1 Timothy 1 in Marathi

1 देव आपला तारणारा आणि ख्रिस्त येशू आपली आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याजकडून

2 विश्वासातील माझे खरे लेकरू तीमथ्य यासः देव जो पिता आणि आपला ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्याकडून तुला कृपा, दया आणि शांती असो.

3 मी मासेदोनियास जातांना जशी मी तुला कळकळीने विनंति केली होती तशी आतांही करतो की तू इफिसात राहावे, यासाठी की, तू कित्येकास निक्षून सांगावे की ,की त्यांनी अन्य शिकवण शिकवू नये.

4 आणि जी ईश्वरी व्यवस्था विश्वासाच्या द्वारे आहे तिच्या उपयोगी न पडणाऱ्या , पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कहाण्यांकडे व अनंत वंशावळ्यांकडे लक्ष देऊ नका . तेच मी आतांही सांगतो .

5 आणि या आज्ञेचे उद्दिष्ट प्रीती आहे, जी शुध्द अंतःकरणातून, चांगल्या विवेकभावातून व निष्कपट विश्वासातील असावी.

6 या गोष्टी सोडून कित्येक जण व्यर्थ बोलण्याकडे वळले आहेत.

7 त्यांना नियमशास्त्राचे शिक्षक व्हायचे होते, पण ते ज्या गोष्टीविषयी मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात व सांगतात त्या त्यांनाच कळत नाहीत.

8 आता आम्हाला हे माहीत आहे की, नियमशास्त्र खरोखरच चांगले आहे. जर कोणी त्याचा चांगला वापर करतो.

9 कारण हे ठाऊकच आहे की, नियमशास्त्र हे नीतिमान लोकांसाठी केलेले नाही तर आज्ञाभंग करणाऱ्या आणि विद्रोही, पापी, भक्तिहीन आणि अधर्मी, अशुध्द, वडिलांना ठार मारणारे व आईला ठार मारणारे , मनुष्यघातक

10 जारकर्मी, समलैंगीक, मनुष्यांचा व्यापार करणारे, खोटारडे, खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी आहे आणि शुध्द शिकवणी विरुद्ध जर काही दुसरे असेल तर त्यासाठीहि आहे.

11 गौरवी सुवार्ता जी धन्यवादित देवाकडून येते आणि जी माझ्यावर सोपवली आहे, तिला हे अनुसरून आहे.

12 ज्याने मला शक्ती दिली त्या ख्रिस्त येशू आपल्या प्रभूचे मी उपकार मानतो कारण त्याने मला विश्वासू मानून सेवेत ठेवले आहे.

13 जरी मी पूर्वी देवनिंदा करणारा, छळणारा आणि हिंसक होतो, पण मी ते अजाणता व अविश्वासाने केले म्हणून माझ्यावर दया झाली.

14 परंतु विश्वास आणि प्रीती जी ख्रिस्त येशूमध्ये सापडते ती आपल्या प्रभूच्या कृपेने ओसंडून वाहिली.

15 ``ही गोष्ट विश्वसनीय व पूर्ण अंगीकार करण्यास योग्य आहे की , ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयला जगात आला, आणि त्या पापी लोकांपैकी मी मुख्य पापी आहे.

16 परंतु केवळ याच हेतूने माझ्यावर दया दाखविण्यात आली की माझ्यासारख्या अत्यंत वाईट पाप्यावर सहनशीलता दाखवली त्या उदाहरणावरून, पुढील काळात जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना सर्वकाळचे जीवन मिळावे.

17 आता सर्वकालचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला सन्मान आणि गौरव सदासर्वकाळासाठी असो. आमेन.

18 तिमथ्या, माझ्या मुला, मी तुला तुझ्याविषयी पूर्वीच सांगण्यात आलेल्या संदेशानुसार ही आज्ञा सोपवत आहे. यासाठी की तू त्यांच्याद्वारे चांगली लढाई करावी.

19 आणि विश्वास व चांगला विवेकभाव धर. कित्येकांनी हा झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरुपी तारू फुटले.

20 त्यात हूमनाय आणि आलेक्सांद्र आहेत त्यांना मी सैतानाच्या स्वाधीन केले आहे यासाठी की, निंदा न करण्यास शिकावे.