Acts 13 in Marathi

1 अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते. ते पुढीलप्रमाणेः बर्णबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, मनाएन (जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला होता), आणि शौल.

2 ही सर्व माणसे देवाची सेवा करीत असत व उपास करीत असत. पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौलाला ह्यांना ज्या कामासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करा.”

3 म्हणून मंडळीने उपास व प्रार्थना केल्या, त्यांनी बर्णबा व शौल यांच्या डोक्यांवर हात ठेवून प्रार्थना केली, मग त्यांना पाठवून दिले.

4 पवित्र आत्म्याच्या व्दारे बर्णबा व शौल यांना पाठविण्यात आले. ते सलुकीयात गेले. नंतर तेथून समुद्रमार्गे कुप्र बेटावर गेले.

5 ते जेव्हा सलमीनांत आले, तेव्हा त्यांनी देवाचा संदेश यहूदी लोकांच्या सभास्थानात दिला. मार्क म्हटलेला योहान हाही त्यांच्या मदतीला होता.

6 ते संपूर्ण बेट पार करून पफे शहरास गेले. पफे येथे त्यांना एक यहूदी मनुष्य भेटला. तो जादूच्या करामती करीत असे. त्याचे नाव बर्येशू होते. तो खोटा संदेष्टा होता.

7 बर्येशू नेहमी सिर्ग्य पौल याच्या निकट राहण्याचा प्रयत्न करायचा. सिर्ग्य पौल राज्यपाल होता, व तो हुशार होता. त्याने बर्णबा व शौल यांना आपणाकडे बोलावले. त्याला त्यांच्याकडुन देवाचा संदेश ऐकावयाचा होता.

8 परंतु अलीम जादूगार(त्याच्या नावाचा अर्थ हाच आहे.)हा बर्णबा व शौल यांच्या विरुध्द होता. राज्यपालाने विश्वास ठेवू नये म्हणून अलीमने त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला.

9 पण शौल,ज्याला पौलहि म्हणत, तो पवित्र आत्म्याने भरला होता. पौलाने त्याच्याकडे रोखून पाहिले व म्हणाला,

10 “सैतानाच्या पुत्रा! तू दुष्टाईने व खोटेपणाने भरलेला आहेस. अवघ्या नीतीमानाच्या वैऱ्या,तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय?

11 तर आता पाहा, प्रभूचा हात तुझ्यावर आहे, तू आंधळा होशील. व काही वेळपर्यत तुला सूर्य दिसणार नाही. मग लागलेच अलीमावर धुके व अंधार पडला. आणि तो आपल्याला कोणी हाती धरून चालवावे म्हणून इकडेतिकडे फिरुन माणसांचा शोध करू लागला.

12 तेव्हा जे झाले ते पाहून राज्यपालाने विश्वास ठेवला. प्रभूच्या शिक्षणाने तो चकित झाला.

13 पौल व जे त्याचे मित्र त्याच्याबरोबर होते ते पफेकडून समुद्रमार्गे निघाले. ते पंफुल्यातील पिर्गा गावी आले. परंतु योहान (मार्क) त्यांना सोडून परत यरुशलेमेला गेला.

14 पौल व त्याच्या मित्रांनी त्यांचा प्रवास पुढे चालू ठेवला. पिर्गापासून पुढे ते पिसिदीयांतील अंत्युखियास गेले. आणि शब्बाथ दिवशी ते सभास्थानात गेले आणि तेथे बसले.

15 तेव्हा नियमशास्त्र आणि संदेष्टयांच्या लेखाचे वाचन झाल्यावर सभास्थानच्या अधिकाऱ्यांनी पौल व बर्णबाला निरोप पाठविलाः “बंधूनो, येथील लोकांना काही मदत होईल असे काही बोधवचन सांगा.

16 पौल उभा राहिला. आणि आपला हात उंचावून म्हणाला, “अहो इस्त्राएल लोकांनो व देवाचे भय धरणाऱ्यांनो, ऐका!

17 ह्या इस्राएल लोकांच्या देवाने आपल्या वाडवडिलांची निवड केली.आणि ते ज्या काळात मिसरमध्ये परकी म्हणून राहत होते, त्याकाळात देवाने त्यांना अगणित केले आणि उभारलेल्या बाहूने त्यांना तेथून बाहेर आणले.

