1 Corinthians 9 in Marathi

1 मी स्वतंत्र नाही काय? मी प्रेषित नाही काय? मी आपल्या प्रभू येशूला पाहिले नाही काय? प्रभूच्या ठायी तुम्ही माझे काम आहा ना?

2 मी इतरांकरता जरी प्रेषित नसलो, तरी निःसंशय मी तुमच्याकरता आहे. कारण, तुम्ही प्रभूमध्ये माझ्या प्रेषितपणाचा शिक्का आहा.

3 माझी चौकशी करणार्‍यांना हे माझे प्रत्युत्तर आहे.

4 आम्हाला खाण्यापिण्याचा अधिकार नाही काय?

5 इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ, किंवा केफा, हे करतात त्याप्रमाणे आम्हाला कोणी विश्वासी बहीण पत्नी करून घेऊन, बरोबर नेण्याचा अधिकार नाही काय?

6 किंवा केवळ मला आणि बर्णबाला काम न करण्याचा अधिकार नाही काय?

7 स्वतःच्या खर्चाने सैनिक म्हणून सेवा करणारा असा कोण आहे? कोण द्राक्षमळा लावतो, आणि त्याचे फळ खात नाही? किंवा कोण कळप राखतो आणि कळपाच्या दुधातून पीत नाही?

8 मी ह्या गोष्टी लोकरीतीस अनुसरून सांगतो काय? नियमशास्त्र हेच सांगत नाही काय?

9 कारण, मोशेच्या नियमशास्त्रात लिहिले आहे की, ‘मळणी करीत असलेल्या बैलाला मुसके घालू नको.’ देव केवळ बैलांची काळजी करतो काय?

10 किंवा सर्वस्वी आपल्याकरता तो हे म्हणतो? हे निःसंशय आपल्याकरता लिहिले आहे. म्हणजे जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे, आणि जो मळणी करतो त्याने आपण वाटेकरी होऊ ह्या आशेने करावी.

11 आम्ही तुमच्यात जर आत्मिक गोष्टी पेरल्या आहेत, तर आम्ही तुमच्या दैहिक गोष्टींची कापणी केल्यास त्यात मोठे काय आहे?

12 जर दुसरे तुमच्यावरील ह्या अधिकाराचे वाटेकरी होतात, तर आम्ही विशेषेकरून का होऊ नये? आणि तरी आम्ही ह्या अधिकाराचा उपयोग केला नाही, पण ख्रिस्ताच्या सुवार्तेला आम्ही अडखळण करू नये म्हणून, आम्ही सर्व गोष्टी सहन करतो.

13 जे मंदिरातील पवित्र वस्तूंची सेवा करतात ते मंदिरातील अन्न खातात आणि जे वेदीपुढे उभे राहतात ते वेदीचे भागीदार होतात, हे तुम्ही जाणत नाही काय?

14 प्रभूने त्याचप्रमाणे आज्ञा दिली आहे की, जे सुवार्तेची घोषणा करतात त्यांचा सुवार्तेवर निर्वाह व्हावा,

15 पण ह्यातील कोणत्याच गोष्टीचा मी कधी उपयोग केला नाही, किंवा माझ्यासाठी तसे करावे म्हणून मी ह्या गोष्टी लिहिल्या नाहीत. कारण हे माझे अभिमान मिरवणे कोणी निरर्थक करण्यापेक्षा मला मरणे बरे वाटेल.

16 कारण मी जरी सुवार्ता सांगतो, तरी अभिमान मिरवण्यास मला कारण नाही. कारण मला हे करणे भाग आहे; मी सुवार्ता सांगणार नाही, तर मला हायहाय.

17 कारण, मी हे स्वेच्छेने केले, तर मला वेतन मिळेल, पण माझ्या इच्छेविरुध्द असेल, तर माझ्यावर हा कारभार सोपविला गेला आहे.

18 तर मग माझे वेतन काय? एवढेच की, मी सुवार्ता सांगतो, तेव्हा मी सुवार्ता फुकट पुरवावी आणि सुवार्तेविषयीच्या माझ्या अधिकाराचा मी दुरुपयोग करू नये.

19 कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असलो तरी अधिक लोक मिळवावेत म्हणून मी सर्वाचा दास झालो.

20 मी यहूद्यांना मिळविण्यास, यहुद्यांना यहुद्यासारखा झालो; मी नियमशास्त्राधीन नसलो तरी मी नियमशास्त्राधीन असलेले मिळविण्यास, नियमशास्त्राधीन असल्यासारखा झालो.

21 (मी देवाच्या नियमाबाहेर नाही, पण ख्रिस्ताच्या नियमाखाली असल्यामुळे) मी नियमशास्त्राधीन नसलेले मिळविण्यास, नियमशास्त्राधीन नसलेल्यांना नियमशास्त्राधीन नसल्यासारखा झालो.

22 आणि मी दुर्बळ असलेले मिळविण्यास, दुर्बळांना दुर्बळासारखा झालो. मी सर्वांना सर्व झालो आहे, म्हणजे सर्व काही करून मी कित्येकांचे तारण करावे.

23 आणि मी हे सर्व सुवार्तेकरता करतो, म्हणजे मीही तिच्यात सहभागी व्हावे.

24 शर्यतीत धावणारे सगळेच धावतात पण एकालाच बक्षीस मिळते, हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून असे धावा की,ते तुम्ही मिळवाल.

25 स्पर्धेसाठी मेहनत करणारा प्रत्येक मनुष्य प्रत्येक गोष्टीत संयमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळविण्यासाठी करतात, पण आपण अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करतो.

26 म्हणून तसा मी धावतो, निरर्थक नाही, मी तसे मुष्टिप्रहार करतो, हवेवर प्रहार करणार्‍यासारखे नाही.

27 पण मी माझे शरीर दाबाखाली दास्यात ठेवतो; नाहीतर, दुसर्‍यांना घोषणा केल्यावर मी स्वतः, काही कारणाने, कसोटीस न उतरलेला होईन.