1 Peter 1 in Marathi

1 येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याजकडून,पंत, गलतिया, कप्पदुकिया, आसिया व बिथुनिया येथे, उपरी म्हणून पांगलेल्या यहूदी लोकास,

2 देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या पवित्रीकरणाद्वारे, आज्ञापालन करण्यासाठी, येशू ख्रिस्ताचे रक्त शिंपडून निवडलेले तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळोत.

3 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव आणि पिता धन्यवादित असो! त्याने आपल्या महादयेने येशू ख्रिस्ताला मृतांतून उठवून आपल्याला एका जिवंत आशेत पुन्हा जन्म दिला आहे,

4 आणि त्याद्वारे मिळणारे अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवले आहे,

5 आणि शेवटच्या काळात प्रकट करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे, राखलेले आहा.

6 आणि ह्या कारणास्तव, आताच्या काळात, निरनिराळया प्रकारच्या परीक्षांमुळे तुम्हाला थोडा वेळ भाग पडल्यास तुम्ही दुःख सोशीत असताही आनंदित होता.

7 म्हणजे, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्याहून मोलवान असलेल्या तुमच्या विश्वासाची परीक्षा, येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी, प्रशंसेला, गौरवाला व मानाला कारण व्हावी.

8 तुम्ही त्याला बघितले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता आणि त्याला पाहिले नसताही त्याच्यावर विश्वास ठेवून, तुम्ही अवर्णनीय, गौरवी आनंदाने उल्लसित होता.

9 कारण, तुमच्या विश्वासाचे प्रतिफळ, म्हणजे तुमच्या आत्म्याचे तारण तुम्ही मिळवत आहा.

10 तुम्हाला प्राप्त होणार्‍या कृपेविषयी ज्या संदेष्ट्यांनी संदेश सांगितले ते ह्या तारणाविषयी विचार व शोध करीत होते.

11 त्यांच्यामधील ख्रिस्ताचा आत्मा जेव्हा ख्रिस्ताच्या दुःखांविषयी व त्यानंतरच्या गौरवी गोष्टींविषयी पूर्वीच सांगितले होते, तेव्हा त्याने कोणता किंवा कोणत्या प्रकारचा काळ दर्शवला ह्याचा ते विचार करीत होते.

12 त्यांना प्रकट झाले होते की, स्वर्गातून खाली पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, तुम्हाला सुवार्ता सांगणार्‍यांनी आता ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, त्यात ते स्वतःची नाही, पण तुमची सेवा करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची इच्छा देवदूतांना आहे.

13 म्हणून तुम्ही आपल्या मनाची कंबर कसून सावध रहा; आणि, येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी तुमच्यावर जी कृपा होणार आहे तिच्यावर पूर्ण आशा ठेवा.

14 तुम्ही आज्ञांकित मुले होऊन, तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनांप्रमाणे स्वतःला वळण लावू नका.

15 परंतु तुम्हाला ज्याने पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वागण्यात पवित्र व्हा.

16 कारण असे जे शास्त्रात लिहिले आहे की, ‘तुम्ही पवित्र असा; कारण मी पवित्र आहे’.

17 आणि पक्षपात न करता, जो प्रत्येक मनुष्याचा कामाप्रमाणे न्याय करतो त्याला तुम्ही जर पिता म्हणून हाक मारता, तर तुमच्या प्रवासाच्या काळात तुम्ही भय धरून वागले पाहीजे.

18 कारण तुम्हाला माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांनी लावून दिलेल्या निरर्थक आचरणातून चांदीसोन्यासारख्या नाशवंत गोष्टीद्वारे, तुमची सुटका केली गेली नाही.

19 निष्कलंक व निर्दोष कोकरा झालेल्या ख्रिस्ताच्या मोलवान रक्ताद्वारे तुम्ही मुक्त झाला आहा.

20 खरोखर, जगाच्या स्थापने अगोदर, तो पूर्वीपासून नेमलेला होता. पण, ह्या शेवटच्या काळात तो तुमच्यासाठी प्रकट झाला,

21 आणि त्याच्या द्वारे तुम्ही देवावर विश्वास ठेवला; कारण, देवावर तुमचा विश्वास व तुमची आशा असावी म्हणून त्याला मृतांतून उठवून गौरव दिला.

22 तुम्ही जर आत्म्याच्या द्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुध्द केले आहेत, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा.

23 कारण तुम्ही नाशवंत बीजाकडून नाही पण अविनाशी बीजाकडून, म्हणजे देवाच्या, जिवंत टिकणार्‍या शब्दाच्याद्वारे पुन्हा जन्म पावलेले आहा .

24 कारण, ‘सर्व मानवजाती गवतासारखी आहे,व तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे गवत वाळते व त्याचे फूल गळते,

25 परंतु परमेश्वराचे वचन सर्वकाळ टिकते.’ आणि तुम्हाला त्याच वचनाची सुवार्ता सांगण्यात आली आहे.