Acts 24 in Marathi

1 पाच दिवसानंतर प्रमुख याजक हनन्या, काही वडील आणि तिर्तुल्ल नावाचा कोणीएक वकील ह्यांना घेऊन खाली आला; आणि त्यांनी सुभेदारापुढे पौला विरुध्द फिर्याद केली.

2 त्याच्यावर दोषारोप ठेवू लागला, तो येणेप्रमाणेः फेलिक्स महाराज, आपल्यामुळे आम्हाला फार स्वस्थता मिळाली आहे आणि आपल्या दूरदर्शीपणामुळे ह्या राष्ट्रात सुधारणा होत आहेत.

3 म्हणून त्यांचे आम्ही पूर्ण कृतज्ञतेने, सर्व प्रकारे व सर्वत्र स्वागत करतो.

4 तरी आपला अधिक वेळ न घेता मी विनंती करतो की, मेहरबानी करून आमचे थोडक्यात ऐकावे.

5 हा माणूस म्हणजे एक पिडा आहे असे आम्हाला आढळून आले आहे आणि जगातल्या सर्व यहूदी लोकांत हा बंड उठवणारा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे.

6 ह्याने मंदिरही विटाळण्याचा प्रयत्न केला; त्याला आम्ही धरले; व आमच्या नियमाशास्त्राप्रमाणे ह्याचा न्याय करण्यास आम्ही पाहत होतो;

7 पण लुसिया सरदाराने येऊन मोठ्या जबरदस्तीने ह्याला आमच्या हातातून काढून नेले.

8 आणि ह्याची चौकशी आपण कराल तर ज्या गोष्टींचा दोषारोप आम्ही त्याच्यावर करतो त्या सर्वांविषयी त्याच्याकडूनच आपणाला समजेल.

9 तेव्हा ह्या सर्व गोष्टी अशाच आहेत, (असे म्हणून यहूद्यांनी दुजोरा दिला).

10 मग सुभेदाराने बोलण्यास खुणावल्यावर पौलाने उत्तर दिले. “आपण पुष्कळ वर्षापासून ह्या लोकांचे न्यायधीश आहात हे मला ठाऊक आहे, म्हणून मी आपल्यासंबंधीच्या गोष्टीचे संतोषाने समर्थन करतो.

11 आपल्याला पूर्णपणे कळून येईल की, मला यरूशलेमेत उपासना करायला जाऊन अजून बारापेक्षा अधिक दिवस झाले नाहीत.

12 आणि मंदिरात, सभास्थानात किंवा नगरात कोणाबरोबर वादविवाद करताना किंवा बंडाळी माजवताना मी त्यांना आढळलो नाही.

13 ज्या गोष्टींचा दोषारोप ते माझ्यावर आता करत आहेत, त्या गोष्टी त्यांना आपणापुढे शाबीत करता येत नाहीत.

14 तरी मी आपणाजवळ इतके कबूल करतो की, ज्या मार्गाला ते पाखंड म्हणतात त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखांत आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी पूर्वजांच्या देवाची सेवा करतो.

15 आणि नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरूत्थान होईल, अशी जी आशा धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो.

16 ह्यामुळे देवासंबंधाने व माणसांसंबंधाने माझा विवेकभाव सतत शुध्द राखण्याचा मी यत्न करत असतो.

17 मी पुष्कळ वर्षांनी आपल्या लोकांना दानधर्म करण्यास व यज्ञार्पणे वाहण्यास आलो.

18 शुध्दीकरणाच्या विधीत मी व्रतस्थ असा मंदिरात आढळलो. माझ्याबरोबर लोकांचा घोळका नव्हता किंवा दंगा होत नव्हता; पण तेथे आशिया प्रांतातले कित्येक यहूदी होते.

19 त्यांचे माझ्याविरूध्द काही असते तर त्यांनी आपणा पूढे येऊन माझ्यावर दोषारोप करायचा होता;

20 किंवा मी न्यायसभे पूढे उभा राहीलो असता माझा कोणता अपराध ह्यांना दिसून आला ते ह्यांनी तरी सांगावे.

21 ह्यांच्यामध्ये उभे राहून, मेलेल्यांचा पुनरूत्थाना विषयी माझा न्याय आज तुमच्यापुढे होत आहे, हे शब्द मी मोठ्याने बोललो, हा एवढा उद्गार अपराध असला तर असेल.

22 फेलिक्साला त्या मार्गाची चांगली माहीती असल्यामुळे त्याने खटला तहकूब करून म्हटले, लुसीयाचा सरदार येईल तेव्हा तुमच्या प्रकरणाचा निकाल करीन.

23 आणि त्याने शताधिपतीला हुकुम केला की, “ह्याला पहाऱ्यात ठेवावे; तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयांना ह्याची सेवा करण्यास मनाई नसावी. “

24 मग काही दिवसानंतर फेलिक्स आपली यहूदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला, व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्या पासून ऐकून घेतले.

25 तेव्हा नीतिमत्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी तो भाषण करत असता, फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, “आता जा; संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन.”

26 आणखी आपणास पौलाकडून द्रव्य मिळेल अशी आशाही त्याला होती. म्हणून तो त्याला पुनःपुन्हा बोलावून घेवून त्याच्याबरोबर संभाषण करत असे .

27 पुढे दोन वर्षांनंतर फेलिक्साच्या जागेवर पुर्क्य फेस्त हा आला; तेव्हा यहुद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेलिक्स पौलाला कैदेतच ठेवून गेला.