Acts 5 in Marathi

1 तेव्हा हनन्या नावाचा कोणीएक माणूस व त्याची बायको सप्पीरा यांनी आपली मालमत्ता विकली.

2 मग, त्याने, त्या किंमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने ठेवून घेतला आणि काही भाग आणून प्रेषितांच्या पायाशी ठेवला.

3 तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी आणि जमिनीच्या किंमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरले आहे?

4 ती होती तोपर्यंत तुझी स्वतःची नव्हती काय? आणि ती विकल्यावर तुझ्याच स्वाधीन नव्हती काय? ही गोष्ट तू आपल्या मनात का आणली? तू माणसाशी नाही, तर देवाशी लबाडी केली आहे.

5 तेव्हा हनन्याने हे शब्द ऐकताच खाली पडून प्राण सोडला. आणि हे ऐकणाऱ्या सर्वाना मोठे भय प्राप्त झाले.

6 तेव्हा तरूणांनी उठून त्याला गुंडाळले, व बाहेर नेऊन पुरले.

7 त्यानंतर सुमारे तीन तासांनतर त्याची बायको आत आली, पण जे झाले होते ते तिला समजले नव्हते.

8 तेव्हा पेत्राने तिला म्हटले, मला सांग, तुम्ही एवढ्यालाच जमीन विकली काय? आणि तिने म्हटले, होय एवढ्यालाच.

9 पण पेत्र तिला म्हणाला, प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही एकोपा का केला? पाहा, ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरले त्यांचे पाय दारापाशी आहेत; ते तुलाही उचलून बाहेर नेतील.

10 तेव्हा लागलेच तिने त्यांच्या पायाजवळ पडून प्राण सोडला, आणि तरूण आत आले तेव्हा ती मेलेली अशी आढळली, आणि त्यांनी तिला बाहेर नेऊन तिच्या नवऱ्याजवळ पुरले.

11 आणि सर्व मंडळीला व ज्यांनी ह्या गोष्टी ऐकल्या त्या सर्वांना मोठे भय प्राप्त झाले.

12 तेव्हा प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चमत्कार व अदभूते घडत असत; आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या व्दारमंडपात जमत असत.

13 आणि इतर लोकांतला कोणी त्यांच्याशी मिळण्यास धजत नसे; तरी लोक त्यांना थोर मानीत असत.

14 इतकेच नव्हे तर विश्वास धरणारे पुष्कळ पुरूष व स्त्रीया यांचे समुदाय प्रभूला मिळत असत.

15 इतके चमत्कार घडले की लोकांनी दुखणेकऱ्यास उचलुन रत्यामध्ये आणले आणि पेत्र जवळून येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील कोणावर पडावी म्हणून त्यांना बाजांवर व पलंगावर ठेवले.

16 आणखी यरुशलेमेच्या आसपासच्या चहूकडल्या गावांतील लोकांचे समुदाय रोग्यास व अशुध्द आत्म्यांनी पीडलेल्यांस घेउन येत असत.

17 तेव्हा प्रमुख याजक उठला, आणि तो व त्याच्याबरोबर असलेले सर्व सदूकी पंथाचे लोक हे आवेशाने भरले.

18 आणि त्यांनी आपले हात प्रेषितांवर टाकून त्यांना सार्वजनिक बंदिशाळेत ठेवले.

19 परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले, व त्यांना बाहेर आणून म्हटले,

20 “ जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाचा सर्व संदेश लोकांना सांगा.”

21 हे ऐकून उजाडताच ते मंदिरामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले.इकडे, प्रमुख याजक व त्यांच्याबरोबर जे होते त्यांनी येउन न्यायसभा व इस्त्राएल लोकांचे संपूर्ण वडीलमंडळ एकत्र बोलावले आणि त्यांना आणण्यास बंदिशाळेकडे पाठवले.

22 पण तिकडे गेलेल्या शिपायांना ते तुरुंगात सापडले नाहीत; म्हणून त्यांनी परत येउन सांगितले की,

23 बंदिशाळा चांगल्या व्यवस्थेने बंद केलेली आणि दरवाजांपाशी पहारेकरी उभे राहिलेले आम्हाला आढळले,परंतु तुरुंग उघडल्यावर आम्हाला आत कोणी सापडले नाही.

24 हे वर्तमान ऐकून ह्याचा काय परिणाम होईल ह्याविषयी मंदिराचा सरदार व मुख्य याजक घोटाळ्यात पडले.

25 इतक्यात कोणीतरी येऊन त्यांना असे सांगितले की, 'पाहा, ज्या माणसाला तुम्ही तुरुंगात ठेवले होते ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत.'

26 तेव्हा सरदाराने शिपायांसह जाऊन त्यांना जुलूम न करिता आणले; कारण लोक आपणाला दगडमार करतील असे त्यांना भय वाटत होते.

27 त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे. तेव्हा प्रमुख याजकाने त्यांना विचारले,

28 “ह्या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हाला निक्षून सांगितले होते की नाही? तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरूशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणू पाहत आहात.”

29 परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.

30 ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले;

31 त्याने इस्त्राएलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले.

32 ह्या गोष्टीविषयी आम्ही साक्षी आहोत आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे.

33 हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जिवे मारण्याचा विचार करू लागले.

34 परंतु सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलियेल नावाचा एक परूशी शास्त्राध्यापक होता ; त्याने न्यायसभेत उभे राहून त्या माणसांना थोडा वेळ बाहेर पाठवण्यास सांगितले.

35 मग तो त्यांना म्हणाला ,“अहो इस्त्राएल लोकांनो, तुम्ही ह्या माणसांचे काय करणार ह्याविषयी जपून असा.

36 कारण काही दिवसांपूर्वी थुदास हा पुढे येऊन मी कोणी तरी आहे असे म्हणू लागला; त्याला सुमारे चारशे माणसे मिळाली, तो मारला गेला आणि जितके त्याला मानत होते त्या सर्वाची दाणादाण होऊन ते नाहीसे झाले.

37 त्याच्या मागून गालीलकर यहूदा नावनिशी होण्याच्या दिवसात पुढे आला व त्याने पुष्कळ लोकांना फितवून आपल्या नादी लावले; त्याचाही नाश झाला व जितके त्याला मानत होते त्या सर्वांची पांगापांग झाली.

38 म्हणून मी तुम्हाला आता सांगतों, ह्या माणसांपासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या; कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास नष्ट होईल;

39 परंतु ते देवाचे असल्यास तुम्हाला ते नष्ट करता यावयाचे नाही; तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल”

40 तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले; त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि 'येशूच्या नावाने बोलू नका” असे निक्षून सांगून त्यांना सोडून दिले.

41 ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यांत आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले;

42 आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकवण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.