Acts 10 in Marathi

1 कर्नेल्य नावाचा मनुष्य कैसरीयामध्ये राहत होता. तो इटलीक नावाच्या पलटणीत शताधिपती होता.

2 कर्नेल्य हा भक्तीमान असून आपल्या कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा होता. तो गोरगरिबांना पुष्कळसा दानधर्म करीत असे आणि तो नेहमी देवाची प्रार्थना करीत असे.

3 एके दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास, कर्नेल्याला दृष्टान्त झाला. त्याने तो स्पष्टपणे पाहिला. त्या दृष्टांतांत देवाचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “कर्नेल्या!”

4 कर्नेल्य देवदूताकडे पाहून भयभीत होऊन आणि म्हणाला “काय आहे, प्रभू?”देवदूत कर्नेल्याला म्हणाला, “देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे, ज्या गोष्टी तू गरीबांना दिल्या आहेत, त्या देवाने पाहिल्या आहेत. देवाला तुझी आठवण आहे.

5 तू यापो गावी माणसे पाठीव आणि शिमोन नावाच्या माणसाला घेऊन ये, शिमोनाला पेत्र असे सुध्दा म्हणतात; तो

6 शिमोन नावाच्या चांभाराच्या घरी राहत आहे. त्याचे घर समुद्राजवळ आहे.”

7 कर्नेल्याशी बोलणे झाल्यावर देवदूत निघून गेला. नंतर कर्नेल्याने त्याचे दोन विश्वासू नोकर व एका धर्मशील शिपायाला बोलावून घेतले.

8 कर्नेल्याने या तिघांना घडलेले सर्व काही सांगितले, आणि त्यांना यापोला पाठवले.

9 दुसऱ्या दिवशी ही माणसे यापो गावाजवळ आली, ती दुपारची वेळ होती. त्याच वेळी प्रार्थना करावयास पेत्र गच्चीवर गेला.

10 पेत्राला भूक लागली होती. त्याला काही खावेसे वाटले. ते पेत्रासाठी जेवणाची तयारी करीत असता पेत्राला तंद्री लागली.

11 आणि आपल्यासमोर आकाश उघडले असून मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे असा दृष्टान्त त्याला झाला.

12 त्यांत पृथ्वीवरील सर्व प्रकारचे चालणारे, सरपटणारे, आकाशात उडणारे पक्षी होते

13 नंतर एक वाणी पेत्राने ऐकली, “पेत्रा, ऊठ; यापैकी कोणताही प्राणी मारून खा.”

14 पण पेत्र म्हणाला, “मी तसे कधीच करणार नाही, प्रभू! जे अशुध्द व अपवित्र आहे असे कोणतेही अन्न मी कधी खाल्लेले नाही.”

15 पण ती वाणी त्याला पुन्हा म्हणाली, “देवाने या गोष्टी शुध्द केल्या आहेत. त्यांना अपवित्र म्हणू नकोस!”

16 असे तीन वेळा घडले. मग ते पात्र आकाशात वर घेतले गेले.

17 पेत्र भयचकित होऊन या दृष्टान्ताचा अर्थ काय असावा याविषयी विचार करू लागला. ज्या लोकांना कर्नेल्याने पाठवले होते, त्यांना शिमोनाचे घर सापडले. ते दाराजवळ उभे होते.

18 त्यांनी विचारले, “शिमोन पेत्र येथेच राहतो काय?”

19 पेत्र अजूनसुध्दा या दृष्टान्ताविषयीच विचार करीत होता. पण आत्मा त्याला म्हणाला, “ऐक, तीन माणसे तुला शोधीत आहेत.

20 ऊठ आणि पायऱ्या उतरून खाली जा, कारण मीच त्यांना पाठवले आहे. काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा.”

21 मग पेत्र खाली त्या माणसांकडे गेला. तो म्हणाला, “तुम्ही ज्याचा शोध करीत आहात तो मीच आहे. तुम्ही येथे का आलात?”

22 ती माणसे म्हणाली, “एका पवित्र देवदूताने तुम्हाला आमंत्रित करण्याविषयी कर्नेल्याला सांगितले होते. कर्नेल्य हा शताधिपती आहे. तो चांगला धर्मशील मनुष्य आहे. तो देवाची उपासना करतो. सर्व यहूदी लोक त्याचा आदर करतात, तुम्हाला घरी बोलावून तुमचे शब्द ऐकावेत असे देवदूताने त्याला सांगितले आहे.”

23 पेत्राने त्यांना आत बोलावून घेतले व रात्रभर मुक्काम करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी पेत्र तयार झाला व त्या तीन मनुष्याबरोबर गेला. यापो येथील काही बंधुही पेत्राबरोबर गेले.

24 दुसऱ्या दिवशी पेत्र कैसरीया शहरात आला. कर्नेल्य त्याची वाट पाहत होता. त्याने आपले जवळचे मित्र व नातेवाईक यांनाही आपल्या घरी जमा केले होते.

25 “जेव्हा पेत्र आत गेला, तेव्हा कर्नेल्य त्याला भेटला. कर्नेल्याने पेत्राच्या पाया पडून आदराने त्याला अभिवादन केले. “

26 पण पेत्र म्हणाला. “उभा राहा, मी तुझ्यासारखाच मनुष्य आहे.”

27 पेत्र त्याच्याशी बोलत घरात गेला आणि आतमध्ये बरेच लोक जमलेले त्याने पाहिले.

