2 Corinthians 9 in Marathi

1 तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हाला लिहावे ह्याचे अगत्य नाही.

2 कारण मदत करण्याबद्दलची तुमची उत्सुकता मला माहीत आहे. आणि मी मासेदोनियातील लोकांना याविषयी अभिमानाने सांगत होतो की, गेल्या वर्षापासून अखयातील तुम्ही लोक देण्यासाठी तयार आहात आणि तुमच्या उत्साहामुळे पुष्कळ जण कृति करण्यास आवेशाने पुढे आले आहेत.

3 तरी ह्या बाबतीत तुमच्याविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी ह्या बंधूंना पाठवत आहे; आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपली तयारी केलेली असावी.

4 नाहीतर कदाचित, मासेदोनियाचे लोक जर माझ्याबरोबर आले, आणि तुम्ही तयारीत नसलेले आढळला, तर ह्या खातरीमुळे आमची (आम्ही म्हणत नाही की, तुमची) फजिती होईल.

5 म्हणून मला हे आवश्यक वाटते की, ह्यांनी तुमच्याकडे आधी जावे अशी ह्या बंधूंना विनंती करावी, आणि तुम्ही देऊ केलेली देणगी त्यांनी आधीच तयार करावी; म्हणजे लोभाने घेऊन नाही, पण देणगी म्हणून ती तयार राहील.

6 हे लक्षात ठेवा जो हात राखून पेरतो तो त्याच प्रमाणात कापणी करील, आणि जो उदार हाताने पेरील तो त्याच प्रमाणात कापणी करील.

7 प्रत्येक मनुष्याने आपल्या मनात जे ठरवले असेल त्याप्रमाणे त्याने द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण ' संतोषाने देणारा देवाला ' प्रिय असतो.

8 तुमच्याजवळ सर्व गोष्टींत सदा, सर्व पुरवठा रहावा आणि प्रत्येक चांगल्या कामात तुम्ही संपन्न व्हावे म्हणून देव तुम्हाला सर्व प्रकारची कृपा पुरवण्यास समर्थ आहे.

9 असे लिहिले आहे “तो गरीबांना उदारहस्ते देतो, त्याची नीतिमत्व सर्वकाळ राहते.”

10 आता जो पेरणार्‍याला बीज व खाण्यासाठी भाकर पुरवतो तो तुमच्यासाठी बीज पुरवील आणि बहुगुणित करील व तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढवील.

11 म्हणजे तुम्ही सर्व उदारतेसाठी प्रत्येक गोष्टीत संपन्न व्हाल व ती उदारता आमच्याद्वारे देवाचे उपकार स्मरण अधिक होण्यास कारणीभूत होईल.

12 कारण ह्या सेवेचे काम केवळ पवित्र जनांच्या गरजा पुरवणे एवढेच नाही, पण देवाच्या पुष्कळ उपकारस्मरणात ते सेवाकार्य बहुगुणित होते.

13 ह्या सेवेच्या कसोटीमध्ये, ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या अंगिकाराबाबत तुमच्या आज्ञांकितपणामुळे आणि त्यांच्यासाठी व इतरांसाठी तुम्ही उदारपणे दिलेल्या दानामुळे ते देवाचे गौरव करतात;

14 आणखी ते तुम्हाकरीता प्रार्थना करीत असता तुम्हावर देवाने जी विपुल कृपा केली आहे, त्यामुळे तुमची भेट व्हावी अशी उत्कंठा ते धरतात

15 देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती असो!