18 आणि देवाने अरण्यातील चाळीस वर्षात त्यांना सहनशीलता दाखविली.

19 देवाने कनानच्या प्रदेशातील सात राष्ट्रांना नाश केला. देवाने त्यांच्या जमिनी त्याच्या लोकांना दिल्या.

20 हे सर्व साधारणपणे चारशेपन्नास वर्षात घडले.“त्यानंतर देवाने शमुवेल संदेष्ट्यापर्यंत आपल्या लोकांना न्यायाधीश नेमून दिले.

21 मग लोकांनी राजाची मागणी केली. देवाने त्यांना किशाचा पुत्र शौल याला दिले. शौल हा बन्यामिनाच्या वंशातील होता. तो चाळीस वर्षेपर्यंत राजा होता.

22 नंतर देवाने शौलाला काढून टाकले. देवाने दावीदाला त्यांचा राजा केले. दावीदाविषयी देव असे बोललाः इशायाचा पुत्र,दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे,तो माझी सर्व इच्छा पूर्ण करील.

23 याच दाविदाच्या वंशजातून देवाने इस्राएल लोकांचा तारणारा आणिला. तो वंशज येशू आहे. देवाने हे करण्याचे अभिवचन दिले होते.

24 येशू येण्यापूर्वी सर्व यहूदी लोकांना योहानाने उपदेश केला. त्यांच्या अंतःकरणात बदल व्हावा म्हणून योहानाने लोकांना सांगितले की, त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे.

25 जेव्हा योहान आपले काम संपवत होता, तेव्हा तो म्हणाला, ‘मी कोण आहे असे तुम्हाला वाटते? मी ख्रिस्त नाही. तो नंतर येत आहे. त्याच्या वहाणांचे बंद सोडण्याची सुध्दा माझी लायकी नाही.’

26 “माझ्या बंधूनो, अब्राहामच्या कुटुंबातील पुत्रांनो, आणि तुम्ही यहूदी नसलेले पण खऱ्या देवाची उपासना करणारे, ऐका! या तारणाची बातमी आम्हाला सांगितली गेली.

27 यरुशलेमेमध्ये राहतात ते यहूदी व यहूदी पुढारी यांना जाणीव झाली नाही की, येशू हा तारणारा होता. येशूविषयी जे शब्द भविष्यवाद्यांनी लिहिले ते यहूदी लोकांसाठी प्रत्येक शब्बाथाच्या वारी वाचले गेले. परंतु त्यांना ते समजले नाही. यहूदी लोकांनी येशूचा धिक्कार केला, जेव्हा त्यांनी असे केले, तेव्हा त्यांनी भविष्यावाद्यांचे म्हणणे खरे ठरवले!

28 येशूने का मरावे याचे खरे कारण ते शोधू शकले नाहीत. पण त्यांनी पिलाताला सांगितले की त्याला जिवे मारावे.

29 शास्त्रामध्ये येशूच्याबद्दल या गोष्टी लिहिल्या होत्या की, जे वाईट ते त्याच्याबाबतीत घडणारे होते. ते सर्व या यहूदी लोकांनी येशूला केले. मग त्यांनी येशूला वधस्तंभावरुन खाली घेतले. व त्याला कबरेत ठेवले.

30 पण देवाने त्याला मरणातून उठवले

31 यानंतर, पुष्कळ दिवसांपर्यंत जे त्याच्याबरोबर होते, त्यांना गालीला पासून यरुशलेमपर्यंत येशूने दर्शन दिले. ते लोक आता त्याचे साक्षीदार म्हणून लोकांसमोर आहेत.

32 आम्ही तुम्हाला देवाने जे अभिवचन आमच्या वाडवडिलांना (पूर्वजांना) दिले त्याविषयी सुवार्ता सांगतो.

33 आम्ही त्यांची लेकरे (वंशज) आहोत आणि देवाने हे अभिवचन आमच्या बाबतीत खरे करून दाखविले. देवाने हे येशूला मरणातून पुन्हा उठविण्याव्दारे केले. आम्ही याविषयी स्तोत्रसंहितेमध्येसुध्दा वाचतोः‘तू माझा पुत्र आहेस. आज मी तुला जन्म दिला आहे.’

34 शिवाय त्याने कुजण्याच्या अवस्थेपर्यंत जाऊ नये म्हणून त्याने त्याला मरणातून उठवले. याविषयी त्याने असे सांगितले आहे की,‘दाविदाला देण्यात आलेली पवित्र व निश्चित अाशीर्वाद तुम्हास देईन.’