28 पेत्र त्या लोकांना म्हणाला, “तुम्ही हे जाणता की, यहूदी मनुष्याने इतर विदेशी लोकांच्या घरी जाणे किंवा त्यांच्याशी संबंध ठेवणे हे यहूदी नियमाला धरुन नाही. पण देवाने मला दाखविले आहे की, मी इतर मनुष्यमात्राला ‘अशुध्द’ किंवा ‘अपवित्र’ मानू नये.

29 याच कारणासाठी जेव्हा हे लोक मला बोलावण्यास आले, तेव्हा मी त्यांच्याशी वाद घातला नाही. आता, कृपा करून मला सांगा, तुम्ही मला येथे का बोलावले?”

30 कर्नेल्य म्हणाला, “चार दिवसांपूर्वी, माझ्या घरांमध्ये मी प्रार्थना करीत होतो. बरोबर याच वेळेला म्हणजे दुपारचे तीन वाजता मी प्रार्थना करीत होतो. अचानक एक मनुष्य माझ्यासमोर उभा राहिला. त्याने लखलखीत, चमकदार कपडे घातले. होते

31 तो मनुष्य म्हणाला, ‘कर्नेल्या! देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. गरीब लोकांना ज्या वस्तु तू दिल्या आहेत ते देवाने पाहिले आहे. देव तुझी आठवण करतो.

32 म्हणून यापो या शहरी काही माणसे पाठव व शिमोन पेत्राला बोलावून घे. पेत्र हा शिमोन चांभाराच्या घरी राहत आहे. आणि त्याचे घर समुद्राच्या जवळ आहे.’

33 तेव्हा मी लागलीच तुम्हाला निरोप पाठविला, तुम्ही येथे आलात ही तुमची मोठी कृपा आहे. तेव्हा आम्हाला जे काही सांगण्याची आज्ञा प्रभूने तुम्हाला दिली आहे, ते ऐकण्यासाठी आम्ही सर्व आता येथे देवासमोर जमलेले आहोत.”

34 पेत्राने बोलायला सुरुवात केली “मला आता हे खरोखर समजले आहे की, देवाला प्रत्येक मनुष्य सारखाच आहे.

35 प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भक्ति करतो आणि योग्य ते करतो, त्याला देव स्वीकारतो, व्यक्ति कोणत्या देशाची आहे, हे महत्वाचे नाही.

36 देव यहूदी लोकांशी बोलला. देवाने त्यांना सुवार्ता पाठविली की, येशू ख्रिस्ताव्दारे शांती जगात आली आहे. येशू सर्वाचा प्रभू आहे!

37 सगळ्या यहूदा प्रांतात काय घडले हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. त्याची सुरुवात योहानाने लोकांना बाप्तिस्म्याविषयी गालीलात जो संदेश दिला, त्याने झाली.

38 नासरेथच्या येशूविषयी तुम्हाला माहिती आहे. देवाने त्याला पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला (ख्रिस्त). येशू सगळीकडे लोकांसाठी चांगल्या गोष्टी करीत गेला. जे लोक दुष्ट आत्म्याने पछाडले होते त्यांना येशूने बरे केले. कारण देव त्याच्याबरोबर होता.

39 येशूने संपूर्ण यहूदीया प्रांतात आणि यरूशलेमेत जे जे केले त्या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. पण येशूला मारण्यात आले. लाकडाच्या वधस्तंभावर त्यांनी त्याला टांगून मारले.

40 परंतु देवाने तिसऱ्या दिवशी त्याला जिवंत केले! देवाने येशूला लोकांना स्पष्ट पाहू दिले.

41 परंतु सर्वच माणासांनी येशूला पाहिले नाही. देवाने त्यांना अगोदरच साक्षीदार म्हणून निवडले होते. त्यांनीच त्याला पाहिले. ते साक्षीदार आम्ही आहोत! येशू मरणातून उठविला गेल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर अन्नपाणी सेवन केले.

42 येशूने आम्हाला लोकांना उपदेश करायला सांगितले. जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी देवाने त्याला आपल्याला आहे हे सांगण्यासाठी त्याने आम्हाला आज्ञा केली.

43 जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, त्याला क्षमा केली जाईल. येशूच्या नावामध्ये देव त्या व्यक्तिच्या पापांची क्षमा करील. सर्व संदेष्टे हे खरे आहे असे म्हणतात.”

44 पेत्र हे बोलत असतानाच त्याचे बोलणे ऐकत बसलेल्या सर्व लोकांवर पवित्र आत्मा आला.

45 यहूदी सुंता झालेले विश्वासाणारे जे पेत्राबरोबर आले होते, ते चकित झाले. यहूदी नसलेल्या लोकांवरसुध्दा पवित्र आत्माच्या दानाचा वर्षाव झाला आहे, यामुळे ते चकित झाले.

46 आणि यहूदी नसलेल्या लोकांना निरनिराळ्या भाषा बोलताना आणि देवाची स्तुती करताना यहूदी लोकांनी एेकले.

47 मग पेत्र म्हणाला, “या लोकांना पाण्याने बाप्तिस्मा देण्यास आपण नकार देऊ शकत नाही, ज्याप्रमाणे आम्हाला मिळाला, त्याचप्रमाणे त्यांनाही पवित्र आत्मा मिळाला आहे.”

48 म्हणून पेत्राने कर्नेल्य, त्याचे नातेवाईक आणि मित्र यांना येशु ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा देण्याची आज्ञा केली. मग पेत्राने आणखी काही दिवस त्यांच्याबरोबर राहावे अशी त्या लोकांनी त्याला विनंती केली.