2 Corinthians 12 in Marathi

1 मला अभिमान मिरवणे भाग पडते; तरी हे उचित नाही, पण मी प्रभूच्या दर्शनांकडे व प्रकटीकरणांकडे आता वळतो .

2 मला एक ख्रिस्तातील मनुष्य माहीत आहे; तो चौदा वर्षांपूर्वी (शरीरात की शरीराबाहेर हे मला माहीत नाही, देवाला माहीत आहे) तिसर्‍या स्वर्गापर्यंत नेला गेला.

3 तो मला माहीत आहे, आणि असा तो मनुष्य (शरीरात की शरीरापासून वेगळा हे मला माहीत नाही, देवाला माहीत आहे)

4 त्या मनुष्याला सुखलोकात उचलून नेण्यात आले, आणि माणसाने ज्यांचा उच्चारही करणेही योग्य नाही अशी वाक्ये त्याने ऐकली.

5 मी अशा मनुष्याविषयी अभिमान मिरवीन, मी स्वतःविषयी नाही , तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिरवीन.

6 कारण आपण अभिमान मिरवावा अशी जरी मी इच्छा धरली, तरी मी मूढ होणार नाही, कारण मी जे खरे ते बोलेन; पण मी स्वतःस आवरले पाहिजे. म्हणजे कोणी जे माझे पाहतो किंवा ऐकतो त्याहून त्याने मला अधिक मानू नये.

7 आणि प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे, मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये, म्हणून माझ्या देहात एक काटा दिलेला आहे, तो मला ठोसे मारणार्‍या सैतानाचा दूत आहे; म्हणजे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये. म्हणून तो ठेवण्यात आला आहे.

8 माझ्यामधून तो निघावा म्हणून मी प्रभूला ह्याविषयी तीनदा विनंती केली.

9 आणि त्याने मला म्हटले की, ‘माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणात माझे सामर्थ्य पूर्ण होते.’ म्हणून, फार आनंदाने, मी माझ्या अशक्तपणात अभिमान मिरवीन, म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर रहावे;

10 आणि म्हणून ख्रिस्तासाठी आजारात, अपमानांत व आपत्तीत, पाठलागात आणि दुःखांत मी संतुष्ट असतो. कारण मी जेव्हा अशक्त असतो तेव्हाच सशक्त आहे.

11 मी मूढ बनलो, असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले; तुम्ही माझ्याविषयी खातरी द्यायला पाहिजे होती कारण मी काहीच नसलो, तरी त्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी कोणत्याही गोष्टीत कमी नाही.

12 चिन्हे, अद्भूते व सामर्थ्याची कृत्ये यांच्या योगाने प्रेषितांची चिन्हे खरोखरच सर्व सहनशीलतेने तुम्हामध्ये घडविण्यात आली.

13 कारण मी आपला भार तुम्हावर टाकला नाही, ह्या एका गोष्टीशिवाय तुम्ही दुसर्‍या कोणत्या गोष्टीत दुसर्‍या मंडळ्यांपेक्षा कमी आहात? मला ह्या अपराधाची क्षमा करा.

14 बघा, मी तिसर्‍या वेळी तुमच्याकडे येण्यास तयार आहे, आणि तुमच्यावर भार घालणार नाही; कारण मी तुमच्यापासून काही मिळवू पाहत नाही, तर मी तुम्हाला मिळवू पाहतो. कारण मुलांनी आईबापांसाठी साठवू नये, पण आईबापांनी मुलांसाठी साठवले पाहिजे.

15 मी तुमच्या जीवांसाठी फार आनंदाने खर्च करीन आणि स्वतः सर्वस्व खर्ची पडेन. मी तुमच्यावर अतिशयच प्रीती करतो म्हणून तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता की काय?

16 असो, मी तुमच्यावर भार घातला नाही, पण मी धूर्त असल्यामुळे मी तुम्हाला युक्तीने धरले.

17 मी तुमच्यासाठी ज्यांना पाठवले अशा कोणाकडून मी तुमचा फायदा घेतला काय?

18 मी तीताला विनंती केली आहे आणि मी एका बंधूला त्याच्याबरोबर पाठवत आहे. तीताने तुमच्याकडून फायदा मिळवला काय? आम्ही एकाच आत्म्याने चाललो नाही काय? एकाच चालीने चाललो नाही काय?

19 तुम्हाला इतका वेळ वाटत असेल की, आम्ही तुमच्यापुढे आमचे समर्थन करीत आहो, आम्ही देवासमोर ख्रिस्ताच्या ठायी बोलत आहो; आणि, प्रियांनो ह्या सर्व गोष्टी तुमच्या उन्नतीसाठी आहेत.

20 कारण मला भीती वाटते की, मी येईन तेव्हा, मी अपेक्षा करीत असेन तसे, कदाचित्, तुम्ही मला आढळणार नाही; आणि तुम्ही अपेक्षा करणार नाही असा मी तुम्हाला आढळेन. कदाचित्, तुमच्यात कलह, ईर्ष्या, राग, विरोध,स्वार्थी महत्वकांक्षा, कुरकुरी, गर्व, अफवा व गोंधळ मला आढळून येतील.

21 किंवा मी पुन्हा येईन तेव्हा माझा देव तुमच्यासमोर मला लीन करील, आणि ज्यांनी पाप केले असून आपण केलेल्या अमंगळपणाचा, जारकर्माचा व कामातुरपणाचा ज्यांनी पश्चात्ताप केलेला नाही अशा पुष्कळ जणांसाठी मला शोक करावा लागेल.