35 म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतोः‘तू तुझ्या पवित्र पुरुषाला कबरेत कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.’

36 कारण दाविद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून मेला. आपल्या वाडवडिलांशेजारी त्याला पुरले. आणि कबरेत त्याचे शरीर कुजले.

37 पण ज्याला देवाने मरणातून पुन्हा उठवले, त्याला कुजण्याचा अनुभव आला नाही.

38 बंधूनो, आम्ही जे सांगत आहोत ते तुम्ही समजून घेतले पाहिजेः या एकाकडूनच तुमच्या पापांची क्षमा तुम्हाला मिळू शकते.

39 मोशेचे नियमशास्त्र तुम्हाला तुमच्या पापांपासून मुक्त करणार नाही. पण प्रत्येक व्यक्ति जी त्याच्यावर विश्वास ठेवते, ती त्याच्याव्दारे त्या सर्वाविषयी न्यायी ठरविली जाते.

40 संदेष्टयांनी सांगितलेल्या काही गोष्टी घडतील, सावध राहा! या गोष्टी तुमच्याबाबत होऊ नयेत म्हणून जपा.

41 अहो धिक्कार करणाऱ्यांनो, पाहा,आश्चर्य करा व नाहीसे व्हा, कारण तुमच्या काळामध्ये मी एक कार्य करतो, ज्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही कोणी ते स्पष्ट करून सांगितले तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही.”

42 जेव्हा पौल व बर्णबा जाऊ लागले, तेव्हा लोक म्हणाले की, पुढील शब्बाथाच्या दिवशी परत या आणि आम्हाला याविषयी अधिक सांगा.

43 भास्थानातील बैठक संपल्यावर अनेक यहूदी लोक आणि यहूदी मतानुसारी चालणारे इतर धार्मिक लोक पौल व बर्णबा यांच्यामागे गेले. पौल व बर्णबा यांनी त्या लोकांना देवाच्या कृपेत टिकून राहण्यास कळकळीची विनंति केली.

44 पुढील शब्बाथवारी शहरातील जवळ जवळ सर्व लोक देवाचे वचन ऐकण्यासाठी एकत्र जमले.

45 यहूदी लोकांनी त्या सर्वांना तेथे पाहिले. त्यामुळे यहूदी लोकांना मत्सर वाटू लागला. तेही काही फार वाईट गोष्टी बोलले आणि जे पौल बोलला त्याविरुध्द वाद उपस्थित केला.

46 पण पौल व बर्णबा फार धैर्याने बोलले. ते म्हणाले. “देवाचा संदेश तुम्हा यहूद्यांना प्रथम आम्हाला सांगितलाच पाहिजे. पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात. तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करून घेत आहात. व अनंतकाळचे जीवन प्राप्त करून घेण्यासाठी अपात्र ठरत आहात! म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशांतील यहूदीतर लोकांकडे जाऊ!

47 प्रभूने आम्हाला हे करण्यास सांगितले आहे. प्रभू म्हणालाः‘दुसऱ्या देशांसाठी मी तुम्हाला प्रकाश असे केले यासाठी की, तुम्ही पृथ्वीवरील सर्व लोकांना तारणाचा मार्ग दाखवू शकाल.”

48 जेव्हा यहूदी नसलेल्यांनी पौलाला असे बोलताना ऐकले तेव्हा ते फार आनंदित झाले, देवाच्या संदेशाला त्यांनी गौरव दिले . आणि त्या लोकांपैकी पुष्कळांनी संदेशावर विश्वास ठेवला, कारण ते अनंतकाळच्या जीवनासाठी निवडले गेले होते.

49 आणि म्हणून देवाचा संदेश संपूर्ण देशात सांगितला गेला.

50 तेव्हा यहूदी लोकांनी शहरातील काही धर्मिक स्त्रिया व पुढारी यांना भडकावून दिले. त्या लोकांनी पौल व बर्णबा यांच्याविरुध्द अनेक वाईट गोष्टी केल्या आणि त्यांना शहराबाहेर घालवून दिले.

51 मग पौल व बर्णबा यांनी आपल्या पायाची धूळ झटकली, व ते इकुन्या शहराला गेले.

52 इकडे येशूचे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले .