इतक्या मोठ्या प्रमाणातील विरोध सहन केला, त्याचा विचार करा.

4 तुम्ही पापाविरुद्ध झगडत असता रक्त सांडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही.

5 आणि तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहा काय ? “माझ्या मुला, प्रभूच्या शिक्षेचा अनादर करू नको, आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नकोे.

6 कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो, त्याला तो शिक्षा करतो आणि ज्यांना तो आपले पुत्र म्हणून स्वीकारतो, त्या प्रत्येकांना तो शिक्षा करतो.”

7 हा कठीण समय आहे म्हणून शिस्त सहन करा. ते असे दर्शवते की, देव तुम्हाला मुलांसारखी वागणूक देत आहे; कारण असा कोणता मुलगा आहे ज्याला वडील शिस्त लावीत नाहीत?

8 परंतु ज्या शिक्षेचेसर्व भागीदार झाले आहेत अशा शिक्षेवाचून जर तुम्ही आहा, तर तसे तुम्ही दासीपुत्र आहात आणि तुम्ही खरे पुत्र नाही.

9 याशिवाय आम्हा सर्वांना जगिक पिता असताना त्यांनी आम्हाला शिस्त लावली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आदर राखला. तर मग आम्ही आमच्या आध्यात्मिक पित्याच्या किती तरी अधिक प्रमाणात अधीन होऊन जगले पाहिजे बरे?

10 आमच्या मानवी वडिलांनी त्यांच्या दृष्टीने अती उत्तम अशी शिस्त थोड्या काळासाठी लावली. पण देव आम्हाला आमच्या चांगल्यासाठी शिस्त लावतो, यासाठी की, त्याच्या पवित्रपणात आपणही वाटेकरी व्हावे.

11 शिक्षेने शिस्त लावण्याच्या वेळेस कोणतीही शिक्षा चांगली वाटत नाही, तर दुःखाची वाटते पण नंतर ज्या लोकांना शिस्तीचे धडे शिकायला मिळाले आहेत, त्यांना नीतिमत्व आणि शांतीच्या जीवनाची फळे चाखण्याची संधी मिळते.आपण कसे जगतो याविषयी जागरूक राहा.

12 म्हणून तुमचे गळून गेलेले हात उंच करा आणि तुमचे लटपटणारे गुडघे बळकट करा!

13 तुमच्या पावलांकरीता सरळ वाटा तयार करा यासाठी की, लंगडे पाय निकामी होऊ नयेत, तर उलट ते बरे व्हावेत.

14 सर्व लोकांबरोबर शांतीने राहण्याचा प्रयत्न करा व पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करा. कारण त्याशिवाय (पवित्रतेशिवाय) कोणालाही प्रभूला पाहता येणार नाही.

15 कोणीही देवाची कृपा चुकवू नये, यासाठी तिकडे लक्ष द्या आणि इकडे लक्ष द्या की, कोणतेही कडूपणाचे मूळ वाहून त्यापासून समस्या निर्माण होऊन व इतर लोकांची मने अशुध्द करू नये, म्हणून जपा.

16 कोणीही व्यभिचारी असू नये किंवा एका जेवणासाठी आपला वडील हक्क विकून टाकणाऱ्या एसावासारखे जगिक विचाराचे असू नये याकडे लक्ष द्या.

17 नंतर तुम्हाला माहीत आहे जेव्हा त्याला वारसाहक्काने आशीर्वाद अपेक्षित होता, तेव्हा तो नाकारण्यात आला. जरी त्याने रडून आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला, तरी पश्चातापाने आपल्या वडिलांचे मन तो बदलू शकला नाही.

18 ज्या पर्वताला हाताने स्पर्श करता येतो; जो अग्नीच्या ज्वालांनी पेटलेला आहे, जो अंधार, दुःख व वादळ यांनी भरलेला आहे, अशा पर्वताकडे तुम्ही आला नाही. तर एका नविन ठिकाणी आला आहात.

19 कर्ण्याच्या आवाजाजवळ तुम्ही आला नाहीत किंवा शब्द उच्चारणाऱ्याच्या वाणी याजवळ तुम्ही आला नाही. असा आवाज ज्यांनी ऐकला त्यानी अशी विनंती केली की, त्यांनी यापुढे आणखी वाणी ऐकवू नये.

20 कारण जी आज्ञा केली होती ती ते सहन करू शकले नाहीत. “जर एखाद्या प्राण्याने जरी पर्वताला स्पर्श केला तरी त्याला दगडमार करण्यात यावा.”

21 खरोखर ते दृश्य इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, “भीतीमुळे मी थरथर कांपत आहे.

22 परंतु तुम्ही सीनाय पर्वताजवळ जिवंत देवाच्या नगराजवळ आणि स्वर्गीय यरूशलेम येथे आलेले आहात आणि तुम्ही आनंदाने जमा झालेल्या हजारो देवदूतांजवळ आले आहात.

23 आणि तुम्ही प्रथम जन्मलेल्या मुलांच्या मंडळीकडे, ज्यांची नावे स्वर्गात लिहिली आहेत , आणि तुम्ही देव जो सर्वांचा न्यायाधीश, व तुम्ही नीतिमान लोकांच्या आत्म्यांकडे जे पूर्ण आहेत त्यांच्याकडे आला आहात.

24 आणि तुम्ही जो नव्या कराराचा मध्यस्थ येशू त्याच्याकडे आला आहात, आणि तुम्ही शिंपडण्यात आलेल्या रक्ताकडे आलात की जे रक्त हाबेलाच्या रक्तापेक्षा अधिक उत्तम बोलते.

25 जो बोलतो त्याचे ऐकण्यासाठी नकार देऊ नका. त्याविषयी खात्री असू द्या. ज्याने पृथ्वीवर त्यांना सावध राहण्याविषयी सांगताना त्याचे ऐकायचे नाही असे ज्यांनी ठरवले ते लोक जर सुटू शकले नाहीत तर मग जो स्वर्गातून सावध करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला सुटकेसाठी कोणता मार्ग राहीला बरे?

26 त्यावेळेस त्याच्या आवाजाने भूमि हादरली पण आता त्याने असे अभिवचन दिले आहे की, “पुन्हा एकदा मी केवळ पृथ्वीच नव्हे तर आकाशही हादरवून टाकीन.”

27 “पुन्हा एकदा” याचा अर्थ असा होतो की, ज्या गोष्टी उत्पन्न केलेल्या आहेत त्या काढून टाकण्यात येतील. ज्या गोष्टी हलवता येत नाहीत त्या तशाच राहतील.

28 म्हणून, आम्हाला अढळ असे राज्य कृपेने देण्यात येत असताना आपण त्याविषयी कृतज्ञता बाळगू या, आणि आदराने व भयभीत होऊन देवाला मान्य होईल अशी त्याची सेवा करू;

29 कारण आपला 'देव भस्म करणारा अग्नी आहे.'