Acts 23 in Marathi

1 मग पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टि करून म्हणाला, बंधुजनहो, मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे.

2 तेव्हा प्रमुख याजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांस त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली.

3 तेव्हा पौल त्याला म्हणाला , हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील; तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करावयाला बसला असता नियमशास्त्राविरुध्द मला मारण्याची आज्ञा देतोस काय?

4 तेव्हा जवळ उभे राहणारे म्हणाले, तू देवाच्या प्रमुख याजकाची निंदा करितोस काय?

5 पौलाने म्हटले , बंधुजनहो , हा प्रमुख याजक आहे हे मला ठाऊक नव्हते; कारण 'तू आपल्या लोकांच्या अधिकाऱ्याविरुध्द वाईट बोलू नको ' असे शास्त्रात लिहिले आहे.

6 तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदुकी व एक भाग परूशी आहे, हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, बंधुजनहो, मी परूशी व परुश्यांचा पुत्र आहे; आमची आशा व मेलेल्यांचे पुनरुत्थान ह्यासंबंधाने माझी चौकशी होत आहे .

7 तो हे बोलत आहे तोंच परूशी व सदुकी ह्यांच्यात भांडण लागून लोकांत फुट पडली.

8 कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही, असे सदुकी म्हणतात; परूशी तर ह्या दोन्ही गोष्टी मान्य करतात.

9 तेव्हा मोठी गडबड उडाली; आणि जे शास्त्री परूश्यांच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काहीजण उठून तणतण करीत म्हणाले,या माणसाच्या ठायी आम्हाला काही वाईट दिसत नाही; जर आत्मा किंवा देवदूत त्यांच्याबरोबर बोलला असेल तर मग कसे?

10 असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता; ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकुम केला की, खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे.

11 त्याच रात्री प्रभू त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, धीर धर; जशी तू यरूशलेमेत माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरांतही तुला द्यावी लागेल.

12 मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबध्द होऊन म्हणाले, पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही.

13 हा कट रचणारे इसम चाळीसांहून अधिक होते.

14 ते मुख्य याजक व वडील ह्यांच्याकडे येऊन म्हणाले, पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही अन्नाला शिवणार नाही, अशा कडकडीत शपथेने आम्ही आपणास बध्द करून घेतले आहे.

15 तर आता त्याच्याविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाची आहे, ह्या निमित्ताने त्याला आपणाकडे आणावे असे तुम्ही न्यायसभेतही सरदाराला समजावावे; म्हणजे तो जवळ येतो न येतो तोंच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार आहो.

16 तेव्हा ते दबा धरून बसल्याचे पौलाच्या भाच्याने ऐकले, आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले.

17 तेव्हा पौलाने एका शताधीपतीला बोलावून म्हटले, या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा, ह्याला त्यास काही सांगावयाचे आहे.

18 तेव्हा त्याने त्याला सरदाराकडे नेऊन म्हटले , बंदिवान पौल ह्याने मला बोलावून विनंती केली की , ह्या तरूणाला आपणाकडे आणावे, त्याला आपणाबरोबर काही बोलावयाचे आहे.

19 तेव्हा सरदाराने त्याचा हात धरून त्याला एकीकडे नेऊन विचारले, तुला काय सांगावयाचे आहे?

20 तो म्हणाला , यहूद्यांनी असा एकोपा केला आहे की, पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाच्या निमित्ताने त्याला उद्या खाली सभेमध्ये आणावे, अशी आपणाला विनंती करावी.

21 तर आपण त्यांचे ऐकू नका; कारण त्यांच्यापैकी चाळीसांहून अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत; त्यांनी शपथ घेतली आहे की, त्याला जिवे मारीपर्यंत आपण खाणार पिणार नाही; आणि आता ते तयार होऊन आपल्या संमतीची वाट पाहत आहे.

22 तेव्हा, तू हे मला कळविले आहे हे कोणाला सांगू नको, असे त्या तरूणाला निक्षून सांगून सरदाराने त्याला निरोप दिला.

23 मग त्याने दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले , कैसरीयास जाण्यासाठी दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी प्रहर रात्रीस तयार ठेवा,

24 आणि पाठाळे मिळवा. त्यावर पौलाला बसवून फेलिक्स सूभेदाराकडे सांभाळून न्या.

25 शिवाय त्याने अशा मजकूराचे पत्र लिहिले,

26 महाराज फेलिक्स ह्यांना सुभेदार क्लौद्य लुसिया ह्याचा सलाम.

27 ह्या मनुष्याला यहूद्यांनी धरले होते आणि त्यांच्याकडून त्याचा घात होणार होता, इतक्यात हा रोमी आहे असे कळाल्यावरून मी शिपाई घेऊन जाऊन त्याला सोडवले

28 आणि ह्याच्यावर आरोप आणण्याचे काय कारण होते हे समजून घेण्याच्या इच्छेने त्याला त्यांच्या न्यायसभेत खाली नेले.

29 तेव्हा त्यांच्या नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टींसंबंधी त्याच्यावर काही ठपका आणला होता, परंतु मरणाची किंवा बंधनाची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता, असे मला दिसून आले.

30 ह्या माणसा विरुध्द कट होणार आहे अशी मला खबर लागताच मी त्याला आपल्याकडे पाठवले आहे. वादींनाही आपल्यासमोर खटला चालवण्यास सांगितले आहे. सुखरूप असावे

31 शिपायांनी हुकुमाप्रमाणे पौलाला रात्री अंतिपत्रिसास नेले.

32 आणि दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबर जाण्यास स्वार ठेवून ते गढीत परत आले.

33 कैसरियात गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पौलाला त्याच्यापुढे उभे केले.

34 पत्र वाचून त्याने विचारले, “हा कोणत्या प्रांताचा आहे ? तो किलीकीयाचा आहे समजल्यावर

35 त्याने म्हटले, “ तुझे वादी आले म्हणजे मी तुझे म्हणणे ऐकेन;” आणि 'त्याला हेरोदाच्या वाड्यात ठेवावे ' असा त्याने हुकुम सोडला.