1 Corinthians 16 in Marathi

1 आता, पवित्र जनाकरीता वर्गणी गोळा करण्यविषयी, जसे मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे तुम्हीही तसे करावे.

2 तुमच्यामधील प्रत्येकाने, त्याला यश मिळेल त्या मानाने, दर आठवड्याच्या पहिल्या दिवशी द्रव्य जमवून ठेवावे. म्हणजे, मी येईन तेव्हा वर्गण्या होऊ नयेत.

3 आणि मी आल्यावर तुम्ही, पत्रे देऊन, तुमची मर्जी असेल त्यांना तुमची देणगी यरूशलेमला घेऊन जायला पाठवीन;

4 आणि जर माझेसुध्दा जाणे योग्य असेल तर ते माझ्याबरोबर येतील.

5 मी मासेदोनियातून जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन कारण मासेदोनियातून जाण्याची माझी योजना आहे.

6 आणि शक्य झाल्यास मी तुमच्याबरोबर राहीन आणि हिवाळाही घालवीन, म्हणजे मी जाणार असेन तिकडे तुम्ही मला वाटेस लावावे.

7 कारण आता थोड्या वेळेसाठी तुम्हाला भेटण्याची माझी इच्छा नाही. कारण जर देवाची इच्छा असेल तर तुमच्यासमवेत काही काळ घालवावा अशी आशा मी धरतो.

8 पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिसात राहीन

9 कारण माझ्यासाठी मोठे आणि परिणामकारक दार उघडले आहे. आणि असे अनेक आहेत जे मला विरोध करतात.

10 जर तीमथ्य आला तर तो तुमच्याजवळ निर्भयपणे कसा राहील याकडे लक्ष द्या. कारण तोही माझ्यासारखेच प्रभूचे कार्य करीत आहे.

11 यास्तव कोणीही त्याला तुच्छ मानू नये. तर मग त्याने माझ्याकडे यावे म्हणून त्याला शांतीने पाठवा. कारण इतर बंधूंबरोबर त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे.

12 पण बंधू अपुल्लोविषयी असे आहे की, त्याने इतर बांधवांबरोबर तुमच्याकडे यावे, अशी मी त्याला फार विनंती केली; पण त्याची आता येण्याची मुळीच इच्छा नव्हती, पण त्याला सोयीची संधी मिळेल तेव्हा तो येईल.

13 सावध असा, तुमच्या विश्वासात बळकट राहा.

14 धैर्यशील व्हा. सशक्त व्हा. प्रत्येक गोष्ट जी तुम्ही कराल ती प्रीतीत करा.

15 आता बंधूंनो व बहिणींनो स्तेफनाच्या घराण्याविषयी तुम्हाला चांगली माहिती आहे. ते अखयातील प्रथमफळ आहे;आणि पवित्र जनांच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःला वाहिले आहे. मी तुम्हाला विनंती करतो की,

16 प्रत्येक जण जो या कार्यात सामील होतो व प्रभूसाठी श्रम करतो अशा लोकांच्या तुम्हीसुध्दा अधीन व्हा.

17 स्तेफन, फर्तुनात आणि अाखायिक हे आल्याने मला आनंद झाला. कारण त्यांनी माझ्यासाठी जे केले ते तुम्ही करू शकला नसता.

18 कारण त्यांनी माझा व तुमचा आत्मा प्रफुल्लीत केला आहे. अशा लोकांना मान्यता द्या.

19 आशियातील मंडळ्या तुम्हाला नमस्कार सांगतात. अक्विल्ला, प्रिस्कील्ला व जी मंडळी त्यांच्या घरात जमते, ती प्रभूमध्ये तुम्हाला नमस्कार सांगतात,

20 सर्व बंधू तुम्हाला नमस्कार सांगतात, एकमेकांना प्रीतीने अभिवादन करा.

21 मी, पौल स्वतः माझ्या स्वतःच्या हाताने हा नमस्कार लिहीत आहे.

22 जर कोणी प्रभूवर प्रीती करीत नाही, तर तो शापित होवो.“मारानाथा; हे प्रभू ये”

23 प्रभू येशूची कृपा तुम्हाबरोबर असो!

24 ख्रिस्त येशूमध्ये माझी प्रीती तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन