2 Corinthians 2 in Marathi

1 कारण मी स्वतःशी ठरवले होते की, मी पुन्हा दुःख देण्यास तुमच्याकडे येऊ नये.

2 कारण जर मी तुम्हाला दुःख देतो, तर ज्याला माझ्यामुळे दुःख होते त्याच्यावाचून मला आनंदित करणारा कोण आहे?

3 आणि मी हेच लिहिले होते, म्हणजे मी आल्यावर ज्यांच्याविषयी मी आनंद करावा त्यांच्याकडून मला दुःख होऊ नये, मला तुम्हा सर्वांविषयी विश्वास आहे की, माझा आनंद तो तुम्हा सर्वांचादेखील आहे.

4 कारण, मी दुःखाने व मनाच्या तळमळीने अश्रू गाळीत तुम्हाला लिहिले ते तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नाही,पण तुमच्यावर जी माझी प्रीती आहे तिची खोली तुम्हाला समजावी.

5 जर कोणी दुःख दिले असेल, तर त्याने केवळ मलाच दुःख दिले,असे नाही, तर काही प्रमाणात तुम्हा सर्वांना दिले आहे.त्यासंबंधी मी फार कठीण होऊ इच्छीत नाही.

6 अशा मनुष्याला ही बहुमताने दिली ती शिक्षा पुरे.

7 म्हणून, उलट त्याला क्षमा करून तुम्ही त्याचे सांत्वन करावे; यासाठी की अति दुःखाने तो दबून जाऊ नये.

8 म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की, त्याच्यावर तुमची प्रीती आहे अशी त्याची खातरी करून द्या.

9 कारण मी तुम्हाला ह्या हेतूने लिहिले आहे की, तुम्ही परीक्षेत टिकता की नाही व प्रत्येक बाबतीत तुम्ही आज्ञाधारक राहता की नाही हे पाहावे.

10 ज्या कोणाला तुम्ही कशाची क्षमा करता त्याला मीही क्षमा करतो, कारण मी क्षमा केली असेल तर ज्या कशाची कोणाला मी क्षमा केली आहे, त्याला तुमच्याकरीता, मी ख्रिस्ताच्या समक्ष केली आहे.

11 यासाठी सैतानाने आपल्याला ठकवू नये; कारण आपण त्याचे विचार जाणत नाही असे नाही.

12 आणि पुढे जेव्हा मी ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी त्रोवसास आल्यावर आणि प्रभूकडून माझ्यासाठी एक दार उघडले गेले,

13 माझा बंधू तीत हा मला सापडला नाही;म्हणून माझ्या जीवाला चैन पडेना. मग तेथल्या लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियास निघून गेलो.

14 पण देवाचे आभार मानतो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हाला विजयाने नेतो आणि त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रत्येक ठिकाणी आमच्याद्वारे सगळीकडे पसरवितो.

15 कारण ज्यांचे तारण होत आहे अशा लोकांत आणि ज्यांचा नाश होत आहे अशा लोकांत आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुवास आहो.

16 ज्या लाेकांचा नाश होत आहे, मृत्युचा मरणसूचक वास ; आणि जे तारले गेले आहेत, जीवनाकडे नेणारा जीवनाचा वास आहोत. आणि ह्या गोष्टींसाठी कोण लायक आहे?

17 कारण दुसर्‍या कित्येकांसारखे देवाच्या वचनाची भेसळ करणारे आम्ही नाही; पण आम्ही शुध्द भावाने, देवाचे म्हणून, देवाच्या दृष्टीपुढे ख्रिस्तात बोलतो.