2 Corinthians 6 in Marathi

1 म्हणून त्याच्याबरोबर काम करणारे आम्हीदेखील तुम्हाला अशी विनंती करतो की,तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका.

2 कारण तो म्हणतो, ‘मी अनुकूल समयी तुझे ऐकले, आणि तारणाच्या दिवशी तुझे सहाय्य केले.’ पाहा,आता अनुकूल समय आहे, पाहा, आता तारणाचा दिवस आहे.

3 ह्या सेवेला दोष लावला जाऊ नये म्हणून आम्ही, कशात कोणाला, अडखळण्यास कारण होत नाही.

4 उलट सर्व स्थितीत देवाचे सेवक म्हणून, आम्ही आमच्याविषयीची खातरी पटवून देतो; आम्ही पुष्कळ सोशिकपणाने संकटांत, आपत्तीत व दुःखांत;

5 फटक्यांत, बंदिवासांत व दंगलीत; कष्टांत, जागरणांत व उपासांत;

6 शुध्दतेने व ज्ञानाने, सहनशीलतेने व ममतेने, पवित्र आत्म्याने व निष्कपट प्रीतीने;

7 सत्याच्या वचनाने व देवाच्या सामर्थ्याने, उजव्या हातात व डाव्या हातात नीतिमत्वाची शस्त्रे बाळगून,

8 गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने, आम्ही आपली लायकी पटवून देतो. आमच्याविषयी खातरी पटवतो. फसव्या, आणि तरी खरे आहोत,

9 अपरिचित आहोत आणि सुपरीचित आहोत, मरत आहोत आणि बघा, आम्ही जिवंत आहोत. जणू शिक्षा भोगीत होतो, आणि तरी मेलो नाही.

10 आम्ही दुःखीत, तरी सदोदित आनंद करणारे, आम्ही दरिद्री, तरी पुष्कळांना धनवान करणारे, आमच्याजवळ काही नसलेले, आणि तरी सर्व असलेले असे आढळतो.

11 अहो करिंथकरांनो, तुमच्यासाठी आम्ही तोंड उघडले आहे आणि आमचे अंतःकरण मोठे झाले आहे.

12 आमच्यात तुम्ही संकुचित झाला नाही, पण तुम्ही स्वतःच्या कळवळ्यांविषयी संकुचित झाला आहा.

13 आता तुम्हीही असलीच फेड करून तुमचेही अंतःकरण मोठे करा. हे मी तुम्हाला मुले म्हणून सांगतो.

14 विश्वास न ठेवणार्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीतिमान व अनाचार ह्यांची भागी कशी होणार? प्रकाश व अंधकार ह्यांचा मिलाप कसा होणार?

15 ख्रिस्ताची बलियालाशी एकवाक्यता कशी होणार? किंवा विश्वासणारा व अविश्वासणारा हे वाटेकरी कसे होणार?

16 आणि देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? कारण तुम्ही जिवंत देवाचे मंदिर आहा. कारण देवाने म्हटले आहे की, ‘मी त्यांच्यात राहीन आणि त्यांच्यात वावरेन; मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील.’

17 आणि म्हणून ‘प्रभू म्हणतो की, त्यांच्यामधून बाहेर या आणि वेगळे व्हा; अशुध्दाला शिवू नका; म्हणजे मी तुम्हाला स्विकारीन.

18 आणि मी तुम्हाला पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व्हाल, असे सर्वसमर्थ परमेश्वर म्हणतो.’